भारताचे माजी राष्ट्रपती वराहगिरी वेंकटगिरी यांचा जन्म १० ऑगस्ट १८९४ रोजी ब्रह्मपूर ओरिसा येथे झाला.
वराहगिरी वेंकट गिरी यांचे प्राथमिक शिक्षण बेऱ्हमपूर येथे झाल्यावर डब्लिन विद्यापीठात त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. बार ॲथट लॉ झाल्यानंतर त्यांनी वकिली सुरू केली. पुढे ते काँग्रेसचे सभासद झाले आणि होमरूल चळवळीत सहभागी झाले. कामगार संघटनेचे सचिव व ऑल इंडिया रेल्वेमेन फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे ते अध्यक्ष होते.
जिनीव्हा येथील आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेत भारताच्या कामगारांचे प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित होते . १९३१ मध्ये त्यांनी गोलमेज परिषदेत भाग घेतला.
१९३४ ते १९३७ या दरम्यान मध्यवर्ती विधिमंडळात त्यांनी कामगारांचे प्रतिनिधित्व केले. त्या वेळी ते कामगार, उद्योगधंदे, सहकार व वाणिज्य यांचे मद्रास इलाख्यात मंत्री होते. हंगामी हिंदुस्थान सरकारचे परराष्ट्रवकील म्हणून त्यांनी श्रीलंकेत दोन वर्षे काम केले आणि त्यानंतर ते कामगारमंत्री झाले. १९५७ ते १९६७ च्या दरम्यान त्यांनी राज्यपाल म्हणून उत्तर प्रदेश, केरळ व कर्नाटक या राज्यांत काम केले आणि त्यानंतर ते १९६७ ते १९६९ या काळात भारताचे उपराष्ट्रपती आणि पुढे १९६९ ते १९७४ राष्ट्रपती राहिले. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समित्यांवर काम केले होते.
एक निस्पृह कामगार नेता म्हणून त्यांची आज जगभर प्रसिद्धी होती. कामगारांचे अनेक प्रश्न त्यांनी सामोपचाराने आणि सुलभतेने हाताळले; एवढेच नव्हे तर तत्संबंधीचे विचार त्यांनी इंडस्ट्रियल रिलेशन्स, लेबर प्रॉब्लेम्स इन इंडियन इंडस्ट्री , जॉब्ज फॉर अवर मिलियन्स वगैरे पुस्तकांद्वारे मांडले.
या सर्व कार्याबद्दल बनारस, आंध्र वगैरे विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट ही पदवी दिली. १९७५ साली भारत सरकारने त्यांच्या कार्याचा उचित गौरव त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन केला.
वराहगिरी वेंकट गिरी यांचे २३ जून १९८० रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply