भारताचे माजी अष्टपैलू कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचा जन्म ४ एप्रिल १९३३ रोजी झाला.
बापू उर्फ रमेशचंद्र गंगाराम नाडकर्णी सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटूंपैकी एक होते. त्यातही जगातला सर्वात कंजुष फिरकी गोलंदाज म्हणून ते परिचित होते. १९५५ ते १९६८ यादरम्यान ते भारतीय कसोटी संघात होते. जन्माने नाशिककर असलेले बापू १९५०-५१ मध्ये पुणे विद्यापीठाकडून रोहिंटन बरिया चषकात खेळले. त्यानंतर १९५१-५२ मध्ये महाराष्ट्राच्या संघातून त्यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. दोन वर्षांनंतर ब्रेबॉर्न स्टेडियमवर तेव्हाच्या बॉम्बे संघाविरुद्ध त्यांनी आपले पहिले शतक झळकावले. १०३ मिनिटांच्या खेळीत त्यांनी हे शतक साकारले होते. प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सातत्यपूर्ण अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर त्यांनी भारतीय संघात स्थान मिळवले.
फिरोजशहा कोटला मैदानावर १६ डिसेंबर १९५५ रोजी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात बापूंनी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पहिले पाऊल ठेवले. वीनू मंकड यांना विश्रांती देवून बापूंना संधी देण्यात आली होती. मंकड संघात परतल्यानंतर बापू स्वत:हून संघाबाहेर राहिले होते. त्याच वर्षी त्यांच्याकडे महाराष्ट्र संघाची धुरा सोपवण्यात आली होती. दरम्यान, पुढच्या काळात बापूंनी भारतीय संघातील आपले स्थान पक्के केले. भारतीय क्रिकेट संघाकडून बापू ४१ कसोटी सामने खेळले. त्यात त्यांनी ८८ बळी टिपले व फलंदाजीतही उपयुक्त योगदान दिले. १ शतक व ७ अर्धशतकांसह १ हजार ४१४ धावा त्यांच्या नावावर आहेत. विशेष म्हणजे शेवटचा कसोटी सामनादेखील बापू न्यूझीलंडविरुद्ध खेळले. ७ ते १२ मार्च १९६८ रोजी ऑकलंड येथे हा सामना खेळवला गेला होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कंजुष गोलंदाज अशी बापूंची ओळख होती. कसोटीत सलग २१ षटके निर्धाव टाकण्याचा विश्वविक्रम बापूंनी १४ जानेवारी १९६४ रोजी इग्लंडविरुद्ध रचला होता. चेन्नईच्या मैदानावर हा सामना झाला होता. बापू डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करायचे. इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात त्यांनी ३२ षटके टाकली. त्यातील तब्बल २७ षटके निर्धाव होती. ३२ षटकांत त्यांनी १.६७च्या सरासरीने केवळ ५ धावा दिल्या होत्या. बापूंचा हा विश्वविक्रम अबाधित राहिला.
बापूंच्या गोलंदाजी सरावाचीही तेव्हा नेहमी चर्चा असायची. नेटमध्ये सराव करताना नाणे ठेवून ते सराव करायचे. नाण्याचा अचूक वेध घेऊन मारा करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. त्यातूनच त्यांच्या फिरकीने भल्याभल्या फलंदाजांची फिरकी घेतली.
बापू नाडकर्णी यांचे १७ जानेवारी २०२० रोजी निधन झाले.
Leave a Reply