मुले हेच घराचे बहुमोल अलंकार ,मुले हीच राष्ट्राची खरी संपत्ती ,मुले म्हणजे देवाघरची फुले अशा अनेक घोषणा आपण आज पर्यंत एकात आलो आहोत. पण बालसाहित्य निर्माण करून मुलांच्या सर्वांगीण विकास होऊन वाचनाची गोडी निर्माण होण्याच्या दृष्टीकोनातून बालकुमार साहित्य चळवळ निर्माण करणारे थोर बालसाहित्यिक म्हणजे अमरेंद्र लक्ष्मण गाडगीळ !
दि. २५ जून १९१९ रोजी त्यांचा जन्म झाला.बालपणापासून त्यांना लेखन,वाचन,याचा व्यासंग असून,अनेक मासिकातून त्यांचे लिखाण, लहान मुलांच्यासाठी गोष्टी प्रसिद्ध होत असत. त्यांच्या समकालीन लेखकात वि.म.कुलकर्णी, ग.ह.पाटील, मालतीबाई दांडेकर, भा.रा.भागवत यांचा समावेश होतो. जणू लेखन हेच त्यांचे जीवन असून बालसाहित्य हा श्वास होता असे म्हणजे त्यांच्या बाबतीत उचित ठरेल.
त्यांनी पुणे येथील दैनिक केसरी, नागपूर येथील दैनिक महाराष्ट्र येथे उपसंपादक म्हणून तर अनिल, राष्ट्राशक्ती या नियतकालिकांचे संपादक म्हणून काम पहिले. त्या मुळे उत्तम पत्रकार,संपादक,कथाकार,कादंबरीकार,निबंधकार,चरित्रलेखक म्हणून ते जनमानसात प्रसिद्ध होते. सन १९७५ मध्ये त्यांनी बालसाहित्याचा प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीकोनातून “मराठी बालकुमार साहित्य संमेलन ” सुरु करून बालसाहित्य चळवळीचा पाया रोवला.
सन १९७५ मध्ये पुणे येथे बालसाहित्यिक भास्कर रामचंद्र भागवत यांच्या अध्यक्षतेखाली पहिले बालकुमार साहित्य संमेलन भरवून बालसाहित्याची गंगा प्रवाही केली. सन १९७८ मध्ये इचलकरंजी येथे भरलेल्या ०४ थ्या साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी स्वत: भूषवले. आज सुमारे ४४ वर्षे अविरत पणे चाललेल्या बालकुमार चळवळीचा आलेख उंचावला असून, त्यांनी लावलेल्या बालसाहित्य रोपट्याचे आज भव्य अशा वटवृक्षात रुपांतर झाले आहे.
गाडगीळ यांची साहित्य संपदा दर्जेदार असून, त्यांच्या साहित्यात ‘जीवन –संग्राम’(कथासंग्रह -१९४५), ताई आणि भाऊ (१९४६), सुभाषचंद्र (१९४८ ), श्वाईटझर( १९५७ ) , जय जय रघुवीर समर्थ (१९६०), वटपत्र (१९६१), पुण्यातील जलप्रलयाचा इतिहास (१९६१), वंदेमातरम (१९७२), वीर आणि परमवीर (१९७४), अज्ञाताची वचने, ईशावास्य केनोपनिषद -६ उक्तिविशेष (संपादित), किशोरमित्रांनो, लोकसेवक चरित्रमाला -ठक्करबाप्पा (चरित्र), दिगंतावरी, देवादिकांच्या गोष्टी (भाग १ ते ५) ,प्रवासी राम, महर्षी आइन्स्टिन (चरित्र) ,महाभारत सर्वांगीण दर्शन, लोकसेवक चरित्रमाला -रविशंकर महाराज, राम बंधू त्याग सिंधू (कथासंग्रह),रामायण सम्यक् दर्शन, राष्ट्रसेवकाची शिदोरी ,शत-कुमार-कथा (भाग १ ते ४) (संकलित) शत-कुमार-कथा (भाग ५वा); पुरवणी पुस्तक; बालवाङ्मयाच्या साहित्यशास्त्रावरील काही लेख आणि ( पहिल्या चार भागांतील कथांच्या लेखकांची सूची), श्रीगणेश कोश (६ खंड ), श्रीरामकोश (वाल्मीकी रामायणाच्या समग्र अनुवादासहित- ६ खंड), श्रीहनुमानकोश (संपादित) ,साहित्य सरिता , सुजनहो ऐका रामकथा अशी दर्जेदार पुस्तके आहेत. तसेच भवभूती (उत्तर रामचरित,मालतीमाधव), भास (उरुभंग,कर्णभार,मध्यम योग), शूद्रक (मृच्छ्कटीक),कालिदास (रघुवंश,विक्रमोर्वशिय, वेणीसंहार,) अशा संकृत नाटकांच्या कृतींचा परिचय करून देणारी माहितीयुक्त पुस्तके लिहून साहित्यक्षेत्रात आपले स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ केले.
आपल्या हिंदुधर्मातील गुढीपाडवा,अक्षयतृतीया,नागपंचमी, अनंत चतुर्दशी दिवाळी,मंगळागौर,रामनवमी,हनुमानजयंती, मकरसंक्रांत, एकादशी,नृसिंहजयंती,अशा सण –उत्सवांचे महत्व सांगणारी पुस्तके लहान मुलांसाठी लिहिली. त्यांनी वोरा अँड कंपनीच्या मराठी विभागाचे संपादक म्हणून अनेकवर्ष काम पहिले. ‘श्रीराम कोश मंडळ’, व ‘समर्थ रामदास संशोधन प्रबोधन’ या संस्थांची स्थापना करून ते अखेरपर्यंत कार्यरत राहिले. तसेच स्वता:ची गोकुळ प्रकाशन ही संस्था सुरु करून बालकुमारांसाठी खास ‘गोकुळ’ हे मासिक सुरु केले.
दि. ०३ जानेवारी १९९४ रोजी बालसाहित्याच्या क्षितिजावरून अमरेंद्र गाडगीळ या रविराजाचा अस्त झाला.त्यांच्या सारख्या विस्मृतीत गेलेल्या प्रतीभावंत लेखकाची दाखल सर्वांनी घेणे जरुरीचे आहे, जेणे करून जेणे करून त्यांची स्मृती जपली जाईल.
Leave a Reply