नवीन लेखन...

माजी व्हाईस ॲ‍डमिरल भास्कर सदाशिव सोमण

भास्कर सोमण यांचा जन्म ३० मार्च १९१३ रोजी झाला.

भास्कर सोमण हे भारताचे दुसरे नौदलप्रमुख. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांची रॉयल इंडियन मरिनसाठी निवड झाली आणि त्यांना प्रशिक्षणासाठी ग्रेट ब्रिटनला पाठविण्यात आले. अडीच वर्षांच्या प्रशिक्षणानंतर ऑगस्ट १९३४ ला सब लेफ्टनंट म्हणून ते तत्कालीन भारतीय नौदलात प्रविष्ट झाले. १९३९-४० दरम्यान दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते फर्स्ट लेफ्टनंट होते.

तांबडा समुद्र व इराणचे आखात यांमध्ये हिज मॅजेस्टिज इंडियन शिप (एच्. एम्. आय्. एस्.) ‘कॉर्नवॉलिस’ या युद्धनौकेचे कमांडिंग ऑफिसर म्हणूनही त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. इटालियन पाणबुडी ‘गॅलिलिओ गॅलिलाय ‘ला एडनजवळ पकडण्यात सोमण यांचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर त्यांनी १९४२ मध्ये रॉयल इंडियन नेव्हीच्या एच्. एम्. आय्. एस्. ‘खैबर’ या फ्लीट माइन स्वीपरची अधिकारसूत्रे स्विकारली. दक्षिणेत रामेश्वरजवळील मंडपम येथे कार्यरत असलेल्या ‘हमला’ या भारतीय नौसेनेच्या प्रशिक्षण केंद्रावर त्यांची वरिष्ठ निदेशक व प्रशिक्षक म्हणून निवड झाली (१९४३). तिचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भूसेना व नौसेना यांच्या संयुक्त कारवाईचे प्रशिक्षण देणे.

२६ ऑगस्ट १९४५ रोजी त्यांची मुंबईतील ड्राफ्टिंग ऑफिसमध्ये ड्राफ्टिंग कमांडर या पदावर नियुक्ती झाली. या पदावर नेमले जाणारे ते पहिले भारतीय अधिकारी होते. तसेच जून १९४७ मध्ये पहिले भारतीय अधिकारी म्हणून ॲक्टिंग कॅप्टन या पदावर त्यांची नियुक्ती झाली होती. १९४९ मध्ये एच्. एम्. आय्. एस्. ‘जमुना’ या युद्धनौकेचे ते कमांडिंग ऑफिसर झाले. त्यानंतर ७ ऑक्टोबर १९५१ रोजी इंडियन नॅव्हल शिप खख (आय्. एन्. एस्) ‘दिल्ली’ या नौसेनेच्या त्यावेळच्या सर्वांत मोठ्या युद्धनौकेचे कमांडिंग ऑफिसर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. विशाखापटनम् येथील आय्. एन्. एस्. ‘सिरकर्स’ या नौदलाच्या प्रशिक्षण केंद्राची ११ डिसेंबर १९५१ रोजी त्यांनी अधिकारसूत्रे स्विकारली. तसेच ऑफिसर-इन-चार्ज ईस्ट कोस्ट ही भारताच्या पूर्व समुद्रतटाच्या प्रमुखाची जबाबदारीही त्यांनी स्विकारली.

भारतीय नौदलाच्या वेंडुतुथी (कोचीन) येथील सर्वांत मोठ्या प्रशिक्षण केंद्रावर सोमणांची कमोडोर-इन-चार्ज (कॉमचिन) या नौदलातील पहिली ‘फ्लॅग रँक’ असलेल्या पदावर नियुक्ती झाली (१९५४). त्यानंतर १९५६-५७ मध्ये त्यांची मुंबई बंदराचे कमोडोर-इन-चार्ज (कॉम्बे) या पदावर नियुक्ती झाली. या पदावर त्यांनी दीड वर्षे काम केले. त्यानंतर त्यांना रिअर ॲडमिरल या पदावर पदोन्नती मिळाली. एप्रिल १९६० मध्ये त्यांची फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इंडियन फ्लीट (फोसिफ) या पदावर नियुक्ती करण्यात आली. फोसिफ झाल्यावर सोमणांनी सर्वप्रथम आय्. एन्. एस्. ‘म्हैसूर ‘चा कार्यभार सांभाळला. त्यामुळे ते फोसिफ म्हैसूर या नावाने ओळखले जाऊ लागले. यानंतर पदोन्नती मिळून ते स्वतंत्र भारताचे दुसरे नौदलप्रमुख झाले (५ जून १९६२). तत्पूर्वी गोवा मुक्ती संग्रामातील ‘ऑपरेशन विजय’ मोहिमेत नौदलाची सर्व जबाबदारी सोमणांकडेच होती. भारतीय नौसेनेला १९६५ च्या भारत-पाक युद्धात विशेष भूमिका बजावता आली नाही. जून १९६६ मध्ये नौदलातील प्रदीर्घ सेवेतून ते निवृत्त झाले. ॲडमिरल सोमण निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झाले. त्यांना भारत सरकारने निवृत्तीनंतर भारतातील एका छोट्या राज्याचे राज्यपालपद व परदेशात भारताचे राजदूतपद या दोन उच्चपदाचे प्रस्ताव पाठविले; परंतु ती दोन्हीही पदे त्यांनी नाकारली आणि आपले उर्वरित आयुष्य सामाजिक कार्यात व्यतीत केले.

सोमण यांचे निधन ८ फेब्रुवारी १९९५ रोजी झाले. आपल्या समुहातर्फे सोमण यांना आदरांजली.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..