भारताचे माजी राष्ट्रपती आर वेंकटरमण यांचा जन्म ४ डिसेंबर १९१० रोजी तमिळनाडू राज्यातील राजमदम् (तंजावर जिल्हा) या गावी झाला.
रामस्वामी वेंकटरामन हे त्यांचे पूर्ण नाव. वडील रामस्वामी अय्यर. वेंकटरामन यांचे शालेय शिक्षण राजमदम् आणि उच्च शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी एम्.ए.; बी. एल्. या मद्रास विद्यापीठाच्या पदव्या मिळविल्या. त्यांचा विवाह १९३८ साली झाला. पत्नीचे नाव जानकी. सुरुवातीस त्यांनी चेन्नई येथील उच्च न्यायालयात व पुढे सर्वोच्च न्यायालयात वकिली केली.
वकिली करीत असतानाच ते काँग्रेस पक्षाकडे आकृष्ट झाले आणि त्यांनी काँग्रेस अंतर्गत समाजवादी पक्षाच्या स्थापनेत भाग घेतला. ‘छोडो भारत’ आंदोलनातही (१९४२) त्यांनी भाग घेतला. त्यामुळे त्यांना दोन वर्षे कारावासही भोगावा लागला. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी कामगार चळवळीस वाहून घेतले आणि गोदी कामगार, रेल्वेतील कर्मचारी, भूमिहीन मजूर यांची गाऱ्हाणी चव्हाट्यावर आणून त्यांच्या हक्कांसाठी चळवळी उभ्या केल्या.
पुढे चेन्नई येथून प्रकाशित होणाऱ्या लेबर लॉ जर्नल या मासिकाचे ते कार्यकारी संपादक झाले (१९४९). स्वातंत्र्यानंतर त्यांची हंगामी संसदेत निवड झाली (१९५०). त्यानंतर १९५२ व १९५७ या दोन्ही सार्वत्रिक निवडणुकांत ते लोकसभेवर निवडून आले १९५२-५४ दरम्यान ते संसदेतील काँग्रेस पक्षाचे सचीव होते. पुढे ते तमिळनाडूच्या विधानसभेत निवडून गेले (१९५७-६७). उद्योग, कामगार, ऊर्जा आणि परिवहन ही खाती त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.
पुढे देशाच्या नियोजन आयोगावर त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती झाली (१९६७-७१). १९७० च्या दरम्यान त्यांनी सक्रिय राजकारणातून काही काळ निवृत्ती स्वीकारली आणि नवी दिल्ली येथून प्रकाशित होणाऱ्या स्वराज्य या इंग्रजी साप्ताहिकाची संपादकीय धुरा वाहिली (१९६९-७७). त्यानंतर त्यांची १९७७ व १९८० अशी दोन वेळा दक्षिण चेन्नई मतदारसंघातून लोकसभेवर पुन्हा निवड झाली. तत्पूर्वी त्यांनी न्यूझीलंड येथील राष्ट्रकुल संसदीय परिषद (१९५०), संयुक्त राष्ट्रांची सर्वसाधारण सभा (१९५५ व १९६१), जिनीव्हा येथील आंतरराष्ट्रीय मजूर संघटना (१९५८) आणि व्हिएन्ना येथील आंतर संसदीय परिषद (१९७८) यांतून भारतीय प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व केले होते. संयुक्त राष्ट्रांच्या प्रशासकीय न्यायसभेचे ते अध्यक्ष (१९६८-७९) होते.
पंतप्रधान इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात त्यांनी अर्थखाते (१९८०-८२) व पुढे संरक्षण खाते (१९८२-८४) ही दोन महत्त्वाची खाती सांभाळली. २४ ऑगस्ट १९८४ रोजी त्यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. पुढे काँग्रेसपुरस्कृत उमेदवार म्हणून २५ जुलै १९८७ मध्ये ते राष्ट्रपती पदावर निवडून आले. त्यांनी ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, न्यूझीलंड, रशिया इ. देशांचे सदिच्छा दौरे केले. गोवा-मुक्तीनंतर पोर्तुगलला भेट देणारे (४ एप्रिल १९९०) ते पहिले राष्ट्रपती होत. तसेच त्यांनी मे १९९२ मध्ये चीनला भेट दिली. भारताच्या राष्ट्रपतींची ही चीनला पहिलीच अधिकृत भेट होय.
त्यांना कामराज यांच्या रशिया-भेटीवर आधारित प्रवासवर्णनासाठी सोव्हिएट लँड-नेहरु पारितोषिक देण्यात आले. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि अथक प्रयत्न, लोकसेवा व व्यासंग यांच्या बळावर राष्ट्रपती हे सर्वोच्च पद भूषविले.
माय प्रेसिडेन्शियल यिअर्स ह्या त्यांच्या आत्मचरित्रवजा पुस्तकाचे वादळी वर्षे : राष्ट्रपतिभवनातील हे मराठी अनुवादीत पुस्तक प्रकाशित झाले आहे.
आर. वेंकटरमण यांचे २७ जानेवारी २००९ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply