मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचा जन्म १ जानेवारी १९४० रोजी सातारा येथे झाला.
काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते म्हणून एकनाथ गायकवाड यांची ओळख होती. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती होती.काँग्रेस सहित अनेक राजकीय पक्षांतील नेत्यांनी त्यांचे स्नेहपूर्ण संबंध होते. साधी राहणीमान असलेले गायकवाड विक्रोळीत राहत होते. मात्र, त्यांनी धारावीवर आपली पकड ठेवली होती. धारावीतील प्रत्येक चाळीतील लोकांना ते नावाने ओळखत होते. गायकवाड हे काँग्रेसमधील असले तरी दलित चळवळीशी त्यांचं सख्य होतं. दलित चळवळीतील कार्यकर्तेही त्यांना मानत होते. सर्वच रिपब्लिकन नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात ते हिरहिरीने भाग घेत होते.
एकनाथ गायकवाड हे काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष होते. राज्य मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद भूषविलं होतं. सर्वप्रथम १९८५-९०, नंतर १९९०-९५ आणि नंतर १९९९-२००४ अशी त्यांची आमदारकीची कारकीर्द राहिली. धारावी मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केल. दरम्यान १९९३ ते ९५ या काळात ते राज्यमंत्री राहिले. यानंतर १९९९ ते २००४ त्यांनी आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सामाजिक न्याय, कामगार, उच्च व तंत्रशिक्षण अशी विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली. २००४ मध्ये त्यांनी तत्कालीन लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांना लोकसभा मतदारसंघात पराभूत केले होते. याशिवाय २०१७ ते २०२० अशी तीन वर्षे त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात शिवडी कोर्टात सुनावणी सुरु होती. त्यावेळी राहुल गांधी कोर्टात हजर राहिल्यानंतर राहुल गांधींविरोधातील वॉरंट रद्द केलं होतं. मुंबईतील काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी राहुल गांधींसाठी कोर्टात हमी दिली होती. राज्याच्या पहिल्याच महिला शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या त्यांच्या कन्या होत.
एकनाथ गायकवाड यांचे २८ एप्रिल २०२१ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply