“अहो, इकडं पाहिलंत का? आज पुन्हा एक मासा मेला आणि घाण वास
पण सुटला आहे.’
मॅडम मॉमचा आवाज ऐकून अप्पा घाईघाईने हॉलमध्ये आले. मॅडम मॉम
म्हणजे अप्पांची बायको. मुलं मॉम म्हणतात. म्हणून अप्पा त्यांना मॅडम मॉम म्हणतात.
मेलेला मासा पाहून अप्पा म्हणाले, “अरे,अरे, हा एंजल गेला वाटते! आता दुसरा आणायला पाहिजे. आज टँकपण साफ करतो.”
“वाट पहा! म्हणे आज नक्की साफ करतो. पंधरा दिवस सारखी ओरडतेय.
शेवटी मेला ना तो मासा? पण मी म्हणते, आता
नाही जमत तुम्हाला तो व्याप तर एकदाचा विकून
तरीटाका तो टँक!”
“अग हो, पण तो दुकानदारही घ्यायला तयार नाही.
म्हणतो, हा टँक आता जुन्या पध्दतीचा झाला. आता नवीन गि-हाईक
संपूर्ण काचेचा टँक मागतात. असा अॅल्युमिनियमच्या फ्रेमचा नाही चालत त्यांना. दरवेळी मी चौकशी करतो पण गि-हाईक नाही त्याला मी काय करू?”
“मग करा, तुम्हाला काय करायचे ते. निदान पंधरा वीस दिवसांनी साफ तरी करीत जा. हे असे मासे मेलेले मला नाही बाई पहावत. आज दुपारी तेवढं काम कराच!” असं म्हणून मॅडम मॉम स्वयंपाकघरात निघून गेल्या.
अप्पांनी प्लॅस्टिकचे फावडे आणून मेलेला एंजल अलगद काढून घेतला आणि कुंडीतल्या मातीत पुरून टाकला.
अलिकडे टँकची साफसफाई करणे त्यांनाही झेपेनासे झाले होते. टँकही चांगला तीन फुटी. त्यात पाचसहा मोठ्या बादल्या पाणी मावायचे. तो साफ करणे म्हणजे तीन चार तासांचा व्यापच असायचा. सायफन करुन पहिलं पाणी काढायचं. ते पण सगळं नाही, दोन तृतियांश मग आतली वाळू, दगड, गोटे, शोभेची झाडं, प्लास्टिकच्या पाणबुड्या, कासव, शंख, शिंपले सगळं काढायचं. तळ चांगला पुसून काढायचा. बाजूच्या काचांवरचे शेवाळं साफ करून त्या स्वच्छ करायच्या. वाळू, शंख शिंपले, खेळणी, झाडं सगळं साफ करायचं, बाथरूममधून रबरी पाईप हॉलमध्ये आणून टँकमध्ये ताजे पाणी भरायचे असा मोठा व्यापच होता तो. एखाद्यावेळी चुकून दुर्लक्ष झाले तर पाईप बाहेर पडून हॉलमध्ये पाणीच पाणी व्हायचे. आणि मग मॅडम मॉमचा पारा चांगलाच चढायचा आणि मग ट्क विकून टाका म्हणून त्यांचा घोषा चालू व्हायचा! अप्पांना खरं तर मनातून टँक विकणे जिवावर आलं होतं. पण हे साफसफाईचे जिकीरीचे कामही पेलवेनासे झाले होते. मोठे द्विधा मनःस्थिती झाली होती त्यांची.
दुपारी जेवण झाल्यावर अप्पांनी थोडी वामकुक्षी केली आणि मग टँकच्या सफाईला लागले. टँकजवळ स्टुलावर बसून त्यांनी काचा साफ करायला घेतल्या. टँकमध्ये मासे त्यांनी फारसे ठेवले नव्हते. चंदेरी गुलाबी रंगाचे लांबट आकाराचे गोरामींच्या दोन जोड्या, तळहाताच्या आकाराचे दोन एंजल आणि झुपकेदार पंखाचे चार गोल्ड फिश येवढेच ठेवले होते. पण त्यांच्या हालचाली बघत त्यांचा वेळ छान जायचा. रात्री हॉलमधले दिवे बंद करुन फक्त टँकमधला दिवा चालू ठेवला की एकदम समुद्राच्या तळाशी गेल्यासारखे वाटायचे त्यांना. मग माशांकडे पहात किती वेळ गेला ते त्यांना कळायचेही नाही.
काचा पुसता पुसता अप्पांचे विचार वीस वर्षे मागे गेले. तेव्हा योगेश दहा वर्षाचा होता आणि प्रकाश पाच वर्षाचा. नगरला त्यांच्या मावसभावाच्या माधवच्या लग्नाला सगळे गेले होते. माधव साप पकडण्यात तरबेज होता. कुठून कुतून मोठे नाग त्याने पकडून आणले होते आणि तो घरातच एका वेगळ्या खोलीत ठेवायचा. त्यांचे विष काढून तो हाफकिनला पुरवायचा, एकदा साप पकडायला गेला असता त्याला एक छोटेसे कासवाचे पिल्लू सापडले, अगदी तळहाताएवढे गोजिरवाण, गंमत म्हणून त्याने ते घरी आणले होते. आलेले पाव्हणे कौतुकाने त्याला पहात होते. योगेशला ते फार आवडले. म्हणाला “बाबा, आपण पाळायचे का?” माधव पण म्हणाला, “अरे जा घेऊन त्याचा हट्ट आहे तर, नंतर द्या सोडून त्याला एखाद्या विहिरीत,” मॅडम मॉम मात्र म्हणत होत्या. “काही नको ते, आपल्या घरी आणू नका, मला नाही आवडत असले जिवंत प्राणी, पक्षी घरात पाळायला.” पण योगेशच्या हट्टापायी ते कासव घरी आलेच.
कासव होते मांसाहारी.आमच्याकडे त्याचे व्हायला लागले हाल. शिवाय घरात त्याला सोडले की ते कुठे तरी सांदी कोपऱ्यात, खबदाडात, दाराआड जाऊन बसायचे, त्याला शोधून काढायचे म्हणजे एक व्यापच झाला. शिवाय सांदी कोपऱ्यातून त्याचे सर्वांग कचऱ्याने माखायचे,मग त्याला धुवून पुसून काढायचे.
हा व्याप टाळण्यासाठी आणला मग एक मोठा तीन फुटी टँक. टँकमध्ये मात्र ते फारच छान दिसायचे. काही दिवस मजेत गेले. पण जसजसे ते मोठे होऊ लागले तशी त्याची टोकदार नखंही मोठी झाली. त्या नखांनी ते टँकच्या अॅल्युमिनियमच्या फ्रेमला लावलेले रबरी वॉटरप्रूफिंग खरडू लागले. एखाद्या दिवशी ते आवरण निघाले तर टँकच फुटायचा या भीतीने त्याला विहिरीत सोडून देण्याचा विचार करणे भाग पडले. मग आमच्या गल्लीतच पानशांच्या विहिरीत त्याला सोडून दिले. मुलं खूप नाखुश झाली. मग त्यांना बरे वाटावे म्हणून टँकमध्ये मासे आणून सोडले. मुलांना तर फारच आनंद झाला. पण, धी देखा मगर बडगा नही देखा, अशी अवस्था झाली. त्या माशांची आणि टँकची देखभाल हा एक नवीनच व्याप अप्पांच्या मागे लागला. थोडे दिवस गंमत झाली. मग झाली टाळाटाळ सुरु आणि शेवटी ते सगळे येऊन पडले अप्पांच्याच अंगावर,
मुलांची हौस म्हणून आपण आजपर्यंत सांभाळला हा टँक. आता विकायचे खरे तर जिवावर येते, बघाना किती छान दिसताहेत हे गोरामी, चंदेरी, गुलाबी लांबट, सतत ओठांची उघडझाप करत आपले काळे मण्यांसारखे डोळे लावून संथ तरंगत असतात. हे पसरट एंजल, हे चळवळे पांढरे, नारिंगी गोल्ड फिश, सुंदर झुपकेदार झग्यासारखे त्याचे पंख म्हणजे जणू सुंदर झगा सावरत सावरत चर्चमध्ये निघालेली एखादी ख्रिश्चन वधू आणि हा गोरामी म्हणजे एखादा पाद्री जर आडवा होऊन तरंगला ना तर अगदी या गोरामीसारखा दिसेल असे अप्पांना वाटायचे. ओठांची कायम उघडझाप चालायची चर्चमध्ये सरमनच देतोय! अप्पांनी त्याचे नाव पाद्रीच ठेवलं होतं. टँक साफ करता करता पायांशी गप्पा मारणं अप्पांना खूप आवडायचं.
अप्पांच्या मनात असे विचार चालू असतानाच शेपटीला एक हलकासा झटका देऊन गोरामी काचेजवळ येऊन ओठांची उघडझाप करत अप्पांकडे काळ्या मण्यासारखे डोळे लावून पहात बसला. अप्पांनी काचेवरुन त्याच्यावर मायेने हात फिरवला. म्हणाले, “काय पाद्रीबुवा, कसं काय बरं आहे ना?” पाद्याने ओठांची उघडझाप केली आणि आपले मण्यासारखे डोळे अप्पांकडे लावून तो एकटक त्यांच्याकडे पाहू लागला.
त्याच्याकडे पहाता पहाता अप्पा पण हळूहळू आडवे होऊन तरंगायला लागले! शेपटीला एक हलकासा झटका देऊन ते सुळकन् हॉलमधून मधल्या पॅसेजमधे आले आणि तिथून ते बेडरूममध्ये शिरले.
बेडरूममधे बाल्कनीच्या दाराजवळ बसून मॅडम मॉमचे नवीन तांदूळ निवडण्याचे काम चालू होते. अप्पा त्यांच्या तोंडासमोर आले. ओठांची उघडझाप करत राहिले. पण मॅडम मॉमचे लक्षच नव्हते! अप्पांची फिरायला जायची वेळ झाली होती. ते पटकन हँगरवरुन शर्ट पँट घ्यायला गेले! शर्ट पँटच्या आजूबाजूने एक दोन गिरक्या घेतल्या. मग त्यांना हसू (?) आले. पाद्री शर्ट पँट घालतो का?
त्यांनी शेपटीला एक झटका दिला आणि पॅसेजमधून सरळ फ्लॅटच्या लोखंडी जाळीच्या दरवाजातून सुळकन बाहेर पडले आणि तरंगत तरंगत लिफ्टपाशी आले. लिफ्टचे बटण दाबायला हात वर केला तर एक पंख फडफडला! त्यांनी मग दुसऱ्या मजल्यावरुन मधल्या चौकातून थेट खाली सूर मारला आणि लिफ्ट आणि जिन्याच्या मधल्या पॅसेजमधून ते थेट सोसायटीच्या मेन गेटपाशी आले. सोसायटीचा वॉचमन तिथे स्टुलावर बसून तंबाखू मळत होता. त्याने नेहमीसारखा सलाम ठोकला नाही म्हणून अप्पा त्याच्या तोंडासमोर ओठ हलवीत तरंगत बसले. पण त्याचे काही लक्ष गेले नाही. तंबाखू गालफडात सारून तो ब्रह्मानंदी टाळी लागल्यासारखा समोर पहात होता पण अप्पांकडे त्याचे लक्ष नव्हते.
जाऊ दे! म्हणून अप्पा गेटच्या बाहेर पडले आणि मुख्य रस्त्यावरून निघाले. वरून म्हणजे अगदी पहिल्या मजल्याच्या उंचीवरून! त्यांना खूप आश्चर्य वाटत होते आणि मजाही! तसेच ते कोपऱ्यावर आले. तिथे एक नवे भव्य ज्युवेलरीचे दुकान होते. त्याच्या प्रचंड शोकेससमोर अप्पा थबकले. शोकेससमोरून या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत, खालून वर वरून खाली असे तरंगत त्यांनी सगळी शोकेस निरखून पाहिली! लखलखीत दागिन्यांचा झगमगाट अगदी काचेला ओठ टेकवून त्यांनी पाहिला. मग त्यांनी आत जायला इकडे तिकडे पाहिले. काचेच्या दारावर एक धिप्पाड रखवालदार उभा होता. त्याच्या झुपकेदार मिशासमोर अप्पा ओठ हलवत तरंगत राहिले! येवढ्यात एका गि-हाईकासाठी त्याने दरवाजा उघडला. तसे अप्पा पण त्यांच्या मागे आत सटकले! प्रत्येक शोकेससमोर जाऊन काचेला ओठ टेकवून त्यांनी सर्व दागदागिने निरखून पाहिले. उद्या मॅडम मॉमला पण घेऊन यायचे. तिला पण दाखवूगंमत असे म्हणून त्यांनी शेपटीला एक झटका दिला. आणि दुकानाच्या मधल्या गोलाकार जिन्यातून त्यांनी थेट वरच्या मजल्यावर सूर मारला! वर तर काय इंद्राचा दरबार! पण आता त्यांना बाहेर पडावेसे वाटू लागले! परत खाली सूर मारुन ते मघाच्याच गि-हाईकाच्या मागोमाग बाहेर पडले.
तरंगत तरंगत पुढे निघाले. त्यांची रोजची लायब्ररी आली. त्यांनी गंमत करायचे ठरवले. लायब्ररी पहिल्या मजल्यावर होती. ते सरळ खिडकीतून आत घुसले. पहिल्या दालनात वाचनालय होते. टेबलावर वर्तमानपत्र ठेवली होती. आणि तिन्ही बाजूला म्हातारी मंडळी (म्हातारी? मग मी कोण? त्यांना हसू आलं. स्वतःला म्हातारा समजत नाही म्हणून!) गंभीर चेहऱ्याने बसली होती. जणू कोणाला पोचवायलाच आले आहेत. एकाच्याही चेहऱ्यावरं औषधाला पण हसू नव्हते. नेहमीप्रमाणेच तिथून त्यांनी चटकन काढता पाय (पाद्याला पाय आहे का?) घेतला आणि ते पुढच्या देवघेव काऊंटरवर ते आले.
इथं त्यांना बरं वाटलं. काउंटरवरच्या मुली हळू आवाजात एकमेकिंशी कुजबुजत होत्या. हळूच हसत होत्या, चिमण्यांसारख्या! चिमण्या जशा दाणे टिपतात, भुर्रकन उडून जातात, पुन्हा येतात, चिवचिव करतात, दाणे टिपतात, भुर्रकन उडून जातात तशा त्या मुली काऊंटरवरून पुस्तक घेत होत्या. भुर्रकन आत जाऊन नवीन पुस्तकं आणत होत्या. अप्पांना खूप बरं वाटलं. त्या काऊंटरवर इकडे तिकडे त्यांनी चिमण्यांचा खेळ पाहिला आणि मुख्य लायब्ररीयन बाईंच्या समोरुनच ते खिडकीतून पुन्हा बाहेर पडले.
रस्त्यावरून तरंगत तरंगत ते त्यांच्या नेहमीच्या बागेकडे निघाले. बागेच्या रस्त्याच्या दुतर्फा भाजीवाले भाज्यांचे, टोमॅटो, रताळी, मटारचे ढिगारे लावून बसले होते. अप्पांनी त्या ढिगाऱ्यांच्या आजूबाजूने चकरा मारल्या, ओठ टेकवून निरखून पाहिले आणि ते बागेच्या फाटकासमोर आले फाटकाच्या समोर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस एक पाण्याची भली प्रचंड टाकी होती. तिला खूप खांब होते. अप्पांना नेहमी वाटायचे या टाकीवरून ही बाग पहावी. मनात विचार येताच त्यांनी शेपटीला झटका दिला आणि वर सूर मारला! टाकीच्या खांबांना चक्कर मारत तेटाकीवर जाऊन पोचले!
वरून खालची बाग, भाजी बाजार त्यांना फिश टँकमधल्या डेकोरेशनसारखा वाटला! बागेचा लंबवर्तुळाकार आकार, एका बाजूला कारंजे, दुसऱ्या बाजूला पुतळा, छोटीशी पायवाट, त्यावर बागडणारी छोटी छोटी मुलं, बाकांवर बसलेली माणसं. घोळक्याने बसलेली माणसं हिरवी हिरवी हिरवळ, चारी बाजूंना उंच उंच वाढलेली रेन ट्रीची झाडं अशी ती बाग एखाद्या फिश टँक सारखी सुबक दिसत होती! अंधार पडायला लागला होता. बागेतले दिवे आणि बाजारातल्या दिवट्या यांनी तो परिसर अगदी खुलून दिसत होता.
अप्पांनी टाकीवरून सरळ रेनट्रीकडे मोर्चा वळवला आणि वरून थेट खाली सूर मारला! बागेला एक चक्कर मारली. छोटी छोटी मुलं पळापळी करीत होती. त्यांच्यामागे थोडा वेळ तरंगले, हिरवळीला चिकटून पाणी मारलेल्या हिरवळीचा थंड गारवा मनसोक्त घेतला. आणि शेपटीला एक हलकासा झटका देऊन ते आपल्या नेहमीच्या बाकाकडे निघाले, बाक रिकामाच होता. बाकावर येऊन बसले (का टेकले? पाद्री काय करतो? त्यांच्या मनात विचार आला) ओठांची उघड झाप जरा जास्त जोर जोरात केली आणि ते गप्प तरंगू लागले.
बाग बंद व्हायची वेळ झाली. वॉचमन चक्कर मारून लोकांना उठवायला लागला. अप्पांच्या बाकाजवळ आला पण तिथे कोणीच नाही असे पाहून त्याने हातातली काठी जोरात बाकावर आपटली. अप्पांनी अंग सावरले म्हणून बरे, नाहीतर चांगला फटका बसला असता! हळू हळू सगळी मंडळी बाहेर पडली. अप्पा पण आता कंटाळले. ते तसेच बाकाला टेकून राहिले! डोळे मिटून (पाद्री डोळे मिटतो का? कधी बघितले नाही. आज बघीन असा विचार त्यांच्या मनात आला.)
कोणीतरी जोर जोरात ढकलतंय असं त्यांना वाटलं. त्यांनी ओठांची जोरजोरात उघड झाप केली आणि डोळे वर करून पाहिले. एकदम दचकलेच ते. केवढा तरी मोठा जबडा! मोठे मोठे डोळे! मोठे दात!! त्यांनी शेपटीला एक झटका दिला आणि झटकन पळायला लागले.
मॅडम मॉमना कळेना हे अप्पा असे ओठ काय हलवताहेत, हातापायाला झटके देऊन कुठे चाललेत जमिनीवरून सरपटत! त्यांनी पुन्हा त्यांना जोरजोरात हलवलं आणि म्हणाल्या, “अहो, हे काय चालवलंय काय तुम्ही? आणि हा कसला चावटपणा? शोभतं का हे असलं या वयात?”
अप्पा पूर्ण जागे झाले. आपण जमिनीवर झोपून सरपटतोय हे पाहून त्यांना जबरदस्त झटका बसला, पटकन बंसून ते मॅडम मॉमकडे तोंड वासून पहातच राहिले.
मॅडम मॉम खदखदून हसायला लागल्या. आता मात्र कमाल झाली बाई! अहो टँक साफ करायचे सोडून तिथेच आडवे झालात की काय?
आता मात्र हद्द झाली. तो टँक आता काढलाच पाहिजे. मी पाहिलेय त्याच्यासाठी एक गि-हाईक. आपला वॉचमन आहे ना, त्याला विचारलंय मी परवा. पन्नास रुपयांना घेईन म्हणाला,”
“काय? पन्नास रुपये फक्त? अग, चारशे रुपयाला घेतला होता मी तो. आता त्याचे इतक्या वर्षांनी निदान निम्मे पैसे तरी मिळायला हवेत.”अप्पा म्हणाले.
“अहो, विसरा आता ते. फुकट नाही मागत हे नशीब समजा. जाऊ दे जातोय ते. नाहीतरी कुणी गि-हाईक नाही ना मिळत तुम्हाला? तो बघा तुमचा तो पाद्रीपण बघतोय तुमच्याकडे टकमक!” मॅडम मॉम म्हणाल्या.
आता काय बोलणार? अप्पांनी एकदा पाद्याकडे पाहिलं. हताशपणे. मग त्यांना वाटलं हा फिश टँक तर चालला. या आमच्या सोसायटीमधले सगळे वीस ब्लॉक्स म्हणजे पण असेच फिश टँक नाहीत का? एका ठराविक मर्यादेत फिरणारे? आपणही त्या पाद्यासारखेच फिश नाही का? हे टँक किती दिवस आणि कोण सांभाळणार आणि कोण सांभाळतोय?
त्यांना गदिमांचे गाणे आठवले..
उंबरातले किडे मकोडे उंबरि करिती लीला
जग हे बंदीशाळा! जग हे बंदी शाळा
–विनायक अत्रे
Leave a Reply