मन:शक्ती प्रयोग केंद्राचे संस्थापक पु. रा. भिडे तथा स्वामी विज्ञानानंद यांचा जन्म २३ एप्रिल १९१८ रोजी झाला.
मनःशक्ती प्रयोग केंद्राचे प्रथम चिंतक स्वामी विज्ञानानंद हे या विभूतीचे नाव. ‘प्रथम चिंतक’ हा शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे. कारण स्वामीजींनी कधीच स्वत:ला संस्थापक म्हणवून घेतले नाही. तेवढाही अहंकार त्यांना नको होता. त्यांनी कधी कुणाचा खाली वाकून नमस्कार स्वीकारला नाही. कुणाला गुरू केले नाही. कुणाला शिष्य केले नाही. गादीपरंपरा नाकारली. कुठली वस्तू मागे ठेवली नाही. छायाचित्रही काढू दिले नाही. त्यांचे चरित्रही उपलब्ध नाही!
स्वामीजींचा जन्म रोजी पुण्यात झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव पु. रा. भिडे. या लघुरुपाचे पूर्ण रूप काय हे कुणालाही माहिती नाही. कारण वर सांगितल्याप्रमाणे त्यांचे चरित्र उपलब्ध नाही. ते पुणे विद्यापीठातून एम.ए. झाले होते. स्वामीजी नेहमी म्हणत असत, की पहिली चाळीस वर्षे मी अत्यंत सामान्य जीवन जगलो; पण २२ मार्च १९५७ रोजी त्यांना साक्षात्कार झाला. एका प्रकाशाने त्यांच्यासमोर येऊन सांगितले, की विज्ञान व अध्यात्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे तू सर्व जगाला ओरडून सांग आणि मग स्वामीजींचे आयुष्य बदलले.
पुढे २१ फेब्रुवारी १९६३ रोजी देशासाठी सर्वस्व त्याग, या भावनेतून विधिवत संन्यास घेतला. आपल्या तत्त्वज्ञानाच्या प्रसारार्थ १९७० मध्ये लोणावळा येथे मनःशक्ती प्रयोग केंद्राची स्थापना केली. गेली ४७ वर्षे हे केंद्र आपल्या आध्यात्मिक आणि वैज्ञानिक विचारांनी सगळ्या जगाला भारून टाकते आहे. आज मनःशक्ती केंद्राला लागलेली माणसांची रीघ हे याचेच द्योतक आहे.
माणसाची धडपड सुखासाठी असते. मग त्यांच्या वाट्याला दु:खच का येते, या प्रश्नाने स्वामीजींना ग्रासले. जगात प्रत्येकाची धडपड सुखासाठी असताना प्रत्येक जण दु:खी का, या प्रश्नाभोवती स्वामीजींचे चिंतन सुरू झाले. ते इतके, की मनःशक्ती प्रयोग केंद्राची स्थापना करून ते थांबले नाहीत, तर या प्रयोग केंद्राचे काम अत्यंत जोमाने वाढवण्यासाठी ते सुरूच राहिले. त्यासाठी त्यांनी काय काय केले? विज्ञान अभ्यासले. विज्ञानात सुख- दु:खाची संकल्पना आहे का हे त्यांनी अभ्यासले. त्यांना असे आढळले, की विज्ञानातही सुख-दु:खाच्या संकल्पना आहेत; पण त्या वेगळ्या स्वरूपात मांडण्यात आलेल्या आहेत. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम हेच सांगतो, की प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते. म्हणजे सुखानंतर दु:ख, दु:खानंतर सुख हे ठरलेले आहे हेच न्यूटनने वेगळ्या, वैज्ञानिक भाषेत सांगितले आहे. त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला.
