कला, वास्तुशास्त्र, ऐतिहासिक वारसा याचा त्रिवेणी संगम असलेला हा फोर्टचा भाग म्हणजे मुंबईचं सौंदर्य. इथला अनुभव घेण्यासाठी मात्र इथे चालतच जायला हवं.
“फोर्ट” हे भारदस्त नामाभिधान बाळगणार्या या भागात धोबीतलाव ते कुलाबापर्यंतचा परिसर येतो. आपण ज्या भागाला फोर्ट म्हणून ओळखतो तो आज दिसत नाही, तो कोठे होता, त्याची व्याप्ती कशी होती हे आराखडयासहित दाखवणारी अनेक पुस्तकं मात्र उपलब्ध आहेत.
१६६८ साली ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईत किल्ला उभारण्यास सुरुवात केली आणि १७१६ मध्ये तो बांधून पूर्ण केला. या किल्ल्याला तीन मजबूत आणि सुरक्षित दरवाजे होते.
पूर्वेकडील दरवाजा अपोलो गेट, लायन गेटजवळ होता. पश्चिमेकडील दरवाजा चर्चगेट या नावाने ओळखला जाऊ लागला. आज जेथे फ्लोरा फाऊंटन आहे तेथे हे गेट होते. तिसरे गेट उत्तरेला बझारगेट येथे म्हणजे जी.पी.ओ. समोरच्या बझारगेट पोलीस स्टेशनच्या ठिकाणी होते.
या गडकोटाच्या आतमध्ये मजबूत गढी (castle) उभारण्यात आली. मजेची गोष्ट अशी की १७४३ मध्ये नागरिकांकडून वर्गणी गोळा करून या गढीभोवती खंदक तयार करण्यात आला. पश्चिमेकडील समुद्रातून येणारी गलबते, जहाजे इत्यादींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या हेतूने गढीच्या पश्चिमेला मोकळे सपाट मैदान तयार करण्यात आले. या मैदानाला एस्प्लनेड मैदान म्हणजेच समुद्रकिनार्यालगतचे मैदान असे नाव पडले. १८६० मध्ये हा गढकोट पाडण्यांत आला. किल्ला किंवा कोट आस्तित्त्वात नसला तरीसुद्धा हा भाग आजही फोर्ट म्हणून ओळखला जातो.
“फोर्ट” म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मुंबई महापालिका, मध्य रेल्वे मुख्यालय, टाईम्स ऑफ इंडिया, स्टेट बॅंक, एशियाटिक लायब्ररी, मुंबई हायकोर्ट, मुंबई विद्यापीठ, रिगल आणि इरॉस थिएटर्स वगैरेसारख्या अप्रतिम इमारती येतात. या ऐतिहासिक इमारतींसोबत नव्याने उभ्या राहिलेल्या स्टॉक एक्स्चेंजसारख्या बिल्डिंग्जही फोर्टमध्ये आहेत. टाटांचे “बॉम्बे हाऊस”, मुंबई समाचार, रिझर्व्ह बॅंक, मिंट, जुने कस्टम हाऊस यासारखी बरीच नावाजलेली ऑफिसेस आहेत. फ्लोरा फाऊंटन, सेंट थॉमस कॅथीड्रल, दादाभाई नवरोजी पुतळा यासारखी सुंदर शिल्पेही आहेत.
पण फोर्टची व्याप्ती त्याही पलिकडे आहे.
— निनाद अरविंद प्रधान
Leave a Reply