फटाक्यांच्या आतषबाजीच्या आवाजाने राजा ची झोप चाळवली..
झोपलेल्या जागीच डोळे चोळत तो उठून बसला.
समोरच्या गगनचुंबी हॉटेलच्या टेरेसमधून आकाशात जाउन फुटणारे ते विविधरंगी फटाके पाहून तो हरखलाच. त्याच्या सावळ्या चेह-यावर नकळत स्मित उमटले.
फटाके राजालाही आवडायचे.
फटाके उडवून चार वर्षे तरी झाली होती आता त्याला. पण वडील गेल्यावर चाचाबरोबर कामासाठी तो मुंबईला आला आणि त्याचं बालपण संपलं. जबाबदारीच्या ओझ्याखाली चिरडलेल्या त्याच्या बालसुलभ भावना, त्या रात्री उडणा-या त्या फटाक्यांमधे कुठेतरी त्याचे हरवलेले बालपण शोधत होत्या…
त्याने वळून बाजूला झोपलेल्या आपल्या चाचाकडे पाहिले..
देशी ठर्रा पिउन तो गाढ झोपला होता. वरती उडणा-या त्या फटाक्यांनी त्याच्या घोरणा-या जीवावर काही फरक पडत नव्हता.
दूरुन भरधाव बाईक्सचा आवाज आला, तसा राजा फुटपाथ कडेला सरकून उजवीकडून येणा-या त्या गोंगाटाकडे मान बाहेर काढून पाहू लागला. सात आठ बाईक्स वर डझनभर मुले सुसाट त्यांच्या समोरुन ‘हॅप्पी न्यू इयर..sss’ असे ओरडत पुढे निघून गेले. त्यातल्या एका बाईकवर मागे बसलेल्या मुलाने आपल्या हातातली बिअरची आर्धी संपलेली बाटली राजाच्या समोर टाकली. ‘हॅप्पी न्यू इयर’ असे राजाकडे पहात ओरडला व हात केला. राजा आपल्या अंगावर बाटली येइल म्हणून घाबरुन मागे सरकला, पण नशीबाने ती बाटली रस्त्यातच पडून फुटून गेली.
पांढ-या स्फटिकासारखी बियर त्या फुटलेल्या बाटलीतून बाहेर वहात येत समोरच्या रस्त्यावर पसरली. फुटपाथ वर झोपलेल्या त्या तमाम लोकांसारखीच त्या बाटलीतून बाहेर आलेले ते फसफसते द्रवही थोड्या वेळात शांत होउन गेले.
समोरच्या हॉटेलमधे आता कर्कश्श संगीत वाजत होते. आरडा ओरड, दंगा या शिवाय राजाला त्यात काही वेगळं जाणवलं नाही. ‘बाबांनो..तुम्ही आवाज जर कमी केलात तर मला आत्ता झोपता येइल आणि उद्या सकाळी लवकर उठून कामावर जाता येईल..’ असा मनातच त्या लोकांना संबोधत त्याने शेजारी पडलेले ब्लँकेट आपल्या अंगावर घेतले आणि आपल्या अंगाखालच्या गोणपाटावर पाठ टेकली. डोळे मिटताच नकळत त्याच्या चेह-यावर हसू उमटले. नुकतीच पाहिलेली फटाक्यांची रोषनाई त्याच्या बंद डोळ्यांसमोरुन चमकून गेली.
जर एक फक्त अर्धा मिनीट तो नंतर झोपला असता तर त्याचे लक्ष ‘त्या’ म्हाता-यकडे कदाचित गेलं असतं. हॉटेलमधे गाड्यांना शिरण्यासाठी केलेल्या रँपवरुन, हळू हळू चालत काठी टेकत बाहेर आलेल्या त्या म्हाता-याला राजाने त्यामुळे पाहिले नाही.
सुधीरकुमार, हॉटेलसमोरच्या त्या बाजूच्या फुटपाथवर उभा होता.
याच फुटपाथवर, याच हॉटेलमधे, पार्टी किंवा अवार्ड समारंभांसाठी तो अनेकदा आला होता. उभ्या उभ्या त्याला सारं आठवलं. तीस वर्षापूर्वी तो गाडीतून याच फुटपाथवर उतरताच त्याच्याभोवती काहीच्या काय गर्दी व्हायची. फोटोग्राफसाठी त्याला घेरणा-या चाहत्यांना कधीही नाराज न करणारा फिल्मस्टार, म्हणून त्याची ख्याती होती. फिल्म मॅगेझीनवाले फोटोग्राफर फटाफट फ्लॅश उडवत फोटो काढत रहायचे आणि तो समोर येणा-या प्रत्येक कागदावर ‘विथ लव्ह..सुधीरकुमार’ असे लिहून सही ठोकायचा. सह्या संपल्यावर सर्व चाहत्यांना एकदा हाथ हलवून बाय करायचा, पत्रकारांकडे पाहून त्याच्या कपाळावर आपसूक येणा-या केसांना स्टाइलमधे मागे ढकलायचा व हसत हसत त्या हॉटेलमधे शिरायचा. त्याच्या त्या स्टाईलचे असंख्य दिवाने होते. सुधीरकुमार त्या काळातला फिल्म इंडस्ट्रीतला खूप यशस्वी स्टार होता आणि त्यात त्याचा हा विनयशील स्वभाव, यामुळेच तो प्रचंड लोकप्रिय होता.
त्याच्या गत काळातल्या सहकलाकारांबरोबर नववर्षाच्या आगमनाआधीची संध्याकाळ घालवून तो आता बाहेर पडला होता. त्याचे बरेच मित्र, सहकलाकार हॉटेलमधेच ठिकठिकाणी नशेच्या धुंदीत लीन होउन पडले होते. पार्टी आयोजक त्यांना घेउन जाउन त्यांच्या रुममधे कसेबसे झोपवून येत होते. सुधीरकुमारने अगदी थोडीशी वाइन प्यायली होती. कोणी आग्रह केला तर ग्लास ऊचलून तोंडाला लावायचा अन्यथा तसाच बाजूच्या टेबलवर ठेउन बसून रहायचा असे करत त्याने स्वतःचे विमान हवेत फार उडू दिले नव्हते.
त्याच्या कार ड्रायव्हरला आज त्याने सुट्टी दिली होती. घरुन हॉटेलवर तो टॅक्सीने आला होता. आताही पार्टी आयोजकांनी त्याला घरी ड्रॉप करण्यासाठी कारची सोय करण्याची तयारी दाखावली होती पण सुधीरकुमारने ती मदत नाकारली व तिथून बाहेर पडून तो आता त्या फुटपाथवर उभा होता..एकटाच..
ना सहीसाठी चाहत्यांच्या गराडा होता..
ना त्याच्या छबीचे फोटो घेण्यासाठी आसुसलेले पत्रकार ..
बाहेर येताना त्याचे लक्ष सहज समोरच्या फुटपाथकडे गेले.
एक दहा बारा वर्षाचा मुलगा ब्लँकेट अंगावर घेउन झोपी गेला.
त्याच्या सुरकुतल्या अंगावर एक शिरशीरी येउन गेली. का कोण जाणे, त्याक्षणी तो मुलगा त्याला जगातला सर्वात सुखी माणूस वाटला.
काही विचार करुन सुधीरकुमार तो मोठाला रस्ता हळूहळू ओलांडत पलिकडच्या बाजूला येउ लागला. रस्त्याचा दुभाजक ओलांडून तो त्या मुलाच्या बाजूला येणार तेवढ्यात अचानक एक ओपन टॉप जीप सुसाट वेगाने त्या रस्त्यावरुन आली. पुढे आलेला सुधीरकुमार दचकून मागे सरकला. जीप हळू करत ती मुले त्याला ‘ओ बुढ्ढे मरना है क्या..?’ अशी ओरडली. पण त्याला आधीच घाबरलेले पाहून जोरात खिदळली…’हॅपी न्यू इयर अंकल..ss’ असे वर त्याला चिडवत ती मुले निघून गेली.
या प्रसंगाने झालेल्या आवाजाने राजा परत जागा झाला.
त्याने त्रासीकपणे उठून बसत पाहिले.
ती जीप निघून गेली होती आणि एक म्हातारा रस्ता ओलांडत तो झोपला होता तिकडे आला.
सत्तरीचा तो म्हातारा, उंचपूरा, गोरापान होता. अंगात महागडासा कोट होता त्याच्या. काठी टेकत तो राजा झोपला होता तिथे आला.
राजाने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले तसे तो हसला.
‘नया साल मुबारक बच्चा…’ तो राजाला बोलला.
राजाने या जुलमाच्या रामरामाला खांदे उडवत उत्तर दिले
‘ हां..हां… तुमकोभी..’
मग त्याच्याकडे वरपासून खालीपर्यंत पहात समोर हात करत तो म्हणाला..’क्या दद्दा…वो हॉटेलसे आया ना? घर नही जाना क्या..? टॅक्सी रोकू क्या तेरे लिये..?’
सुधीरकुमार पुन्हा प्रयत्नपूर्वक हसला..
‘नही रे बच्चा, आज घर जाने का जी नही कर रहा है..’
मग काठी बाजूला ठेवत तो त्या फुटपाथवर हळूच बसला..
त्या मुलाने अर्थातच या गतकाळातल्या फिल्मस्टारला ओळखले नव्हते. एकप्रकारे ते बरेच होते, त्याने मनात विचार केला.
‘बच्चा..आज की रात मै तुम्हारे बाजूमे सो जाउ तो तुम्हे कोई एतराज तो नही है ना?’ अचानक त्याने राजाला विचारले.
त्याला वाटले तो मुलगा नाहीच म्हणेल.
राजाने पुन्हा त्याला न्याहाळले व म्हणाला..
‘मेरेको चलेगा…लेकीन ब्लँकेट एक ही है मेरे पास…तेरेको आधा ब्लँकेट चलेगा क्या..?’
सुधीरकुमार ने आपले कपाळावरचे केस मागे घेतले व हसला
‘दौडेगा बच्चा..दौडेगा…!’
राजाने आपल्या अंगाखालचे दोन पोत्यातले एक पोते काढून त्याच्या बाजूला अंथरले…अर्धे ब्लँकेट त्याला देउ केले व म्हणाला
‘चूपचाप सो जानेका हां दद्दा..खर्राटे नही भरना..मुझे निंद नही आती खर्राटोंमे..’ असे म्हणत तो दुसरीकडे तोंड करुन झोपी गेला.
सुधीरकुमारने आपल्या अंगावरचा कोट काढून घडी करुन तो उशाला घेतला. त्या मुलाने बाजूला अंथरलेल्या पोत्यावर एका अंगावर हळूच झोपत त्याने ते अर्धे ब्लँकेट आपल्या अंगावर घेतले.
त्याने डोळे मिटले तसा त्याचा जीवनपट त्याच्या डोळ्यासमोरुन सरकून गेला.
सत्तरएक वर्षापूर्वी..अशाच एका फुटपाथवर ..थंडीत..दुपट्यात गुंडाळलेला तो.. पोलीसांना सापडला होता. दोन वर्षे एका अनाथाश्रमात वाढल्यावर त्या सुंदर गोंडस बाळाला सिनेमात काम करणा-या एका आभिनेता अभिनेत्री जोडीने दत्तक घेतले होते.
चांगलं शिक्षण, चांगलं राहणीमान मिळून तो सुधीर म्हणून त्यांच्या घरी वाढला. घरच्या पार्श्वभूमीमुळे फिल्म इंड्स्ट्रीत ब्रेक ही लवकरच मिळाला त्याला. अंगातल्या टॅलेंटच्या जोरावर तो लवकरच स्टार सुधीरकुमार झाला.
चाळीस वर्षे या फिल्म इंड्स्ट्रीत त्याने काढली. एका हिरोइनशी झालेले त्याचे पहिले लग्न तीन वर्षातच मोडले. मग त्याने आपल्या सेक्रेटरीशीच दुसरा विवाह केला..अठ्ठावीस वर्षे संसार करुन,आणि दोन मुले जन्माला घालून व वाढवून, तीही दहा वर्षापूर्वी त्याला कायमची सोडून गेली.
मुलांच्या लहानपणी सतत शुटींगमधे व्यस्त असल्यामुळे सुधीरकुमारला मुलांना वेळ देता आला नाही. मोठी होइस्तोवर ते दोघे मनाने बापापासून दुरावली. मुलगी परदेशात लग्न करुन स्थायीक झाली तर मुलाने दिल्लीत आपला व्यवसायाचे बस्तान बसविले. फिल्म इंड्स्ट्रीबद्दल तिटकारा असल्याने दोघेही या क्षेत्राकडे वळाले नाहीत. आईच्या निधनानंतर तर गेली दहा वर्षे त्यांनी बापाशी कोणताही संबंध ठेवला नव्हता.
सुधीरकुमारने वळून पाहिले. तो मुलगा एव्हाना झोपी गेला होता. झोपेत त्याच्या अंगावरचे ब्लँकेट बाजूला पडले होते. तो मंदपणे घोरत होता. सुधीरकुमार हसला. त्याने आपल्या डोक्याखालचा कोट काढून त्या मुलाच्या अंगावर पांघरला.
राजाने अंगावर पडलेला तो कोट नकळत आपल्या अंगाशी जवळ ओढून घेतला..व परत घोरु लागला. सुधीरकुमारने ब्लँकेट अंगावर घेतले व तोही झोपी गेला. आज ब-याच दिवसांनी झोपेची गोळी न घेता तो गाढ झोपी गेला होता.
झोपेत त्याला स्वप्नात त्याची आई दिसत होती..मूळ आई..
तिने त्या तान्ह्या बाळाला फुटपाथवर ठेवले..
ते तान्हे बाळ रडू लागले..
तशी तिच्यातली आई रडत परत त्या फुटपाथवर आली अन रडणा-या बाळाला छातीशी कवटाळले.. बाळ हसले..
झोपेत सुधीरकुमारच्या चेह-यावारही हसु उमटले..
दुस-या दिवशी राजाला जाग आली तसा आजूबाजूच्या गोंगाटाने तो ताडकन उठून बसला. त्याच्या आणि त्या म्हाता-याभोवती लोकांची बारीच गर्दी जमली होती..
‘अरे ये तो ऍक्टर सुधीरकुमार है.. ये इधर कैसे सोये है..’
‘अरे कल रात जादा पी ली होगी..तो इधरही लुढक गये होंगे..ये फिल्मवाले ऐसेही होते है..’
असे अनेक उद्गार राजाच्या कानावर पडत होते. तेंव्हा त्याच्या लक्षात आले की रात्री आपल्या बाजूला झोपलेली ही व्यक्ती कोणी फिल्मस्टार होती.
कोणी तरी त्याला हलवलं. ‘सुधीरकुमारजी..’ म्हणून हाका दिल्या.
राजानेही त्याला हलवून ‘ओ दद्दा…उठो..सुबह हो गई..’ अशी हाक दिली.
फुटपाथवर लहानपणी सापडलेला सुधीरकुमार मात्र रात्रीच्या कुशीत सामावून गेला होता..त्याने आपली इहलोकाची यात्रा त्या फुटपाथवरच संपवली होती…
चेह-यावर एक लोभस स्मित ठेवून…!!
— © सुनील गोबुरे
Leave a Reply