अति, भरपूर, मायंदाळ, अशा अनेक शब्दांशी आपण सतत धडकत असतो. काहीवेळा हव्यास त्यामागे असतो, कधी ईर्ष्या, द्वेष,मत्सर अशा दृश्य भावना त्यामागे असतात. म्हणून “घेता किती घेशील दोन्ही करांनी” अशी अवस्था झाल्याने आपण दोन हातांनी जे गोळा करता येईल त्याच्यासाठी उरस्फोड धावाधाव करतो. वेळ कमी आणि हाव जास्त ही गती सध्या झालेली दिसते. एकापेक्षा अधिक घरे, एकापेक्षा अधिक वाहने, असा हा न संपणारा प्रवास होत चाललाय. मिळतंय ते,मिळेल त्या मार्गाने साठवायचं या प्रवृत्तीने सर्वांनाच गाठलंय. उभारीच्या वयात कदाचित हे क्षम्य असेलही कारण त्याला महत्वाकांक्षेची जोड असू शकते, स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्याचे साधन असू शकते.पण महत्वाचे असे की कोठे थांबायचे हे उमगत नाही आणि तिथेच “सूज ” निर्माण होते- गरजा कमी आणि संसाधने अधिक ! यातील काही पुढच्या पिढीसाठी तरतूद करून ठेवणे हा शुद्ध भाव त्यामागे असतो.
केव्हातरी, कोठल्यातरी निमित्ताने, एखाद्या दगडाशी आपण ठेचकाळतो आणि जाणवते- अरे, खूप काही गर्दी आपण स्वतःभोवती गोळा करून ठेवलंय. अधिक वस्त्रे, अधिक पादत्राणे, अधिक शोभेच्या वस्तू अशा अनेक “अधिक”ने आपण केव्हा ग्रस्त होऊन जातो हे कळत नाही. मग कारणपरत्वे हा “पसारा” आपण आवरायला घेतो. नुकतेच या REALIZATION ला कारणीभूत झालेले आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे- “कोरोना”.
या जागतिक महामारीने जगण्याचे सगळे प्राधान्यक्रम उलटपालट केले. महत्वाकांक्षा थोडीशी मागे सरकली आणि कुटुंब,आरोग्य अशी नवी जमवाजमव वाट्याला आली.
आता असंग्रहाकडे निघू या.
आवश्यक असेल तेवढेच जतन करायचे आणि हातातील अनावश्यक साठ्याचा त्याग करायचा. गरजा किमान करीत स्वतःला शक्य तितके छाटत जायचे. तरीही मस्त जगता येते,याची पूर्वी घेतलेली अनुभूती पुन्हा घ्यायची.
प्रत्येक ठिकाणी जायला वाहन हवे, दोन भ्रमणध्वनी किंबहुना दोन सीम कार्डस का हवेत याचा मनाशी उजाळा करावा. किती खोल्यांचे घर, किती वस्त्रांनी भरलेले कपाट, बँकेच्या लॉकरचे धन झालेले किती दागदागिने जमवायचे हे एकदा ठरवायला हवे. रोज नवी खेळणी, हरेक सणाला वस्त्रप्रावरणे खरेच हवेत का, त्यांचा कितपत वापर होतो आणि या मुबलक अवस्थेमुळे वस्तूंचे/वस्त्रांचे खरे मोल कळते तरी का, हा प्रश्न न सुटणारा का राहतो?
लहानपणी फुटलेला चेंडू सहजी फेकून न देणारे , वापरलेल्या वहीची कोरी पाने वापरणारे, मोडके खेळणे डागडुजी करून पुन्हा खेळण्यात रमणारे आपण केव्हातरी या मुबलकाच्या घेऱ्यात अडकलो. त्यांतून फारसे सुखावह काही हाती पडत नाही, झाला तर त्या वाढीव व्यापाचा जाचच होतो हे कळण्याच्या वयात केव्हातरी यायला नको का?
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply