२९ सप्टेंबर २०१६ रोजी लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केला. काश्मीरमधल्या भारतीय लष्कराच्या उरी तळावर दहशतवाद्यांनी १८ सप्टेंबर २०१६ रोजी हल्ला केला होता. त्यात १९ भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय लष्कराच्या पॅरा SFने धाडसी मोहीम आखून, पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून, २९ सप्टेंबर २०१६ रोजी सर्जिकल स्ट्राईक केला होता. २५ पॅरा कमांडोंनी मध्यरात्री १२ ते पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान केलेल्या या धाडसी कारवाईत, तब्बल ४० ते ५० दहशतवाद्यांचा निप्पात केला होता. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे लेफ्टनंट जनरल निंभोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही लष्करी कारवाई केली गेली होती.
पाकिस्तानच्या हद्दीतील नेमक्या कोणत्या तळांवर हल्ला करायचे हे आदल्या दिवशी निश्चित झाल्यानंतर लष्कराच्या विशेष तुकडीने रंगीत तालीम केली.
प्रत्येकाची जबाबदारी आधीपासून निश्चित असल्याने प्रत्यक्ष कार्यवाहीवेळी अंतर्गत समन्वयाचा फारसा प्रश्न नव्हता. लष्करी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नियंत्रण रेषेलगत उतरल्यानंतर तुकडीतील कमांडो अंधारात उपयुक्त ठरतील अशी उपकरणे आणि अत्याधुनिक आयुधे घेऊन नियंत्रण रेषा ओलांडत नकाशाच्या आधारे मार्गस्थ झाली. त्यानंतर एकापाठोपाठ लक्ष्य भेदण्यास सुरूवात झाली. अवघ्या काही तासात विद्युतगतीने सहा ते सात ठिकाणी अकस्मात नेमकी कारवाई झाल्यामुळे शत्रूच्या गोटात भंबेरी उडवत विशेष तुकडीतील ‘कमांडो’ दोन ते अडीच किलोमीटरचे अंतर पायी कापत पुन्हा भारतीय हद्दीत परतले..
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply