८ ऑक्टोबर १९६२ रोजी विजयादशमीच्या सुमुहूर्तावर #तोमीनव्हेच ! या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्लीच्या आयफॅक्स नाट्य गृहात झाला.
त्या हलकट माणसावर काय नाटक लिहायचं ?
आचार्य अत्र्यांची ही फटकळ प्रतिक्रिया, नाटक मागण्यासाठी आलेल्या मो. ग. रांगणेकरांनी माधव काझी हा विषय सुचविल्यावर होणं स्वाभाविक होतं. गेल्या शतकातील पन्नाशीच्या दशकात, मुलींना लग्नाच्या जाळ्यांत ओढून फसविणाऱ्या माधव काझीचा खटला, महाराष्ट्रभर गाजला होता. अन् मो. ग. रांगणेकर त्यांच्या बिकट परिस्थितीत असलेल्या नाट्यनिकेतनसाठी एका दमदार नाटकाच्या शोधात होते. अर्थात अत्र्यांनी रांगणेकरांना तात्काळ होकार वा नकारही दिला नाही. बघतो म्हणाले. मात्र मराठाचे उपसंपादक आत्माराम सावंत यांनी त्या खटल्याचे सर्व वृत्तांत साहेबांसमोर ठेवले, तेव्हा अत्र्यांना त्यातील नाट्य जाणवलं आणि अडीच-तीन महिन्यांत नाटक लिहून झालं.
तो मी नव्हेच! या नाटकाच्या या पहिल्या प्रयोगाला दिल्लीत असलेले सारे नामवंत मराठी लोक तर हजर होतेच; शिवाय, कित्येक अमराठी लोक ज्यांना मराठी रंगभूमीबद्दल माहिती होती, तेही आवर्जून या नाटकाला उपस्थित होते. त्यामुळे नाट्यगृह संपूर्ण भरलेले होते. या पहिल्या प्रयोगात प्रभाकर पणशीकर (५ भूमिका), दत्तोपंत आंग्रे, नंदा पातकर, चंद्रचूड वासुदेव, बिपीन तळपदे, वासुदेवराव दाते, एरन जोसेफ, पुरुषोत्तम बाळ, कुसुम कुलकर्णी, सरोज नाईक, मंदाकिनी भडभडे, भोलाराम आठवले, श्रीपाद जोशी यांनी भूमिका केल्या. यापैकी बरेच जण त्यावेळेस नामवंत अभिनेते / अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होते; तर यापैकी काही जण नंतर नामवंत झाले.
खरे तर तालमी नीटपणे झालेल्या नसतानाही हा पहिला प्रयोग दृष्ट लागण्यासारखा झाला. फिरत्या रंगमंचाचा वापर करणारे तो मी नव्हेच हे मराठीमधील पहिले नाटक होते. तो मी नव्हेच हे आचार्य अत्रे लिखित एक लोकप्रिय मराठी नाटक आहे. ह्या नाटकामधु्न प्रभाकर पणशीकरांनी लखोबा लोखंडे ह्या एका बदमाशाची भूमिका अजरामर केली आहे. ही कथा सत्य घटनेवर आधारित होती, व खटला हा बार्शीच्या कोर्टात चालू होता. नाटकाचे कथानक बहूतेक अंशी कोर्टात घडते. आरोपीवर (जो स्वत:ला नीपाणीचा तंबाखुचा व्यापारी लखोबा लोखंडे म्हणवून घेतो) काही लोकांना पैसे घेऊन लुबाडल्याचा तसेच काही स्त्रीयांशी खोटे लग्न करून त्यांचे दागिने आणि पैसे चोरल्याचा आरोप आहे. सरकारी वकील किरकिरे सर्व फिर्यादींना साक्ष देण्यासाठी कोर्टात बोलावतात आणि त्यांची तपासणी करतात. लखोबा लोखंडे बचाव पक्षाच्या वकीलांना काढून टाकतो आणि साक्षीदारांची उलटतपासणी स्वतः करतो. तो सगळ्या साक्षीदारांना त्यांच्या पार्श्वभूमीबद्दल आणि त्यांच्या तक्रारीबद्दल असे काही प्रश्न विचारतो की त्यावर सगळे निरुत्तर होतात. प्रत्येक उलटतपासणीचा शेवट लखोबा लोखंडे तो मी नव्हेच ह्या उद्गारांनी करतो.
तो मी नव्हेच हे बहुदा जगातील पहिले नाटक असेल ज्यामध्ये एकाच कलाकाराने रगंमंचावर पाच पुर्णपणे वेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. तो मी नव्हेच, असं म्हणत लखोबा लोखंडेने काही वर्षांपूर्वी बऱ्याच जणांना गंडा घातला होता. विविध व्यक्तिरेखा साकारत प्रभाकर पणशीकर यांनी जवळपास साऱ्यांनाच चकित केलं होतं. या नाटकात लखोबा लोखंडे, दिवाकर दातार, कॅ. अशोक परांजपे, दाजीशास्त्री दातार आणि राधेश्याम महाराज अशा पाच परस्परांपासून अतिशय भिन्न असणार्याख भूमिका पणशीकरांच्या वाट्याला आल्या, त्या त्यांनी कसलेल्या अभिनेत्याप्रमाणे केल्या. अत्र्यांसारख्या एका मातब्बर नाटककाराने लिहिलेल्या एका जबरदस्त नाटकात पाच अशा सशक्त भूमिका मराठीतच काय अन्य कुठल्याही भाषेतील रंगभूमीवर दुसर्या कुठल्या अभिनेत्याला मिळाल्याचे दिसत नाही. या प्रत्येक भूमिकेला अगदी वेगवेगळ्या प्रकाराची वेशभूषा आहे. परदेशी राहून आलेला दिवाकर दातार (पाश्चात्य पूर्ण सूट), त्याचे मोठे बंधु कोकणातील दाजीशास्त्री दातार (धोतर, झब्बा, उपरणे, फेटा), कॅ. अशोक परांजपे (नेव्हीचा युनिफॉर्म), लखोबा लोखंडे (खेडेगावातील कळकट पोषाखातील व्यापारी), आणि राधेश्याम महाराज (पारंपरिक महाराज / बुवा) या सर्व वेशभूषा पणशीकर अक्षरश: पाऊण एक मिनिटात बदलून परत रंगमंचावर हजर होत. शिवाय या बदललेल्या भूमिकेचे बेअरिंग आणि त्या भूमिकेसाठी आवश्यक असणारा आवाज, हेल पणशीकर अचूक निर्माण करत.
चाळीसेक वर्षांत त्यांनी जवळपास तीनेक हजार प्रयोगांत प्रभाकर पणशीकरांनी लखोबा साकारला. प्रभाकर पणशीकरांचं नाव त्या भूमिकेशी इतकं एकरूप झालं की, आजही लखोबा म्हटलं की पणशीकरच आठवतात. त्या भूमिकेत त्यांच्याशिवाय दुसऱ्यात कुणाचा विचार रुचतच नाही! प्रभाकर पणशीकरांनंतर तो मी नव्हेच हे नाटक काही नटांनी सादर केलं, पण त्याला जास्त प्रतिसाद मिळाला नाही.
— प्रकाश चान्दे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply