कामगार नेते, माजी केंदीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म ३ जून १९३० रोजी मंगळूरु येथे झाला.
कामगार नेते, मुंबईच्या जनजीवनाशी जोडले गेलेले एकेकाळचे बंदसम्राट अशी जॉर्ज फर्नांडिस यांची ओळख होती. जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म मंगलोरी कॅथॉलिक ख्रिश्चन कुटंबीयात झाला. सहा भावांमध्ये जॉर्ज फर्नांडिस हे सर्वात मोठे होते. त्यांचं शिक्षण हे मिशनरी शाळेत झाले होते. १९४९ मध्ये ते नोकरीच्या शोधात मुंबईत आले. तेव्हा अनेक रात्री त्यांनी रस्त्यावर झोपून काढल्या. त्यानंतर त्यांना वृत्तपत्रात प्रूफ रिडरचे काम मिळाले. याच दरम्यान त्यांचा संपर्क कामगार नेते प्लॅसिड डिमेलो आणि समाजावादी विचारांचे नेते राममनोहर लोहिया यांच्याशी आला. त्यांच्या प्रभावाखाली येत त्यांनी कामगार चळवळीत त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. त्यांनी प्रथम हॉटेल कामगारांना एकत्र करून त्यांच्यासाठी लढा दिला. त्यांनतर त्यांनी १९७४ मध्ये रेल्वे कामगारांसाठी लढा दिला. मुंबईत कामगारांसाठी लढा देताना मुंबई बंद करून दाखवली होती.
आणीबाणीच्या काळात त्यांनी सरकारविरोधात रान उठवले होते. त्यांना शोधण्यासाठी सरकारने जंग जंग पछाडले होते. मात्र जॉर्ज यांनी वेशांतरे करून लढा सुरूच ठेवला होता. २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती.
जॉर्ज फर्नांडिस यांना १० जून १९७६ रोजी पकडण्यात आले. वर्षभर त्यांनी आपला लढा सुरू ठेवला होता.
त्यानंतर १९७७ मध्ये आणीबाणी मागे घेण्यात आली आणि निवडणुका घेण्यात आल्या. तेव्हा तुरुंगात असतानाही मुझफ्फरपूर येथून ३ लाख मतांच्या फरकाने ते जिंकून आले. त्यांनी केंद्रीय उद्योगमंत्री पद सांभाळले. त्यानंतर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात त्यांनी अत्यंत महत्वाचे असे संरक्षण मंत्रीपद सांभाळले. त्यांच्याच कार्यकाळात पोखरणची अणू चाचणी यशस्वीरित्या पार पडली. तर कारगिलच्या युद्धात ऑपरेशन विजय करत पाकिस्तानला पाठीमागे धाडण्यात यश आले. मात्र २००१ मध्ये संरक्षण विभागातील घोटाळ्याचे आरोप करण्यात आल्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर २००९ मध्ये ते राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले. मात्र काही काळानंतर त्यांचा अल्झायमर आणि पार्किन्सनचा आजार बळावला आणि ते राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातून थोडे बाजूला झाले. नुकताच जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला.
जॉर्ज फर्नांडिस यांचे २९ जानेवारी २०१९ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply