मन्सूर अली खान ऊर्फ नवाब ऑफ पतौडी यांचा जन्म ५ जानेवारी १९४१ रोजी झाला.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नवाब पतौडी यांचे नाव गौरवास्पद कामगिरीसाठी घेतली जाते. १९६७ साली त्यांच्याच नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडविरूद्ध विदेशी भूमीवर सर्वप्रथम टेस्ट सिरीज जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावली. १९६१ ते १९७५ या काळात ते भारतासाठी ४६ कसोटी सामने खेळले. त्यापैकी ४० टेस्टमध्ये त्यांनी भारताचे नेतृत्व केले. त्यांनी ३४.९१ च्या सरासरीने २ हजार ७९३ धावा केल्या. नाबाद २०३ धावा ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती. क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी सहा सेन्चुरी झळकावल्या, तर १६ अर्धशतके ठोकली.
यशस्वी भारतीय कॅप्टन म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. क्रिकेट कारकिर्दीला सुरूवात केल्यानंतर वयाच्या २० व्या वर्षी त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्यांना आपल्या उजव्या डोळ्याची दृष्टी कायमची गमवावी लागली. मात्र तरीही क्रिकेट कारकिर्दीवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही, हे विशेष. त्यांनी २७ डिसेंबर १९६९ रोजी बॉलिवूडमधील ख्यातनाम अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्याशी विवाह केला. त्यांचा पुत्र सैफ अली खान आणि कन्या सोहा अली खान हे बॉलिवूडमधील सध्याचे आघाडीचे नायक-नायिका आहेत. तर दुसरी कन्या साबा अली खान ही ज्वेलरी डिझायनर आहे.
जून २००५ मध्ये हरिणाची शिकार केल्याप्रकरणी नवाब पतौडी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. ते शिकार प्रकरण त्यावेळी प्रचंड गाजले होते.
भोपाळमधील पतौडी संस्थानचे ते नववे नवाब होते. डेहराडून येथील वेल्हम बॉईज स्कूलमधून त्यांचे शालेय शिक्षण झाले, तर ऑक्स्फर्ड विद्यापीठातून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. मन्सूर अलींच्या ११ व्या वाढदिवशीच १९५२ साली त्यांचे वडिल इफ्तिखार अली खान पतौडी यांचे निधन झाले. त्यानंतर ते पतौडी संस्थानचे नवाब झाले.
मन्सूर अली खान पतौडी यांचे २२ सप्टेंबर २०११ रोजी निधन झाले.
Leave a Reply