१० ऑक्टोबर १९६० रोजी विद्याधर गोखले लिखित ‘सौभद’च्या परंपरेतील सुवर्णतुला या पौराणिक नाटकाचा पहिला प्रयोग गोपीनाथ सावकार यांच्या ‘कलामंदिर’ या नाट्यसंस्थेने सादर केला गेला.
या नाटकाचे कथानक श्रीकृष्ण चरित्रातील एका लोकप्रिय प्रसंगावर आधारलेले आहे. नारद हा या कथानकातील सूत्रधार असल्याने संगीतानुकूल वातावरण आपोआपच निर्माण होते. श्रीधर कवींच्या ‘हरिविजय’ या ग्रंथातून हे कथानक घेतले आहे. नाटकाचा शेवट उदात्त करण्याच्या संस्कृत नाटकांच्या परंपरेला अनुसरून या नाटकात राधेची व्यक्तिरेखा योजिली आहे. पारिजातकाच्या फुलामुळे निर्माण झालेल्या सवतीमत्सराची हे सर्वसामान्य प्रेक्षकाला भावणारी ही भाबडी कथा हलक्या फुलक्या, विनोदप्रचीर आणि सुबोध घरगुती संवादातून नाटकात येते. या नाटकाला स्वरराज छोटा गंधर्व यांचे लाभलेले सहजसुंदर भावपूर्ण संगीत हे खास वैशिष्ट्य होते. अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत त्यांनी हे संगीत बांधले. ‘अंगणी पारिजात फुलला’, ‘ताचि विश्वंभर’, ‘नारायण नारायण’ ही पदे गाजली. ‘कधी येतील यदुवीर’ या गीतासाठी त्यांनी स्वरचित गुणीकंस हा राग वापरला. पहिल्या प्रयोगात रुक्मिणीला गाणी नव्हती. ती नंतर समाविष्ट केली गेली. त्या गीतांना आणि कृष्णाच्या काही पदांना पं. राम मराठे यांनी संगीत दिले.
या नाटकाच्या पहिल्या प्रयोगात स्वत: छोटा गंधर्व, प्रसाद सावकार, कान्होपात्रा, गोपीनाथ सावकार यांनी काम केले होते. परंतु १००-१५० प्रयोगांनंतर अनंत दामले यांनी साकारलेली नारदाची भूमिका प्रचंड लोकप्रिय आणि लक्षवेधी झाली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply