‘ज्येष्ठ म्हणजेच श्रेष्ठ आणि श्रेष्ठत्व असलेला प्रत्येक जण ज्येष्ठ’ असं मी मानते. आज अनेक वर्षे कला क्षेत्रात काम करीत असताना नव्या आणि जुन्या पिढीतील प्रत्येक कलाकारांकडून अनेक गोष्टी नकळतपणे शिकायला मिळतात. जसं गुरू हा अनुभवी असावा, तो वयाने मोठा असलाच पाहिजे असं नाही. त्याप्रमाणे प्रत्येक श्रेष्ठ हा वयाने ज्येष्ठ असलाच पाहिजे असं नाही. मात्र कलाकार म्हणून मी समृद्ध होताना अनेक वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ व्यक्तींचा मोलाचा वाटा आहे. मग विनय आपटे असोत, डॉ. ओक असोत, आपले शरद पोंक्षे आहेत, नयना आपटे आहेत, सतीश तारे आहेत अशी अनेक दिग्गज मंडळी मला खूप काही शिकवत होती आणि मी ते आधाशासारखी घेत होते. ज्येष्ठ श्रेष्ठ का असतात, तर मला वाटतं त्यांच्या अनुभवामुळे! ज्येष्ठ लेखक, कवी, नाटककार, पत्रकार यांच्या साहित्यातून, वाचनातून आणि आपण पाहिलेल्या अनेक पावसाळ्यातून आपण आपला ज्ञानाचा घडा भरत जातो. अनुभव माणसाला शिकवतोच पण वाचन, साहित्य आणि साहित्यकृती यातून तो प्रगल्भ होतो. दिवाळी अंक आणि अनेक उत्तमोत्तम मासिकं यांची महाराष्ट्राला फार मोठी परंपरा आहे. ज्येष्ठांनी या वयात काय करावं, असं अनेक जण विचारतात. मी म्हणेन की, शक्य तेवढं आपल्या कार्यक्षेत्रात व्यस्त राहावं, हातपाय सुरू ठेवावेत, घरी असाल तर वाचन-चिंतन-पाहणं यातून जेवढं अनुभवांचं भांडार जमा करता येईल तेवढं करत राहावं. एकटेपणा मनाला कधीही शिवता कामा नये इतकं स्वतःला व्यस्त ठेवाल तर श्रेष्ठत्वामुळे येणारी एक शांती, समजूतदारपणा आणि न आवडणार्या गोष्टींना दुर्लक्षित करण्याचा मनाचा मोठेपणा आपोआप येत जातो. विरक्ती नसली, तरी मोहमायेत अडकून पडणं टाळता येतं, खर्या अर्थाने ज्येष्ठ आणि पर्यायाने श्रेष्ठ होता येतं.
—संध्या म्हात्रे
(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply