नवीन लेखन...

इंग्रजी वाचनाची पायाभरणी

आज वाचक दिनानिमित्त खास लेख


इंग्रजी वाचनाची ओळख इयत्ता ९ वीत असताना सुरवाणी ज्ञान मंदिरात दामलेसरांमुळे (कै. मुकुंद दामलेसर) झाली. सुरवाणीस मुख्यत: पराष्टेकर सर संस्कृत शिकवायचे आणि मुकुंद दामले सर आठवड्यातून तीन दिवस इंग्रजी शिकवायचे. टिळक विद्यापीठाच्या सिनियरच्या परीक्षेचा अभ्यास करून घ्यावयाचे. पाठ्यपुस्तक शिकवण्यापेक्षा इंग्रजी कविता आणि गोष्टीच जास्त वाचून दाखवयाचे. वर्डस्वर्थ त्यांचा आवडता कवी. Daffodil कविता शिकवताना त्यांनी वर्डस्वर्थच्या अनेक कविता वाचून दाखवल्या होत्या. तसेच Mark Twain च्या Adventures of Tom Sawyer चे पण वाचन केले होते. पुढे दहावी मध्ये डिकन्स चे Devid Copperfield या पुस्तकाचे वाचन झाले. अकरावीला इंग्रजी विषय स.वि.कुलकर्णी सर शिकवायचे. त्यांचा शेक्सपिअर लाडका होता. त्यांनी, ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’ आणि ‘हॅम्लेट’ वर्गात वाचून दाखवले होते. त्यांचे स्पष्ट इंग्रजी उच्चार अजूनही कानात घुमतात.

आई वडिलांमुळे आम्हा सर्व बहिण भावंडांना वाचनाची आवड लागली होती. मोठ्या बहिणीला [ बाई ] इंग्रजी वाचनाचे प्रचंड वेड होते. काका रेल्वेत असल्याने ती मुंबईतील व्ही.टी.येथील मध्य रेल्वेच्या लायब्ररीतली पुस्तके वाचावयास आणीत असे. सुट्टीत आमच्यासाठी ती मुलांची पुस्तके आणायची. Tom Sawyer चा पुढचा भाग Adventures of Hucklberriy Finn, डिकन्सची Oliver Twist, Hemingweyची ‘The old man and the sea. या कादंबऱ्या तिनेच वाचावयास आणल्या होत्या . त्याचवेळी त्या वयात आवडतील अशा हार्डी ब्रदर्स, फेमस फाईव वाचायला मिळाल्या.मराठीत नंतर अवतरलेल्या फास्टर फेणे सारख्या इंग्रजी भाषेतील रंजक, रहस्यमय आणि साहसी बालकथा, शालेय वयात आवडू लागल्या होत्या. व्ही.टी. स्टेशन वरील मध्य रेल्वेची लायब्ररी ही माझ्या आठवणीतील सर्वात पहिली मोठी लायब्ररी. तेथील पुस्तकांनी भरलेली मोठी कपाटे बघून माझे डोळे विस्फारले गेले होते.

कॉलेजमध्ये पहिल्या दोन वर्षात इंग्रजी विषय शिकताना अवांतर वाचन म्हणून पहिल्या वर्षी E.M.Foster चे ‘Where Angel fear to tread’ आणि दुसऱ्या वर्षी George Orwell चे 1984 ही दोन पुस्तके होती. मुलुंड कॉलेजात तेव्हा भोळे सर इंग्रजी शिकवत होते. त्यांच्या आग्रहाने Fostr चे ‘Passage to India आणि George Oewell ची Animal farm आणि Jen Austin ची Pride and prejudice या कादंबऱ्या पण वाचल्या गेल्या. ग्रंथपाल हा चांगला मार्गदर्शक असतो याचा अनुभव आमचे कॉलेजचे ग्रंथपाल भुरके सर यांच्यामुळे आला.

ठाण्यातील गिर्यारोहक मित्रांचा आमचा एक खास ग्रुप होता. या ग्रुपमध्ये राजीव नरसियन हा आमच्या ग्रुपमधील सर्वात जास्त शिकलेला आणि वयाने ज्येष्ठ. शिपिंग कॉपरेशनमध्ये तो होता. त्याचे वाचन फार गंभीर होते. त्याच्या हातातील जाडजूड पुस्तक हे नेहमीच आमच्या कुतूहलाचा विषय असे. राजीवची आठवण कायमची मनात राहते ती जहांगीर आर्ट गॅलरीमधील समोवार या रेस्तारंत मध्ये आम्हाला सामोसा खाऊ घालत वूडहाउस या विनोदी लेखकाचा इंगजी भाषेतील विनोद आम्हाला तो गंभीरपणे वाचून दाखवत असे.

राजीव दररोज ‘इव्हिनिंग न्यूज’ हे संध्याकाळचे टाईम्स ग्रुपचे वृतपत्र विकत घ्यायचा, त्यातले शब्द कोडे तो दररोज सोडवायचा. मला त्यातील बिझीबी नावाने लिहित असलेल्या Behram Contractor यांचे ‘राउंड अबाउट’ हे सदर आवडायचे. तत्कालीन घटनांवर अतिशय मार्मिक शब्दात, टिपिकल पारशी विनोदी भाषेत, तो आणि त्याचा बॉक्सर कुत्रा यांचे संभाषण त्या मध्ये असावयाचे. मुंबईतील हाॅटेल्सची ओळख सुद्धा या सदरात मिळायची. केवळ या सदरासाठी Evening News विकत घेण्याची सवय लागली. नंतर कधीतरी फोर्ट मध्ये फिरताना या लेखांचे संग्रहित केलेले पुस्तक मिळाले. अशा प्रकारचे सदर पुढे मराठी वृत्तपत्रात प्रसिद्ध होऊ लागले.मराठी वृतपत्रात लोकप्रिय झालेल्या अशा प्रकारच्या सदरांचा मूळ पुरुष बेहराम आहेत हे आपण विसरू शकत नाही.

सागर ओक हा आमच्याहून वयाने जुनिअर, परंतु इंग्रजी वाचनात आम्हाला सिनियर. इंग्रजी माध्यमात शिकलेला. त्याचा वेगळा वाचनप्रिय मित्रांचा ग्रुप होता. त्याच्याकडून प्रथम मला इंग्रजीतील लोकप्रिय लेखकांची नावे कळली. Jeffery Archer, Robin Cook, Irving Wallace, Ayn Rand, ही नावे तोंडात येऊ लागली. आयन रँडचे fountaionhead आणि विशेषतः Atlast Shrugged बरेच दिवस आमच्या चर्चेचा विषय होते. त्यातील’ What is money ‘ याचे विश्लेषण, वाणिज्य शाखेचा विद्यार्थी असल्याने जास्तच इंटरेस्टीग वाटले.

याच सुमारास मोठा भाऊ मोठ्या सुट्टीवर आला होता. मरीन इंजिनियर असल्याने सहा-सहा महिने तो बोटीवर असायचा. त्याने येताना बॅगाभरून इंग्रजी पुस्तके आणली होती, त्यातली बरीचशी पुस्तके वरील लेखकांची होती. दुसरा मोठा भाऊ, ज्याला मी नाना म्हणतो, तो नोकरी निमित्त कंपनी गेस्टहाऊस मध्ये रहात होता. त्याला पण इंग्रजी पुस्तके वाचण्याची आवड होती. ऑर्थर हेली, त्याचा आवडता लेखक. त्याने विकत घेतलेली पुस्तके मला वाचावयास मिळाली. . आर्थर हेलीची Airport आणि Hotel, ही मी वाचलेली पहिली पुस्तके. The Money Changers, Final Diagnosis, In High Places, , Wheels, Overload, Evening News, ही पुस्तके नंतर वाचनात आली.

ही पुस्तके वाचल्यावर वेगवेगळ्या व्यवसायाच्या पार्श्वभूमीवर रंगतदार काल्पनिक कादंबरी लिहिताना परदेशी लेखक त्या व्यवसायाचा अथवा विषयाचा केवढा अभ्यास आणि संशोधन करतात याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. लेखन ही केवळ कला नाही तर व्यासंग सुद्धा आहे यावर विश्वास बसतो.

— सुरेन्द्र दिघे
१४.१०.२०१८

सुरेंद्र दिघे
About सुरेंद्र दिघे 11 Articles
श्री सुरेंद्र दिघे हे ठाणे येथील सरस्वती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आहेत. ते शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या जिज्ञासा या संस्थेचेही विश्वस्त आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..