प्लास्टिकच्या डब्यात खायचे पदार्थ किंवा औषधे ठेवली तर ती शरीराला अपायकारक ठरतात का? हा प्रश्न वारंवार विचारला जातो. असे डबे पॉलिथिलिनपासून बनवले जातात. पॉलिथिलिन दोन प्रकारे बनवले जाते. हे दोन्ही प्रकार मुळात बिनविषारी प्रकारात मोडतात. पॉलिथिलिनचा मानवी शरीरावर अजिबात परिणाम होत नाही हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. पॉलिथिलिन हे एकमेव प्लास्टिक असे आहे की, ज्यावर कोणत्याही द्रावकाचा (सॉल्व्हंट) परिणाम होत नाही. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर पॉलिथिलिन कोणत्याही द्रावात विरघळत नाही.
याचाच फायदा घेऊन पॉलिथिलिनपासून बनवलेल्या डब्यात खाद्यपदार्थ आणि औषधे ठेवता येतात. पाणी पिण्यासाठी याच कारणाने प्लास्टिकचे भांडे वापरायला काही हरकत नाही. मात्र असे भांडे अथवा कोणताही डबा वारंवार साफ करून वापरला पाहिजे. पाण्यात प्लास्टिक विरघळेल अशी भीती बाळगायचे कारण नाही.
धातूच्या भांड्याप्रमाणे प्लास्टिकची भांडी स्वयंपाकासाठी गॅसवर ठेवता येतील का? असाही प्रश्न विचारला जातो. प्लास्टिक जास्त उष्णतेत टिकू शकत नसल्याने भांडे गॅसवर ठेवता येणार नाही. मात्र निर्लेपची भांडी स्वयंपाकासाठी गॅसवर वापरता येतात. या भांड्यात धातूवर आतल्या बाजूला टेफ्लॉन ऊर्फ पॉलिटेट्रा फ्लुरो इथिलिन या प्लास्टिकचा थर दिला जातो.
टेफ्लॉन उष्णताविरोधक असून त्याच्या विशिष्ट गुणधर्मामुळे भांड्यात शिजवला जाणारा पदार्थ भांड्याला चिकटत नाही. तसे पाहिले तर सर्व प्लास्टिकच्या वस्तू चटकन जळतात असा लोकांचा समज आहे. पॉलिस्टायरीन किंवा सेल्युलोज नायट्रेट प्लास्टिकपासून बनवलेल्या या वस्तू चटकन जळतात. पूर्वी चित्रपटाची फिल्म सेल्युलोज नायट्रेटपासून बनवत. ती फिल्म चटकन पेट घेत असे. म्हणून नंतर सेल्युलोज अॅसिटेटपासून फिल्म बनवण्यात येऊ लागली. ही फिल्म सुरक्षित असून ती लवकर पेट घेत नाही.
स्वयंपाकघरात वापरण्यासाठी हल्ली युरिया फॉर्मल्डिहाइड किंवा मेलॅमिन फॉर्मल्डिहाइडपासून बनवलेली भांडी मिळतात. ही भांडी चिनी मातीच्या भांड्यासारखी दिसत असली तरी ती सहजी फुटत नाहीत किंवा पेट घेत नाहीत.
-अ. पां. देशपांडे, (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
Leave a Reply