मुंबईतला फ्लोरा फाउंटन तर सगळ्यांनाच माहित आहे. अत्यंत आकर्षक असं हे शिल्प आहे.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत १०५ हुतात्म्यांचं रक्त सांडलं त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या परिसराला “हुतात्मा चौक” हे नाव दिलं गेलं.
हुतात्मा चौकातून पश्चिमेकडे जाताना दिसते ती P.W.D. बिल्डिंग. ही इमारत व्हेनेशियन गोथिक शैलीत असून कर्नल विल्किन्स यांनी या इमारतीचे डिझाईन केलं. ही इमारत १८७२ मध्ये पूर्ण झाली. या इमारतीतही मी अनेकदा गेलोय.
फ्लोरा फाऊंटनकडून पूर्वेकडे येताना लागते ते म्हणजे हॉर्निमन सर्कल. तिथून डाव्या बाजूला वळल्यावर समोरच टांकसाळ आणि भारतीय रिझर्व्ह बॅंक. तिथून पुढे आल्यावर बॅलार्ड इस्टेट परिसर. या परिसरातही अनेक सुंदर वास्तू आहेत. पोर्ट ट्रस्ट कार्यालय, कस्टम हाऊस, वॉर मेमोरिअल वगैरे एकंदर ४० पेक्षा जास्त इमारती या भागात असून आर्किटेक्ट विटेट यांनी यातील बहुतांश इमारती रिनेसाँन्स या युरोपिअन शैलीनुसार बांधलेल्या आहेत.
हुता्मा चौकाच्याच परिसरात आहे बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेलं सिद्धार्थ कॉलेज. मुंबईच्या शैक्षणिक इतिहासात सिद्धार्थ कॉलेजचं मोठं नाव होतं.
फोर्टचा आणखी एक टप्पा म्हणजे नगर चौक म्हणजेच महापालिकेच्या मुख्यालयाचा परिसर. याच परिसरात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, टाईम्स ऑफ इंडिया वगेरेसारख्या वास्तु आहेत. इथेच कॅपिटल सिनेमा, अलेक्झांड्रा स्कूल, जे. एन. पेटीट लायब्ररी वगैरे ठिकाणे आहेत.
भारतातील रेल्वेची मुहुर्तमेढ जिथे रोवली गेली ते बोरीबंदर स्थानक म्हणजे नगर चौकातले एक महत्त्वाचे आकर्षण. दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असलेले हे स्थानक आता “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस” या नावाने ओळखले जात असले तरी अजूनही अनेकांच्या तोंडत व्ही.टी. स्टेशन (व्हिक्टोरिया टर्मिनस) हेच नाव बसलेले आहे. बोरीबंदर स्थानकाच्या या इमारतीचे काम १८७८ मध्ये सुरू झाले आणि १० वर्षांनी पूर्ण झाले. इमारत बांधायला १६.३० लाख रुपये तर स्थानकाच्या उभारणीसाठी १० लाख रुपये खर्च झाले. फ्रेडरिक स्टिव्हन्स यांनी डिझाईन केलेल्या इमारतीच्या कामात सीताराम खंडेराव वैद्य यांची मदत घेतल्याचा उल्लेख आहे. व्हिक्टोरिया टर्मिनस हे जगातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्टेशन समजले जाते. लंडनचे व्हिक्टोरिया स्टेशन मुंबईच्या व्ही.टी. च्या तुलनेत अतिसामान्य वाटते.
नगर चौकातच, थेट बोरीबंदर स्थानकाच्या समोरच मुंबईचा कारभार चालवणार्या मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय असलेली अत्यंत देखणी वास्तू आहे. महानगरपालिका कार्यालयाचा पायाभरणी समारंभ ६ डिसेंबर १८८४ रोजी झाला आणि १८९३ मध्ये ही वास्तू पूर्ण झाली. या इमारतीच्या मनोर्याची उंची जमिनीपासून २३५ फूट आहे. या इमारतीसमोरच सर फिरोझशाह मेहता यांचा ब्राँझमधे घडवलेला भव्य पुतळा आहे.
नगर चौकातून पश्चिमेच्या रस्त्यावर जी.पी.ओ. म्हणजेच पोस्ट खात्याचे मुख्य कार्यालय असलेली इंडो सारसेनिक शैलीची इमारत असून १९११ साली ती बांधून पूर्ण झाली. या इमारतीवरील घुमटाची रचना विजापूरच्या गोल घुमटासारखी आहे. यांचे आर्किटेक्टदेखील विटेट.
नगर चौकापासून महापालिकेच्या मुख्यालयाकडून एका बाजुने मेट्रो सिनेमाकडे जायच्या रस्त्यावर एस्प्लनेड पोलीस कोर्ट, कामा हॉस्पिटल, एलफिन्स्टन टेक्निकल स्कूल, या वास्तू आहेत.
महापालिकेच्या मुख्यालयाकडून दुसर्या बाजुने गेल्यास टाईम्स ऑफ इंडियाची इमारत आहे. टाइम्स ऑफ इंडिया गोथिक व सारसेनिक शैलीत बांधले आहे. या इमारतीला विनोदाने द ओल्ड लेडी ऑफ बोरीबंदर असे संबोधण्यात येते असा उल्लेख आहे. या इमारतीत मी ९० आणि २००० च्या दशकात अगणितवेळा गेलो असेन. अतिशय आकर्षक वातावरण या इमारतीत होते. टाईम्स ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र टाईम्सच्या संपादकांच्या केबिनमध्ये बसुन त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्याच्या अनेक संधी मला मिळाल्या.
टाईम्सवरुन पुढे जे जे स्कूल, पोलिस मुख्यालय आणि बाजुलाच ७२००० स्क्वेअर यार्ड जागेवर वसलेले क्रॉफर्ड मार्केट आहे. या क्रॉफर्ड मार्केटच्या इमारतीचे डिझाइन विल्यम इमरसन यांचे असून १८६९ मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली. येथे जमिनीपासून १२८ फूट उंचीवर घडयाळ असलेला मनोरा आहे.
तर अशा या स्थापत्यशास्त्राचे नितांतसुंदर नमुने असलेल्या भागाची ओळख करुन घ्यायला “फोर्ट वॉक” करायलाच हवा…..
— निनाद अरविंद प्रधान
Leave a Reply