नवीन लेखन...

सुखद वानप्रस्थाश्रमासाठी

काहींना मनाविरुद्ध वृद्धाश्रमात राहावं लागतं. वृद्धाश्रमासारखा ‘मानहानीकारक’ प्रकार टाळण्यासाठी अनेकजण खास ज्येष्ठांसाठी उभारलेल्या वसाहतींमध्ये राहणं पसंत करतात. या वसाहतींचं सर्वात मोठं वैशिष्ट म्हणजे ज्येष्ठांना आयुष्यातल्या संध्याकाळी स्वाभिमानाने जगता येतं. या वसाहती ज्येष्ठांच्या गरजा लक्षात घेऊन उभारल्या जातात. आवश्यक सुखसुविधांबरोबरच वैद्यकीय सुविधाही अहोरात्र उपलब्ध असतात.


संसाराचा मोह सोडून मोक्षाकडे वाटचाल करण्याचा टप्पा अशी वानप्रस्थाश्रमाची ओळख असली तरी आजचा वानप्रस्थाश्रम फारच वेगळा आहे आणि या टप्प्यात पोहोचलेल्या ज्येष्ठांच्या भावनिक आणि शारीरिक गरजांचं स्वरूप तसंच त्यांच्या समस्यांचं स्वरूपही बदललं आहे.

काही वर्षांपूर्वी मुंबईत घडलेली एका घटना सुन्न करणारी ठरली. हंसा राजपूत नामक एका मरणासन्न वृद्धेला तिच्या मुलाने तिला भर पावसात रस्त्यावर सोडून दिलं होतं. आपला मुलगा असं का वागतोय, हे त्यांना कळतंच नव्हतं. त्या तशाच पडून होत्या. तिथून जात असलेल्या एका सहृदयी डॉक्टरने राजपूत यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. कुपोषणामुळे हंसा यांची प्रकृती खालावली होती आणि त्यांना फारसं काही आठवतही नव्हतं. या घटनेतून वृद्धांच्या समस्यांचं एक वेगळंच रूप समोर आलं.

वानप्रस्थाश्रम म्हणजे संसाराची सर्व सूत्रं पुढल्या पिढीकडे सोपवून त्यामधल्या व्यापांकडे तटस्थतेने पाहण्याचा आयुष्यातला एक टप्पा. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर ‘रिटायरमेण्ट’. संसाराचा मोह सोडून मोक्षाकडे वाटचाल करण्याचा टप्पा अशी वानप्रस्थाश्रमाची ओळख असली तरी आजचा वानप्रस्थाश्रम फारच वेगळा आहे आणि या टप्प्यात पोहोचलेल्या ज्येष्ठांच्या भावनिक आणि शारीरिक गरजांचं स्वरूपही आमूलाग्र बदललं आहे. त्याचबरोबर त्यांच्या समस्यांचंही स्वरूप बदललं आहे.

करिअर, नोकरी, मुलांचं शिक्षण यासाठी धडपडताना जे करायचं राहून गेलं, ते करण्याची संधी म्हणून आता वानप्रस्थाश्रमाकडे पाहिलं जातं. आज अनेक ज्येष्ठ नागरिक स्वतःला सामाजिक कार्यात झोकून देतात, कोणी राहिलेलं शिक्षण पूर्ण करतं तर कोणी छंदांची वाट धरतं. बरेच जण आपल्या नातवंडांचे ‘पालक’ बनून मुलांना मदतीचा हात देतात. मुलगा आणि सून किंवा मुलगी आणि जावई दोघंही नोकरी करत असतील तर त्यांच्या मुलांचं पालकत्व आपोआपच आजी-आजोबांकडे येतं. नोकरी-व्यवसायाच्या धबडग्यामध्ये स्वतःच्या मुलांचं बालपण अनेकांना अनुभवता येत नाही. ती कसर आता नातवंडांच्या माध्यमातून भरून काढली जाते. मुलांच्या संसाराला आपली तेवढीच एक मदत म्हणून अनेक ज्येष्ठ नागरिक नातवंडांची जबाबदारी आनंदाने स्वीकारतात आणि ती जबाबदारीने पारही पाडतात. निवृत्तीनंतर कौटुंबिक जबाबदार्या तुलनेने कमी होत असल्या तरी आयुष्याची संध्याकाळ झाली असल्याची भावनाही मनाला हुरहूर लावून जाते. एखाद्या समवयीन मित्र किंवा मैत्रिणीला देवाज्ञा झाली की मनात शंकेची पाल चुकचुकते. मन पार हळवं बनून जातं. अशावेळी त्यांना गरज असते ती भक्कम भावनिक आधाराची. निवृत्तीचं वय गाठेपर्यंत अनेकांचे जोडीदार काळ हिरावून नेतो. अशा ‘एकट्या’ ज्येष्ठांची मनःस्थिती फारच नाजूक असते. त्यांना कुटुंबीयांची सोबत मिळणं गरजेचं असतं.

मानसिक आधाराबरोबरच समाजातल्या पायाभूत सुविधांमध्येही ज्येष्ठांच्या दृष्टीने आवश्यक त्या तरतुदी असल्या पाहिजेत. भारताची जगभरातली ओळख ‘तरुण देश’ अशी असली तरी देशातली ज्येष्ठांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे ज्येष्ठांच्या गरजा लक्षात घेऊन रस्ते, फूटपाथ, रेल्वे/मेट्रो/मोनो स्टेशन्स, बस स्टॉप, फूटपाथ, सार्वजनिक स्वच्छतागृह, पर्यटनस्थळं आदी ठिकाणी सुयोग्य बदल करणं, ज्येष्ठांसाठी विशेष आरोग्यकेंद्रांची उभारणी, एकट्या राहणार्या ज्येष्ठांसाठी सुरक्षा यंत्रणा, कौन्सेलिंग सेण्टर्स अशा सोयीसुविधा राबवणं गरजेचं आहे. आयुष्याची संध्याकाळ एकवेळ आर्थिकदृष्ट्या समृद्ध नसली तरी चालेल पण मानसिक शांतता आणि समाधान मात्र हवं, अशी अनेकांची इच्छा असते. पण सर्वांचीच ही इच्छा पूर्ण होतेच असं नाही. बरेचसे ज्येष्ठ स्वखुशीने वृद्धाश्रमाचा रस्ता धरतात तर काहींना तो धरावा लागतो. परिणामी मुंबई आणि आसपासच्या अनेक वृद्धाश्रमांची ‘वेटिंग लिस्ट’ वाढत आहे. मुलांना आपण नकोसे झालो आहोत ही भावना जेव्हा मन कुरतडू लागते तेव्हा अनेकजण वृद्धाश्रमात राहणं पसंत करतात. काहींना मनाविरुद्ध वृद्धाश्रमात राहावं लागतं. वृद्धाश्रमासारखा ‘मानहानीकारक’ प्रकार टाळण्यासाठी अनेकजण खास ज्येष्ठांसाठी उभारलेल्या वसाहतींमध्ये राहणं पसंत करतात.

या वसाहतींचं सर्वात मोठं वैशिष्ट म्हणजे ज्येष्ठांना आयुष्यातल्या संध्याकाळी स्वाभिमानाने जगता येतं. अपत्य नसलेली अनेक ज्येष्ठ मंडळी अशा वसाहतींमध्ये राहणं पसंत करतात. असे अनेकजण आहेत जे राहतं घर रिव्हर्स मॉर्गेजमध्ये देऊन त्यातून मिळणार्या पैशातून ज्येष्ठांच्या वसाहतीमध्ये घर घेतात. अनेकांची मुलं परदेशी स्थायिक झालेली असतात पण भारतात राहणार्या आईवडलांबाबत त्यांच्या मनात सतत चिंता असते. रात्री अपरात्री आणीबाणीची परिस्थिती उद्भवली तरी त्यांना मदत कोण करणार, ते सुरक्षित आहेत ना, वैद्यकीय तपासण्या वेळच्यावेळी होतात ना, हे प्रश्न त्यांना सतावत असतात. अशा अनेक ज्येष्ठांनी खास ज्येष्ठांसाठी उभारण्यात आलेल्या वसाहतींमध्ये राहण्याचा पर्याय निवडल्याचं दिसतं. यामुळे आमच्यापेक्षा आमची मुलं निश्चिंतपणे राहू लागली आहेत, असं ते समाधानाने सांगतात. या वसाहती ज्येष्ठांच्या गरजा लक्षात घेऊन उभारल्या जातात. आवश्यक सुखसुविधांबरोबरच वैद्यकीय सुविधाही अहोरात्र उपलब्ध असतात. इथल्या घरांची आणि इमारतींची रचना अशाप्रकारे केली जाते की ज्येष्ठांना वावरताना त्रास होऊ नये. त्यामुळे संभाव्य अपघातही टळतात.

या वसाहतींचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे समवयीनांचा सहवास. वेगळ्या विचारांच्या आणि स्वभावाच्या समवयीन व्यक्तींना भेटता आल्याने ज्येष्ठांना एकटेपणा जाणवत नाही. त्यांच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण होते, विविध विषयांवर मत प्रदर्शन केलं जातं, चर्चा होतात. नवीन मैत्र जुळतात आणि वेळ मजेत जातो. ज्येष्ठांच्या वसाहतीत अनेक उपक्रम राबवले जातात. त्यामुळे छंदही जोपासता येतात. उतारवय म्हणजे पैलतिरी जाण्याची वाट पाहत निराशा आणि चिंतांच्या हिंदोळ्यांवर झुलणं नसून जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्याचा एक समाधानी टप्पा आहे, हा विचार अधिक दृढ होण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वसाहती मोलाची भूमिका बजावू शकतील.

‘संध्याछाया भिववती हृदया’ अशी मानसिकता न बनता आयुष्याची संध्याकाळ ज्येष्ठ मंडळी आनंदाने आणि स्वाभिमानाने व्यतीत करू शकतील.

–रूही गावंड

(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा  दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..