नवीन लेखन...

फ्लोटिंग स्कुल – तरंगणारी शाळा

१० वर्षांपूर्वी जेव्हा ब्राझील मध्ये मी पहिल्यांदाच जहाजावर गेलो होतो. अजूनही आठवतंय आयुष्यातील पहिलाच विमानप्रवास तोही एमिरेट्स च्या विमानाने. क्रिकेट मॅच किंवा टेनिस मॅच बघताना फ्लाय एमिरेट्स ची जाहिरात बघायचो तेव्हा काही कळायचं नाही की फ्लाय एमिरेट्स म्हणजे नक्की काय प्रकार आहे. जेव्हा एमिरेट्सच्या विमानात बसलो आणि प्रत्यक्ष आकाशात उडालो तेव्हा कळले फ्लाय एमिरेट्स ची एवढी जाहिरात का करतात ते.

ब्राझीलच्या साओ पाउलो या शहरात जायचे होते ज्या शहराचे नाव पहिल्यांदाच ऐकत होतो त्या शहरात जाण्यासाठी दुबईला उतरून पुन्हा एकदा एमिरेट्सच्याच विमानाने जायचे होते. मुंबई ते दुबई तीन ते साडेतीन तास काही वाटलं नाही. विंडो सीट नव्हती तरीपण दुबईला विमान खाली उतरत असताना विंडो सीटवर बसलेल्या युरोपियन व्यक्तीने दुबईतील पाल्म जुमेरा या मानव निर्मित बेटाचे दर्शन घडवून आणले. काही तासानंतर दुबईहून साओ पाउलो साठी विमान होते फ्लाईट डिटेल्स वरून अगोदरच कल्पना होती की पुढचा प्रवास नॉनस्टॉप अठरा तासांचा आहे. विमान नॉनस्टॉप अठरा तास उडू शकते हे सुद्धा मला माहिती नव्हते त्यामुळे एका खुर्चीत अगोदर साडेतीन तास आणि नंतर अठरा तास बसून प्रवास करावा लागेल या कल्पनेने बेजार झालो होतो. मुंबई ते दुबई भारतीय पद्धतीचे जेवण असल्याने काही वाटले नव्हते. पण नंतर ब्राझील आणि अरेबिक खाद्यपदार्थ असणारा मेन्यू बघून जास्त बेजार झालो. फक्त मस्का पाव ,फळे आणि अंडी असली तरच पोटात काहीतरी ढकलायची इच्छा होत होती.

कसाबसा सलग अठरा तासांचा प्रवास पूर्ण करून ब्राझील च्या साओ पाओलो शहरात उतरलो. इथून पुन्हा एकदा ब्राझील मध्ये डोमेस्टिक फ्लाईट पकडून 2 तासांच्या अंतरावर असलेल्या बेलेम या शहरात उतरायचे होते. टॅम एयरवेज च्या लहान विमानाने बेलेम ला पोचलो रात्र झाली होती त्यामुळे तिथला एजेंट हॉटेलवर सोडायला आला होता जाताना रस्त्यात घोळक्या घोळक्यात लोक दिसत होती काहींच्या हातात तर पिस्तूल वगैरे पण दिसत होतं. जाताना एजंट मोडक्या तोडक्या आणि बोबड्या इंग्रजीत सांगून गेला , माय फ़्रेंद दोंत गो ऑऊत थिस इस माफिया एरिआ. दुसऱ्या दिवशी सकाळी एजंट येऊन बोलला की जहाजाने मध्यरात्री शहर सोडले आहे आपण इमिग्रेशन फॉर्म्यालिटी करून बार्करेना नावाच्या शहरात कार ने जाऊ तिथे जहाज संध्याकाळपर्यंत पोचणार आहे.

इमिग्रेशन क्लीयर होऊन कार ने जवळपास 3 तासाचा प्रवास करून जहाजावर पोचलो एकदाचा. हा प्रवास अत्यंत अविस्मरणीय असा होता कारण कारने जाताना ब्राझीलचे अप्रतिम निसर्ग सौंदर्य पाहायला मिळाले सगळीकडे हिरवेगार मैदान आणि त्यांच्या कडेला हिरवेगार मोठे मोठे वृक्ष. या मैदानांवर गुरढोर, डुकरं चरताना दिसायची. ब्राझील बीफ आणि पोर्क चा निर्यातदार देश असल्याने ते साहजिकच होत.

लहान असताना जेव्हा आठवतंय तेव्हापासून जेव्हा जेव्हा भाऊच्या धक्क्यावरून रेवस मार्गे मंडव्याला मामा कडे जाताना समुद्रात उभ्या असलेल्या मोठं मोठ्या बोटी आणि टेकड्यांसारखे विशाल जहाजं बघत जायचो त्या जहाजावर दिसणारे खलाशी लाँच जवळ आली की प्रवाशांना हात उंचावून दाखवायचे. मी लहान असताना लाँच मधून त्या खालाशांचे जीवन कसे असेल ते काय करत असतील याची कल्पना मनातल्या मनात करत असायचो. पण लहानपणी रंगवलेल्या कल्पना वयाच्या पंचविसाव्या वर्षी अचानकपणे ध्यानीमनी नसताना प्रत्यक्ष अनुभवायला मिळाल्या. परंतु काल्पनिक आणि वास्तविक जीवनातला फरक हळू हळू स्पष्ट होत गेला.

एक वर्षाच्या ट्रेनिंग मध्ये भारतीय नौसेनेच्या जहाजांवर जाण्याचा योग आला होता कारण प्री सी ट्रेनिंग मध्ये वर्कशॉप ट्रेनिंग हा अभ्यासक्रम मुंबई नेव्हल डॉकयार्ड येथे मिळाला होता.

आय एन एस विराट, मुंबई, दिल्ली,अजय,तलवार,गोदावरी, बेतवा या युद्धनौका आणि काही पाणबुड्यांवर सुद्धा जायला मिळाले होते. परंतु मी ज्या जहाजावर पाऊल ठेवलं होतं ते या सर्वांपेक्षा प्रचंड मोठे होते सुमारे 183 मीटर लांब आणि 45 मीटर रुंद. अकोमोडेशन तर जवळपास सहा मजली बिल्डिंग एवढ मोठं होत. जहाजावर पहिली रात्र हॉस्पिटल रुम मध्ये काढल्यावर दुसऱ्या दिवशी स्वतंत्र खोली मिळाली.

बार्करेनाला डीसचार्जिंग पूर्ण करून जहाज अमेझॉन नदीमध्ये पुढील 3 दिवस सतत पुढे पुढे जात होत समुद्र संपून खाडी कधी लागते आणि खाडी संपून अमेझॉन नदी कधी लागते ते कळायला कोणताच मार्ग नव्हता कारण आजवर अमेझॉन नदी पुस्तकात वाचून जगातील सगळ्यात मोठी नदी आहे एवढंच माहित होत. सतत 3 दिवसांपेक्षा जास्त म्हणजेच एका तासाला 14 knots × 1.852 म्हणजे सुमारे 25 किलोमीटर म्हणजेच प्रतिदिन सुमारे 600 किलोमीटर असे तीन दिवसात सुमारे 1800 किलोमीटर समुद्रापासून लांब जहाज अमेझॉन नदीत पुढे जात होत. या 1800 किलोमीटर मध्ये एकसुद्धा पूल पाहण्यात आला नाही. माझे जहाज पाण्याखाली 10 ते 11 मीटर म्हणजेच सुमारे 30 ते 35 फूट खोल असते. अमेझॉन नदीचे पात्र आणि त्यातील पाण्याची खोली समुद्रापासून 1800 किलोमीटर आत गेले तरी पाण्याची खोली 35 फुटांपेक्षा जास्त आणि आजवर एवढं प्रगत तंत्रज्ञान असून सुद्धा एकसुद्धा पूल न बांधण्याऐवढं रुंद आहे. मनौस या शहरापर्यंत सुमारे 1800 किलोमीटरचे नदीपात्र तर मी स्वतः पाहिले आहेत त्याच्यापुढे देखील काही जहाजे जाताना दिसायची.

अमेझॉन नदी आणि तिच्या खोऱ्यातील निसर्गसौंदर्य आयुष्यातील पहिल्याच जहाजावरील पहिल्याच सफरीत आणि पहिल्याच विमानप्रवासासह पहिल्याच परदेशवारीत पाहायला आणि अनुभवायला मिळाले.

मनौस शहरात गेल्यावर जहाजाला खूप दिवस अँकर मिळायचा म्हणजे जहाजातील कार्गो साठी किनाऱ्यातील टाक्यांमध्ये जागा नसल्याने नांगर टाकून थांबवले जायचे.

असाच मोठा अँकर मिळाल्यामुळे एका दिवसासाठी आमच्या चीफ इंजिनीयरने अमेझॉन रिव्हर सफारी अरेंज केली ज्यामध्ये एका लहानशा स्पीड बोटीत अमेझॉनचे जंगल आणि त्याच्या खोऱ्यात राहणाऱ्या लोकांचे व प्राण्यांचे राहणीमान दाखवले जाते. एका छोट्या बोटीत तिथला एक गाईड नदीच्या पात्रात असणारे प्राणी मोठं मोठे वृक्ष दाखवत नेत होता. मनौस शहर हे रिओ निग्रो आणि अमेझॉन नदी यांच्या संगमावर आहे निग्रो नदीचे पाणी नावाप्रमाणेच काळ कुट्ट दिसत तर अमेझॉन नदीचे पाणी पावसाळा असेल तर गढूळ अन्यथा नितळ दिसतं. दोन्ही नद्यांचे पाणी एकमेकांत मिसळायला खूप वेळ जातो पुढील कित्येक किलोमीटर दोन नद्यांच्या पाण्यातील रंगाची रेष दिसत राहते. दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे दोन नद्यांच्या पाण्याच्या तापमानात सुमारे 10℃ चा फरक असतो समजा दोन नद्यांच्या न मिसळणाऱ्या पाण्यातील रेषेवर बोट बरोबर मध्यभागी उभी केली तर उजव्या बाजूला असणाऱ्या रिओ निग्रो चे पाणी हाताला कोमट लागतं आणि तेच डाव्या बाजूला असणाऱ्या अमेझॉन चे पाणी थंडगार लागतं.

मोठमोठाल्या मगरी आणि सुसरींचे पिंजरे बनवले गेलेत ज्यामुळे पर्यटकांना कधीही विशाल मगरी आणि सुसरी बघायला मिळतात. माणसाला फाडून खाणारे पिरान्हा माश्यांबद्दल पहिल्यांदाच ऐकलं आणि पाहिलं त्यामुळे अमेझॉन नदीत चुकून सुद्धा पडायला नको असं मत तयार झालं. नदीतुन पुढे जात असताना एका लहान मुलाने काहीतरी इशारा केला त्याला इंग्रजी येत नव्हते गाईड सोबत त्याने पोर्तुगीज भाषेत काहीतरी बोलणं केलं आणि गाईड आम्हाला म्हणाला त्याच्याकडे एक पाळीव प्राणी आहे पैसे घेऊन तो तुम्हाला त्या प्राण्यासोबत फोटो काढायला देईल. आम्ही तयार झाल्यावर त्या लहान मुलाने एक भला मोठा जिवंत अजगर बाहेर काढला. गाईड ने सांगितले हा आहे अमेझॉन मधील बेबी ऍनाकोंडा. त्या ऍनाकोंडाला आम्ही गळ्यात घालून फोटो वगैरे काढले पण नंतर राहून राहून एकच विचार येत होता की ऍनाकोंडा हा काही पाळण्यासारखा प्राणी आहे का?

अमेझॉन चे वर्षावन पाहता पाहता पाण्यात अनेक खांबांवर उभी असलेली घरे पहिली त्यात कुटुंब रहात होती. नंतर एका ठिकाणी तरंगणाऱ्या लाकडी खोल्या दिसल्या जस जशी बोट जवळ गेली तर त्या खोल्यांमध्ये लहान लहान मुलं दिसू लागली आम्हाला आत जाऊ दिले आत त्या खोल्यांमध्ये शाळा भरली होती. तीच होती फ्लोटिंग स्कुल. पूर्णपणे पाण्यावर तरंगणारी शाळा. काही वेळातच शाळा सुटली आणि त्या शाळेत आलेली लहान लहान मुले त्यांना घ्यायला आलेल्या पालकांसोबत ऐटीत बोट मध्ये बसून आप आपल्या घरी जाताना दिसत होती.

आज सुमारे 10 वर्षांनंतर सुद्धा ब्राझील सफरीवरील अमेझॉन नदीची विशालता तिचे अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि सृष्टी आजही डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी राहते. ऑब्रिगडो म्हणजे धन्यवाद आणि अमिगो म्हणजे मित्र हे दोन पोर्तुगीज शब्द पण कायम लक्षात राहिलेत.

© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनीयर
कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..