मुंबईहून दिल्लीमार्गे थेट पाकिस्तानच्या सरहद्दीपर्यंत जाणारी पश्चिम रेल्वेवरील ही एक अति-महत्त्वाची गाडी. दोन रात्रींचा प्रवास करत ही गाडी मुंबईहून अमृतसर शहर गाठते. सरहद्दीपर्यंत जाणारी गाडी म्हणून पूर्वी तिचं नाव ‘फ्रंटियर मेल’ असं होतं. पुढे अमृतसर तेथील सुवर्णमंदिरामुळे प्रसिद्धीस आल्यानंतर या गाडीला ‘सुवर्णमंदिर एक्सप्रेस’ असं नाव ठेवलं गेलं. आज ही गाडी त्या दोन्ही नावांनी ओळखली जाते.
ब्रिटिश राज्यकर्त्यांना मुंबईत बोटीनं उतरल्यावर दिल्ली गाठण्यासाठी मध्य रेल्वेपेक्षा पश्चिम रेल्वे मार्ग हा अधिक जवळचा होता. त्यामुळे ब्रिटिश राजवटीत ह्या गाडीचं महत्त्व बरंच होतं. व्हॉईसरॉय, ब्रिटिश सरसेनापती व इतर मान्यवर याच गाडीनं दिल्लीला जात असत. पुढे स्वातंत्र्यानंतर भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान व अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्ती राजेशाही थाटात याच गाडीनं प्रवास करीत. आजच्या घडीला ही गाडी हजारो पर्यटकांना सुवर्णमंदिराचं दर्शन घडवते.
पंजाबचे प्रवासी म्हणजे अफाट सामान, त्यांत भलेमोठाले पेटारे, ट्रंका, खेचून नेता येणाऱ्या जम्बो बॅग्ज, त्याला साजेसे खाण्याचे अनेक कप्पी डबे, घर सजविण्याच्या अनेक शोभिवंत वस्तू, पेटिंग्ज… अशा असंख्य गोष्टी डब्या-डब्यातून दिसतील. त्यातच जर लग्नाचं वहाड असेल, तर मग माहौल औरच. गव्हाळ वा गौरवर्णीय, दागिन्यांनी मढलेल्या, नटलेल्या पंजाबी ललना, त्यांच्याबरोबर दणकट, उंचपुरे, दाढी-फेटेवाले सरदारजी. गाणं बजावणं, सतत चरत राहणं, पंजाबी भाषेत चालणाऱ्या हास्याच्या व गप्पागोष्टींच्या फैरींच्या फैरी या डब्यांमधून लग्नाघराचंच वातावरण तयार करतात. पंजाबी लोक असे दिलदार, की तुम्ही सहप्रवासी म्हणून त्यांच्या डब्यात असाल तर तुम्हालाही आपल्या मौजमजेत व खाण्यापिण्यात सामील करून घेतात.
माझा वैद्यकीय महाविद्यालयातील मित्र परांजपे ह्या गाडीच्या महाप्रेमात असे. मेडिकल इंटर्नशिप करताना आम्ही पालघर स्टेशनजवळ राहत होतो. मुंबईहून निघालेली फ्रंटियर मेल रात्री साधारण ११ च्या सुमाराला पालघरजवळ तुफान वेगात येत असे. स्टेशनजवळच्या एका लेव्हल क्रॉसिंगच्या फाटकाजवळ आम्ही सर्व मित्र त्या वेळेच्या गप्पागोष्टी मारत या गाडीची प्रतीक्षा करीत असू. बहुतेक वेळा ती बरोबर वेळेत येत असे. दूरवरून प्रथम इंजिनाचा डोळे दिपविणारा उजेड दिसू लागला, की आम्हा सर्व रेल्वेप्रेमींचे चेहरे असे काही फुलत, की त्या आनंदाला तोड नसे. संपूर्ण गाडी जाईपर्यंत, अगदी गाडीच्या शेवटाला असलेला लाल दिवा दिसेनासा होईपर्यंत, मंत्रमुग्ध होऊन खिळून राहिलेले आम्ही नंतरच परतीची वाट धरत असू. अगदी आपणच अमृतसरपर्यंत प्रवास करीत आहोत अशी मनाची अवस्था असे. त्यात परांजपेचा रेल्वेटाईमटेबलचा गाढा अभ्यास! मग तेव्हा त्याची नुसती फ्रंटियर मेलवर आधारित प्रश्नमाला आजच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या धर्तीवर सुरू होत असे. पहिल्या प्रश्नातच सर्व जण गारद होत. प्रश्न असे की, रात्री ११ वाजता किती फ्रंटियर मेल प्रवास करत असतील?
तसंच, त्यावेळी त्या कोणत्या स्टेशनजवळ असतील? कारण, एकूण जाणाऱ्या २ व येणाऱ्या २ मिळून चार गाड्यांना विचारात घ्यायचं असे. उत्तर देणं सर्वांनाच अशक्य, परंतु या महाभागाला उत्तरं बरोबर माहीत असत व त्याचा खुलासा व खात्री तो टाईमटेबल दाखवून लगेचच करून देई.
जवळजवळ १९६० सालापर्यंत या फ्रंटियर मेल गाडीला आलिशान फर्स्ट क्लासचा डबा (सलून) असे. तो डबा म्हणजे फिरता राजवाडाच होता. पुढे तो वातानुकूलित (ए.सी.) बनला. आता तर या गाडीला ६ ते ७ एअर कंडिशन्ड डबे आहेत.
आता सुवर्णमंदिर नावाने ओळखली जाणारी ही गाडी बाराही महिने सतत पूर्ण आरक्षित असते. या गाडीची मुख्य खासियत आहे, चिकन बिर्याणी आणि मडक्यातील घट्ट दही. ती खाद्यसंधी खवय्यांना खूश करते. या फ्रंटियर मेलचा प्रवास आजही सुखाचा व आनंद देणारा आहे.
-डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply