संयुक्त राष्ट्र संघाचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचा जन्म ८ एप्रिल १९३८ रोजी गोल्ड कोस्ट म्हणजेच आताचा घाना या देशात झाला.
गरिबांचा मसिहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अन्नान यांनी जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रचंड काम केले होते. १९९७ मध्ये कोफी अन्नान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या विविध संघटनांमध्ये ताळमेळ राहावा म्हणून संयुक्त राष्ट्र विकास समूहाची स्थापना केली होती. अन्नान यांना २००१ मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.
१९६२ मध्ये कोफी अन्नान यांनी जागतिक आरोग्य संघटनेत बजेट अधिकारी म्हणून काम सुरू केले. तिथे ते ३ वर्षे कार्यरत होते. १९६५ ते १९७२ या कालावधीत त्यांनी इथियोपियाची राजधानी असलेल्या आदीस अबाबा येथे संयुक्त राष्ट्रांच्या इकॉनॉमिक कमिशन फॉर अफ्रिकेसाठी काम केले होते. संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव बनणारे आफ्रिकन वंशाचे ते पहिले नागरिक होते. १९९७ आणि २००६ मध्ये सलग दोन वेळा त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिवपद भूषवले होते. महासचिव असताना २०१५ पर्यंत जगातील गरिबी दूर करण्याचे उद्दिष्टही त्यांनी समोर ठेवले होते. युद्ध काळात शांतता प्रस्थापित करण्याबरोबरच युद्धात होरपळलेल्या जनतेचे पुनर्वसन करण्याचे काम त्यांनी केले होते.
ते ‘कोफी अन्नान फाऊंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष होते. शिवाय नेल्सन मंडेला यांनी स्थापन केलेल्या ‘द एल्डर’ या आंतरराष्ट्रीय संघटनेचे अध्यक्षही होते.
कोफी अन्नान यांचे निधन १८ ऑगस्ट २०१८ रोजी झाले.
Leave a Reply