मानसशास्त्राचा अभ्यास केला. मेंदुशास्त्र, वैद्यकशास्त्र, अध्यात्म, धर्म आदी २७ ज्ञानशाखांचा अभ्यास त्यांनी रोज १६-१६ तास असा चाळीस वर्षे केला. ध्यास एकच होता, की मानवी आयुष्य हे खऱ्या अर्थाने सुखी कसे होईल. बावीस प्रकारच्या तपसाधना त्यांनी केल्या. अडीचशेहून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली आणि आपले तत्त्वज्ञान लोकांसमोर मांडले. त्यालाच मनःशक्ती केंद्राचे ‘न्यू वे’ (New Way) तत्त्वज्ञान म्हंटले जाते. काय आहे हे तत्त्वज्ञान? ‘न्यू वे’चा एक अर्थ जीवन जगण्याचा नवीन मार्ग असा आहे, तर दुसरा गर्भित अर्थ ‘न्यूटनिक अर्थाने वेद’ असा आहे. न्यूटनने जे नंतर सांगितले, ते वेदांनी अगोदरच मांडले होते हे त्यांनी सर्व जगाला दाखवून दिले. आपले हे तत्त्वज्ञान त्यांनी जगातील नामवंत विचारवंत व शास्त्रज्ञांकडे अभिप्रायासाठी पाठवून दिले. सगळ्यांनी या तत्त्वज्ञानाला दुजोराच दिला. त्यांची मतेही स्वामीजींच्या अनेक पुस्तकांतून आपल्याला पाहायला मिळतात. काय सांगते हे तत्त्वज्ञान? हे तत्त्वज्ञान सांगते, की सुखानंतर दु:ख हे अटळ आहे. मग सुरुवात असतानाच आपण रोज थोडे थोडे दु:ख स्वीकारले तर आपल्याला एकदम दु:ख होणार नाही. कसे स्वीकारायचे हे दु:ख रोज थोडे थोडे? माणसाला सगळ्यात जास्त दु:ख कधी होते? दुसऱ्यांसाठी करताना माणसाला सर्वाधिक दु:ख होते. मग हे दु:ख तर रोज आपण जाणीवपूर्वक स्वीकारले तर नंतर एकदम दु:ख आपल्याला होणार नाही. म्हणजेच रोज जर आपण किमान एक तास दुसऱ्यासाठी दिला, समाजासाठी काही तरी केले तर नंतर एकदम आपल्यावर दु:खाचा डोंगर कोसळणार नाही. एक तास जमत नसेल तर एक तासाचे धन काढून द्यावे.
खरे म्हणजे एवढे सगळे करण्यासाठी स्वामीजींना गरज नव्हती. संन्यास घेण्याअगोदर ते पत्रकार होते. बेचाळीसच्या स्वातंत्र्यलढ्यातही त्यांनी भाग घेतला होता. तुरुंगवासही भोगला होता. स्वातंत्र्यानंतर २७ वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लिखाण प्रसिद्ध होत होते. त्यांनी लिहिलेली अडीचशेवर पुस्तके याचीच साक्ष देतात.
त्यांनी चार चित्रपटही काढले होते. १९४८ मध्ये आलेला ‘वंदे मातरम्’ हा त्यांचा गाजलेला चित्रपट! या चित्रपटात त्यांनी सुधीर फडकेंना पहिल्यांदा ‘ब्रेक’ दिला. ग. दि. माडगूळकर, पु. लं. देशपांडे, सुनीती देशपांडे, राम गबाळे, सुधीर फडके आणि माणिक वर्मा हे सहा दिग्गज एकत्र करून काढलेला हा पहिला व अखेरचा चित्रपट. हे सहा दिग्गज परत कुठल्याही चित्रपटात एकत्र दिसले नाहीत. माणिक वर्मांचाही हा पहिलाच चित्रपट! या चित्रपटातील गदिमांनी लिहिलेले एक गीत, ‘वेद’मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम’ हे अजूनही लोकप्रिय आहे. त्यांनी ‘जय भीम’ आणि ‘सीतास्वयंवर’ हे हिंदी चित्रपटही काढले. १९५७ मध्ये आलेला ‘लोलन’ या शास्त्रीय रागावर आधारित चित्रपट आहे.
स्वामीजी असे एक प्रयोगशील विचारवंत होते. केवळ चित्रपटातच त्यांनी असे वेगवेगळे प्रयोग केले नाहीत तर जीवनातील अनेक बाबींशी निगडित असे विविध प्रयोग त्यांनी केले. येरवड्याला जाऊन तेथे फाशीवर जाणाऱ्या कैद्यांवर त्यांनी प्रयोग केले. त्यांना असे आढळले, की निर्घृणपणे दुसऱ्याची हत्या करणारे हे कैदी स्वत:च्या मृत्यूची वेळ आली म्हणजे लटपटतात! त्यांनी फाशी देऊन झालेल्या कैद्यांच्या कलेवरांवर प्रयोग केले. उद्देश हाच होता, की मृत्यूनंतर शरीरात किती वेळ धगधग कायम राहते. आत्मा आहे की नाही, याचा शोध त्यांना घ्यायचा होता.
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आश्रमात आल्या. त्या वेळी त्यांनी त्यांना चित्रपटातील गीतांऐवजी शास्त्रीय राग गायला सांगितला. लतादीदींनीही ‘मालकंस’ गायला तेव्हा त्यांचा आवाज ध्वनिमुद्रित करून तो त्यांनी झाडांना ऐकवला व संगीताचा झाडांवर काय परिणाम होतो ते अभ्यासले.
एकदा स्वामीजी लोणावळा परिसरातच आपल्या तत्त्वज्ञानाच्या प्रचारासाठी गेले होते. तेथील आदिवासी लोक ते काय सांगतात इकडे लक्ष देण्यापेक्षा त्यांच्या भगव्या कफनीकडेच बघत आहेत. आदिवासी पोत्याची वस्त्रे परिधान करीत. ते पाहून स्वामींनी दुसऱ्या दिवसापासूनच त्यांनी पोत्याची वस्त्रे वापरायला सुरुवात केली. मला जर आदिवासींमध्ये जाऊन काम करायचे असेल तर मलाही त्यांच्यासारखीच वस्त्रे घालावी लागतील; नाही तर ते मी काय सांगतो इकडे लक्ष देण्यापेक्षा माझ्या वस्त्रांकडेच बघत बसतील, असे ते म्हणत.
स्वामीजींचा त्याग एवढा होता, की त्यांनी आपली त्वचासुद्धा समाजसेवेच्या भल्यासाठी दान केली. मन:शक्ती प्रयोग केंद्रालाही त्यांनी आपले सर्वस्व दान करत समाजहित चिंतणारी सामाजिक सेवा संस्था उभारली. चाळीस प्राकारचे अभ्यास वर्ग आणि अडीचशेच्या वर स्वामीजींनी लिहिलेली पुस्तके हे या केंद्राचे विचारधन आहे.
आपले कार्य आपल्यानंतरही फोफावेल हे लक्षात आल्यावर स्वामीजींनी १८ नोव्हेंबर १९९३ रोजी प्रकाश समाधी घेतली आणि आपले प्रकाशमय जीवन अनंताच्या स्वाधीन केले.
स्वामीजी नेहमी म्हणत असत, ‘मी शरीरात नसेन तेव्हाच सामर्थ्यवान असेन.’ त्यांच्या या वाक्याची प्रचीती आज येत आहे. मनःशक्ती प्रयोग केंद्राचा वाढलेला वटवृक्ष याचीच साक्ष देतो आहे. दहा हजार साधक कार्यकर्ते महाराष्ट्रभर पसरलेल्या ४२ शाखांमधून हा वटवृक्ष अजूनही वाढवत नेत आहेत.
पु. रा. भिडे यांचे १८ नोव्हेंबर १९९३ रोजी निधन झाले.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply