उगवले होते जंगलात ते उंच माळावरी
रंग आकषर्क फुलझाडांचे मन प्रसन्न करी ।।
जरी होता उग्रवास तयाला मधूरता आगळी
खेचित होते सौंदर्याने फुलपांखरे जवळी ।।
वनराईचा पुष्कराज तो डोलत होता आनंदे
ऐकत होता मान हलवूनी कोकिळेची पदें ।।
वर्षा विपूल प्रकाश विपूल आणिक तो वारा
स्वच्छंदाचे भाव उमटवित वाढवी स्वैर पसारा ।।
कुणीतरी आला वाटसरु तो घेउन गेला त्याला
बागेमधल्या कुंडीमध्ये मान तयाचा झाला ।।
खतपाणी भरपूर असूनी मुंग्या किडे नव्हते
आधूनिकतेची दृष्टी ठेवूनी वाढवित त्यास होते ।।
डेरेदार डौलदार भरगच्च भासला तो आता
परि स्वातंत्र्याच्या जीवनाला कात्री लागून जाता ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply