१९५० पर्यंत घराघरात तांब्या-पितळेची भांडी वापरली जात. पितळेच्या भांड्यात ठेवलेल्या आंबट पदार्थांची चव बदलते त्याला कळकणे म्हणतात. त्यासाठी ‘भांड्यांना आतून कल्हई केली जाई. कल्हई करणे म्हणजे कथलाचा (टिन) मुलामा देणे. १९५० च्या सुमारास बाजारात स्टेनलेस स्टीलची भांडी नुकतीच डोकावू लागली होती. साधारण त्याच सुमारास बाजारात प्रथम कचकड्याच्या वस्तू दिसू लागल्या. या वस्तू टेबलावरून खाली जमिनीवर पडल्या तर पिचत किंवा फुटत. कचकड्याच्या निमित्ताने प्लास्टिकची ही पहिली ओळख भारतीय समाजाला झाली. कचकडे हे सेल्युलोज नायट्रेट व कापूर यांच्या मिश्रणापासून बनवतात. या भांड्यांनी हळूहळू तांब्या-पितळेच्या भांड्यांना मोडीत काढले. कचकडे व्यवहारातून बाहेर पडायला बराच काळ जावा लागला. हळूहळू १९६०च्या सुमारास, भांडीच कशाला नायलॉनचे म्हणजेच एका अर्थी प्लास्टिकचे कपडेही बाजारात दिसू लागले.
१९७०च्या सुमारास बाजारात पीव्हीसी ऊर्फ पॉलिव्हिनाइल क्लोराइडच्या वस्तू येऊ लागल्या. जमिनीखाली मिळणाऱ्या क्रूड तेलाचे शुद्धिकरण करताना नाफ्था नावाचा पदार्थ तयार होतो. तो उच्च तापमानाला व उच्च दाबाखाली उकळवल्यावर इथिलिन नावाचा पदार्थ मिळतो. या इथिलिन व क्लोरिन वायूच्या मिश्रणातून इथिलिन डायक्लोराइड मिळते. त्यातून व्हिनाइल क्लोराइड बनवतात. त्याचे बहुवारीकरण (पॉलिमरायाझेशन) करून पीव्हीसी म्हणजेच पॉलिव्हिनाइल क्लोराइड तयार होते. तसेच हाय डेंसिटी पॉलिथिलिन (एचडीपीई) हा पदार्थही बनवतात. या दोन तऱ्हेच्या प्लास्टिकपासून घराघरात लागणाऱ्या अनेक वस्तू तयार झाल्या आणि त्यांनी घरातील तांब्या-पितळेच्या वस्तूंना हद्दपार केले. नाही म्हणायला स्टेनलेस स्टीलने मात्र आजपर्यंत चिवटपणे प्लास्टिकच्या या हल्ल्याला तोंड दिले आहे.
जगभर वाढत चाललेल्या लोकसंख्येला पुरे पडण्यासाठी तांबे-पितळ पुरेसे उपलब्ध नसल्याने प्लास्टिकसारख्या पदार्थांची गरज होती. प्लास्टिक हे नाव एखाद्या आडनावासारखे आहे. प्लास्टिकच्या कुटुंबात पॉलिथिलिन, पॉलिस्टायरिन, पीव्हीसी, पॉलिअमाइड (नायलॉन), टेरिलिन, फोरमायका, इमेलेमाइन, सनमाइका, बेकेलाइट, पॉलिप्रॉपिलिन, सेल्युलोज अॅसिटेट, सीबीए, सेल्यूलोज़ नायट्रेट, फिनोलिक -अमिनो, पॉलिएस्टर इपॉक्सी-व्हिनाइल सेलीकोंस, युरिया फॉर्माल्डिहाइड रेझिन, पॉलिअॅक्रिलिक नायटराइट (ऑरीओन), सेल्यूलोज नायट्रेट (एरल्डाइट फेविकोल), अॅसिटल, फ्लोरोप्लास्टिक, सान, पॉलिसल्फोन, पॉलिकार्बोनेट रेझिन इत्यादी अनेक पदार्थ येतात.
अ.पां. देशपांडे, (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply