लोकगायक प्रल्हाद शिंदे यांचा जन्म १९३३ साली अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव येथे झाला.
ऐका सत्यनारायणाची कथा, पाऊले चालती पंढरीची वाट, चल गं सखे पंढरीला, बाप्पा मोरया रे, उड जायेगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली… अशी शेकडो भक्तिगीते, भावगीते, कव्वाली, कोळीगीते गाऊन आपल्या गायकीचा वेगळा ठसा उमटवणारी शिंदे यांची गाणी आजही मराठी रसिकांच्या हृदयात घर करून आहेत.
प्रल्हाद शिंदे यांचा परिवार ते लहान असताना दारिदय, दुःख, अवहेलना,अपमान पचवित मुंबईत आला. गायनाची कला मुंबईच्या रस्त्यावर, रेल्वे स्टेशनजवळ सादर करून पोट भरण्याची त्यांना हक्काची जागा सापडली होती. त्यात त्यांची आई, भाऊ, बहिणीही गात असत. कलाकार आकाशातून तुटलेला तारा नसून त्याला अवतीभोवतीचे वातावरण विनविते. त्याच मुशीतून त्यांनी गीते गायली आणि बहुजन समाजाचा मातीतला गायक म्हणून नेहमीच जनतेच्या कायमचा हा महाकलाकार लक्षात राहिला.
शिंदे यांनी पैसा कमावला नसेल! पण उभ्या महाराष्ट्रात पायाला भिंगरी लावल्यापमाणे ते गायनासाठी भटकले. त्यामुळे त्यांनी माणसे जोडली आणि जात, धर्म यांच्या पलीकडे जाऊन ते पोहोचले. प्रल्हाद शिंदे आपल्या गाण्याच्या कार्यक्रमाचा शेवट एका आगळ्या वेगळ्या गीताने करीत तेव्हा ते बाबासाहेबांची अंत्ययात्रा चालली आहे आपलेच नव्हे तर सगळया बांधवांचे बाबा शांत झोपले आहेत. त्यांना आदरांजली अर्पण करु या असे जेव्हा ते म्हणत. तेव्हा जनसमुदाय गंभीर होई. आणि मग ते आपल्या गात्या गळयाने हळुवार सहज म्हणून जात. ‘अरे सागरा शांत हो जरा येथे भीम माझा निजला’.
त्यांचे गाणे म्हणजे केसांना गिरकी मारावयास लावून, मानेला असा काही झटका देत की गाणे देखील झटकाबाज असेलच आणि रसिक जोरजोरात टाळया वाजवून त्यांना प्रोत्साहन देत. थोडक्यात त्यांच्या गायनात नेमका अभिनय म्हणजे अॅक्टिग असायची आणि लोक म्हणायचे यालाच म्हणायचे प्रल्हाद शिंदे दादा.
बुद्ध धर्माची गाणी, डॉ. बाबासाहेबांची गाणी, कीर्तन, भजन, लोकगीते घराघरात पोहोचविणारे ते एका अर्थी महागायकच होते. त्यात प्रबोधन गीतेही असत. अशा मातीतल्या कलाकाराला रसिकांनी चक्क डोक्यावर घेतले. त्यांना आर्थिक स्थैर्य लाभले नसेन अथवा कॅसेट कंपन्या गब्बर झाल्या असतील. त्यांना कदाचित हे आर्थिक गणित जमलेही नसेल. पण त्यांनी मातीतल्या लोकांच्या मनावर गायनाने राज्य केले. हे आपल्याला मान्य करावे लागेल. त्यांचा खणखणीत बांगडी सारखा गाता गळा त्या गळयाने कदाचित शास्त्रीय बाज जपला नसेला, पण वंशपरंपरागत घराण्याच्या गळयातून झिरपणारा सूर मात्र त्यांनी सांभाळला होता हे नाकारून चालणार नाही. कुणी गुरू नव्हता. कुणी मास्तर नव्हता. एकलव्यासारखा हा कलाकार शिकला आणि गात राहिला.
तबलावादन त्यांना उत्तम जमे. नव्हे तर तबला त्यांच्या मैफलीत त्यांनीच वाजवावा अशी फर्माइश असायची. प्रल्हाद शिंदे यांचा ग्रामीण मराठी गीतांबरोबर उर्दू गाणी गाण्यात हातखंडा होता.
जानी बाबू, अजीज नाजा, युसूफ आझाद, शंकर शंभू- अशा बड्या बड्या कलाकारांसमोर त्यांनी कव्वाली सामना केलेला होता. प्रल्हाद शिंदे यांनी दहा हजार गाणी गायली होती. महाकवी वामनदादा कर्डक यांनी लिहिलेले शेवटचे गीत आणि शिंदे यांनी शेवटचे गायलेले गीत हे अखेरचे गाणे होते.
आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, चंदकांत शिंदे या मुलांनी व त्यांच्या नातवांनी ही प्रल्हाद शिंदे यांच्या गाण्याचा वारसा मात्र जपला आहे. ॅ
प्रल्हाद शिंदे यांचे २३ जून २००३ साली निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply