नवीन लेखन...

मित्र

 

मित्र कोणाला म्हणावे? खरंतर या प्रश्नाचं उत्तर अनेक विद्वानांनी आपापल्या परीनं शोधलं आहे, दिलं आहे. परवाच मला एक एसएमएस आला. त्यात म्हटलं होतं, ‘मित्र हा भितीसारखा असतो. काही वेळा तिचा तुम्हाला आधार घेता येतो, काही वेळा तिच्यात तोंड लपवून तुम्ही रडू शकता, काही वेळा ती तिथं आहे, ही भावनाही पुरेशी असते. मित्रांचंही असंच काही असतं.’ खरं आहे का हे? कदाचित खरं असावं- कदाचित अपुरंही. अगदी कालपरवाच एका मैत्रिणीचा एसएमएस आला. त्यात म्हटलं होतं की, दुरावा एवढा काळ असावा, की काही तरी हरवलंय याची जाणीव होत राहावी; पण तो इतकाही असू नये, की त्याच्याशिवायच जगण्याची सवय होऊन जावी. मित्रांनो, खरंच मैत्री केवळ न भेटल्यामुळं संपून जाऊ शकते का? मला वाटतं, तसं नसावं. आणखी एक एसएमएस. असाच मैत्रीचं वर्णन करणारा, महती सांगणारा. त्यात म्हटलंय, ‘तुम्ही एकमेकांना किती ओळखता, किती काळ ओळखता यावर मैत्री अवलंबून नसावी. कोण आधी भेटलं किवा कोण सर्वाधिक आवडलं यावरही अवलंबून नसावी. मैत्र असं, की जो आला तुमच्या मनात अन् परतलाच नाही.’ माणसाचं असं हे व्यक्त होणं, अभिव्यक्त होणं मला वाटतं मैत्रीच्या व्यापक अर्थाच्या शोधाचा हा प्रवास असावा. काही वेळा हा शोध एखाद्या व्याख्येजवळ थांबतो, तर काही वेळा तो तिथंच सुरू होतो. तुमच्या-माझ्यासह अनेकांनी मैत्रीची पहिली व्याख्या ऐकलेली, वाचलेली असावी. ‘फ्रेंड इन नीड, फ्रेंड इनडीड’ जो गरजेला धावून येतो तो मित्र! कितपत खरंय ते? रस्त्यातून जाताना तुमच्या मोटरसायकलला, कारला अपघात झाला. कोणीतरी लगेच धावत आला, तुम्हाला मदत केली. तो कुठे तुमचा मित्र होता? त्याला तर तुम्ही ओळखतही नव्हतात. अडचणीत सापडलेल्या कोणालाही मदत करणं हा तरी मानवी

स्वभाव असायला हवा. मग केवळ त्यामुळं कधी कोणी कोणाचा मित्र होतो? नाही. याचाच

अर्थ ही व्याख्याही अपुरीच असावी. तुम्ह
ही मैत्रीची काही तरी व्याख्या केली असेल, व्याप्ती ठरविली असेल. मी ठरविलीय… कशी? ते समजावून घेण्यासाठी एक अनुभव सांगायला हवा.

 

 

आमचा एक मित्र. पंधरा-वीस वर्षांचा परिचय. त्याचा स्वभाव, आवडी-निवडी सारं काही मित्रपरिवाराला पुरतं ठाऊक होतं. आमच्याशिवायही त्याचा मित्रपरिवार मोठा. त्या प्रत्येकाविषयी हा खूप काही मोठ्या आत्मीयतेनं सांगायचा. त्यांच्याविषयी चांगलं बोलायचा. तर अशा या मित्रानं पुण्यात एक छोटेखानी बंगला बांधला. पुण्यासारख्या ठिकाणी, पुण्यातल्या माणसाला फ्लॅट घेणं कठीण होतं. तिथं यानं बंगला बांधला यांचं आम्हाला अप्रूप. आता शानदार पार्टी व्हायला हवी, सर्वांची एकमुखी मागणी. आता ही मागणी अमान्य होण्याचं काहीच कारण नव्हतं. झालं. मेजवानीची तारीख, वेळ ठरली. आम्ही त्याच्या नव्या वास्तूत पोहोचलो. मित्रही सर्वांना कुठे, काय याची माहिती देत होता. दिवाणखान्यात छान बैठक तयार केली होती. फर्निचरही उंची होतं. फॅन आणि त्यात दिव्याची व्यवस्था ते कमी-अधिक करण्याची सोय. स्वयंपाकघरात ग्रीन ग्रॅनाईड, किचन चिमणी, कुकींग रेंज, बाथरूमला जोडून असलेल्या जागेत वॉशिग मशीन, टी.व्ही. असा की तो ३६० अंशांत फिरविता यावा… एकूणच जे काही केलं होतं ते छान होतं. मेजवानी सुरू झाली, काही जण थंड पेयपान करीत होते, तर काहींनी त्यात अधिक ऊर्जा मिळण्याची व्यवस्था केली होती. हॉलमध्ये, छोट्याशा लॉनमध्ये गप्पांची कोंडाळी पडू लागली. गप्पा रंगू लागल्या. एका कोपर्‍यातून आवाज आला… अर्थात हळूच, ‘‘अरे इतकं सगळं केलंय; पण पैसे आणले कुठून यानं? काही तरी लाईन केलेली दिसतेय.’’ दुसरा म्हणाला, ‘‘कशाला काही करायला हवं? इतकी वर्षे सत्तेच्या नोकरीत आहे. नुसतं काही सांगायचा अवकाश, लगेच हजर.’’ तिसरा म्हणाला, ‘‘अरे बिल्डरला खूप मदत केलीय त्यानं; मग एवढा बंगलाही देऊ नये का त्यानं?’’ एकजण म्हणत होता, ‘‘अंथरूण पाहून पाय पसरायला हवेत. इथं तर यानं खूपच कर्ज करून ठेवलेलं असावं.’’ पार्टी रंगत होती. मित्र प्रत्येकाची आवर्जून च

ौकशी करीत होता. सर्वच जण हसतमुखानं आणि तोंडभरून त्याचं कौतुक करीत होते. मनात मात्र ‘मला हे कधी जमलं नाही. सत्ता वापरायलाही अक्कल लागते. आपलं बरंय, तीन खोल्यांचा फ्लॅट; पण शांत झोप येते. कोणाचं काही घेतल्याचं ओझं नाही.’ मोठ्या आनंदात पार्टी संपली. मध्यरात्र होऊन गेली होती. बहुतेक जण परतले होते. दोघे-चौघे रेंगाळलेले होते. ‘‘काय कसं काय?’’ मित्रानं विचारलं. मीही ‘‘छान’’ म्हटलं. कौतुकानं तो सुखावला होता. मित्रांच्या कुजबुजीनं मी अस्वस्थ झालो होते. मला वाटलं, संकटकाळी धावून येतो तो मित्र, ही व्याख्या बदलायलाच हवी. आपल्या आनंदात प्रामाणिकपणे, प्रांजळपणे जो सहभागी होतो, होऊ शकतो, आनंद वाढवितो अन् स्वतःही दुःखी होत नाही, तो खरा मित्र. मी घरी परतलो. झोप येत नव्हती. मनात विचार येत होते, खरंच एवढं सगळं यानं केलंय; पण कसं केलं असेल?

 

 

आपण कोणाचे मित्र आहोत का? याचं उत्तर प्रत्येकानं स्वतःपुरतं शोधायचं!

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..