जहाजावर नोकरी करावी लागेल हे माहीत नसताना म्हणजे सुमारे 15 वर्षांपूर्वी आमच्या जुन्या घरात मोठा फिश टँक बसवला होता. आता दोन वर्षांपूर्वी नवीन घर बांधताना अजून मोठा फिश टँक घरात बसवून घेतला. फिश टँक मध्ये रंगीबेरंगी आणि वेगवेगळ्या आकारांचे सुंदर सुंदर मासे आणि त्यांची शांत व संथ हालचाल पाहून आपल्यालाच शांत शांत वाटू लागतं. फिश टँक मधील मासे शांतपणे त्या मर्यादित जागेत स्वच्छंदपणे विहार करत असतात. कदाचित त्यांना त्यांचं जग हे फिश टँक च्या मर्यादित जागेत आहे असेच वाटत असेल आणि म्हणून कदाचित ते शांत आणि मुक्तपणे आहे तेव्हढ्या जागेत विहार करत असतात. दिवसा रात्री कधी बघावे तेव्हा ते पाण्यात इकडून तिकडे फिरत असतात. मासे झोपत असावेत का ?? माश्यांना रडू येत असेल का??? रडू येत असेल तर, पाण्यात त्यांचे अश्रू कसे आणि कोणाला दिसत असतील?? त्या माश्यांना फिश टँक चे झाकण उघडून जेव्हा फिश फूड घातले जाते तेव्हाच खायला मिळतं. त्यांना भूक लागत असेल का आणि लागत असली तरी बाहेरून कोणी खायला घालेल या अपेक्षेने व्याकुळ होत असतील बिचारे. या फिश टँक मधील माशांकडे कधी कधी आठ आठ दिवस होतात तरी बघायला होत नाही. समोर हॉल मध्ये असूनसुद्धा बघितले जात नाही. फिश टँक मधील मासे शांत असतात म्हणून समोर असूनसुद्धा त्यांच्याकडे क्षणभर सुध्दा बघावेसे वाटतं नसावे का. जहाजावरील आमचे जीवन सुद्धा असेच फिश टँक मधील माशांसारखे आहे की काय असे वाटते कधी कधी. एका मर्यादित जगात असूनसुद्धा जगभर फिरतोय असं समजून जगतोय असं वाटतं. अकॉमोडेशन, गॅली , डेक , ब्रीज आणि इंजिन रूम एव्हढच मर्यादित जग. फिश टँक मध्ये जसे मोठे मासे लहान मासे एकत्र आणि गुण्यागोविंदाने राहत असतात तसचं काहीसं आम्ही सुध्दा सिनियर ज्युनियर अधिकारी आणि खलाशी राहत असतो. फिश टँक मधील छोटे व मोठे मासे एकमेकांची सुख दुःख वाटून घेत असतील की नाही हे माहीत नाही पण जहाजावर एकमेकांची सुख दुःख वाटून घेणारे सहकारी नेहमी भेटतात. चुकी झाली तर वॉर्निंग देऊन एकमेकांना सांभाळण्याचा प्रयत्न केला जातो. सुख दुःख वाटून घेण्यासाठी ती व्यक्त तर केली गेली पाहिजेत. जेव्हा एखाद्या ज्युनियर अधिकाऱ्याला फोनवर त्याची गर्लफ्रेंड म्हणते आठ दिवसात घरी येऊन मला मागणी घाल नाहीतर माझे घरचे दुसऱ्याशी लग्न लावून देतील. आता जहाज कोचीन बंदरातून निघून चार दिवस झालेत आणि ब्राझीलच्या बंदरात पोचायला आणखीन वीस एकवीस दिवस लागणार आहेत हे त्या गर्लफ्रेंड ला कोण आणि कसं समजावणार मग तो बिचारा अधिकारी काय करू नी काय नको करू अशा अवस्थेत दिवस काढायला सुरुवात करतो. जेव्हा सिनियर अधिकाऱ्याना व खलाशांना ह्याचे काही तरी बिनसले आहे असे जाणवते तेव्हा मग त्याची विचारपूस करून समजूत घालून त्याला पुन्हा लाईनवर आणले जाते. पण बऱ्याच वेळेला कोणी व्यक्त होतच नाही आणि एकटेच कुढत बसतात. कधी कधी खराब हवामानामुळे महत्वाचे असूनदेखील फोनवर घरच्यांशी संपर्क होत नाही. ज्यांना बायको किंवा गर्लफ्रेंड असते आणि त्यांनी नेहमी प्रमाणे माझ्यावर किती प्रेम आहे सांग असा प्रश्न केला तर त्याचे उत्तर देईपर्यंत चार चार दिवस जहाजावरील फोन किंवा इंटरनेट बंद झाला तर उत्तर देणाऱ्याना रात्र रात्र झोप नाही लागत. बिचारे सगळ्यांना फोन चालू झाला इंटरनेट सुरू झालं का विचारून कावरे बावरे झालेले असतात. हल्ली इंटरनेट आणि सोशल मीडिया मुळे जहाजावर ऑफ ड्युटी झाले रे झाले की मोबाईलचा सिग्नल आणि इंटरनेट नीट चालू आहे का तपासल जातं.
कधी कधी मुलांशी बोलत असताना अशी इमर्जन्सी येते की काम करता करता आठ ते दहा तास निघून जातात मग अर्धवट राहिलेले बोलणे पुन्हा दुसऱ्या दिवशी नव्याने सुरू होते. घरातील भांडणे आणि कौटुंबिक वाद कोणाला इतरांशी शेअर करावेसे वाटतं नाहीत. महिनो महिने घरापासून लांब राहुन जेव्हा आपल्या घरचे आनंदात नाहीत, सुखात नाहीत हे जेव्हा एखाद्या खलाशाला किंवा अधिकाऱ्याला जाणवते तेव्हा त्याची अवस्था या फिश टँक मधील माशा सारखीच होते. अडकून राहिल्या सारखी म्हणजे समुद्रात आहोत, पोहता सुद्धा येतय तरीपण एका बंदिस्त टाकीत कोंडल्यासारखी ज्यातून आपल्या मर्जीने स्वतः ला कधी बाहेर नाही पडता येत. जहाजावरील काम, बंदरातील नियम, ज्या देशात असेल तेथील नियम, व्हिसा, विमानाचे तिकीट, रीलीवर आणि त्याचे मेडिकल आणि ते सुद्धा फिट टू वर्क असेल तरच जहाजावरुन घरी परतता येत. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर जहाजावर बहुतेक वेळेला आम्ही आमच्या मर्जीने जात असतो पण जहाजावरुन घरी येताना आपली मर्जी चालवून नाही चालत. घरी आल्यावर एका फिश टँक मधून बाहेर आलोय म्हणून खूप आनंद होतो पण त्याच सोबत परत त्याच किंवा दुसऱ्या फिश टँक मध्ये पुन्हा जावे लागेल हीच चिंता सतावत असते. पुन्हा तेच किंवा त्यातले काही मासे किंवा सगळेच नवीन मासे सहकारी म्हणून भेटतील याची शाश्वती नसते.
जहाजावर राहून आल्यावर घरी असताना फिश टँक मधून बाहेर पडून खुल्या समुद्रात पोहतोय असा काहीसा भास होत असतो, पण काही दिवस गेल्यावर पुन्हा संसाराच्या फिश टँक मध्ये अडकलो आहोत याची जाणीव लगेच होऊन जाते. जहाजावर असलो तरीही संसार चालूच राहतो कारण घरी आपली बायको पोरांना आईसह बापाची पण माया लावत असते. तिच्याकडून आई आणि बाप दोघांची भूमिका पार पाडली जात असते पण आम्ही घरी आलो की फक्त बापाचीच भूमिका बजावत असतो ती सुद्धा उरलेली अर्धी कारण बापाची अर्धी भूमिका बायकोने आम्ही जहाजावर असताना पार पाडलेली असते आणि असे असताना कितीही झालं तरी घरी आल्यावर बायको प्रमाणे आम्हाला पोरांची आई नाही होता येत हे वास्तव आहे. जहाजावर असलो आणि घरी असलो तरीही माझिया प्रियाला माझी प्रीत कळेना अशी अवस्था असते.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
कोन, भिवंडी, ठाणे
Leave a Reply