शहरातील पाॅश एरियातील हाउसिंग सोसायटीमध्ये, रहायला येऊन मला पाच वर्षे झाली होती. मी भारतीय नौदलात पस्तीस वर्षे सेवा करुन निवृत्त झालो होतो. रोज सायंकाळी आम्ही आठ दहाजणं ज्येष्ठ नागरिक, सोसायटीच्या बागेत गप्पा मारत बसायचो. त्यामुळे वेळ मजेत जात असे.
गेल्या महिन्यापासून आमच्याच वयाची एक नवीन व्यक्ती आम्हाला बागेत दिसू लागली होती. ते गृहस्थ उंचेपुरे व धिप्पाड शरीरयष्टीचे होते. ते आमच्या समोरुन जाताना, आमच्याकडे तुच्छतेने पहात असत. बागेत दोन चकरा मारुन झाल्यावर कोपऱ्यातील बाकड्यावर, ते एकटेच बसत. कधी कुणाशी बोलणे नाही, कुणाला पाहून हसणं नाही.. आम्हा सर्वांना त्यांचं वागणं हे चमत्कारिकच वाटायचं..
एकदा मी थोडा लवकरच बागेत येऊन बसलो होतो. तेवढ्यात ते गृहस्थ माझ्यासमोरुन जाताना दिसले. मी त्यांना हाक मारली व बोलावले.. ते अनोळखी माणसाकडे पहातात, तशा नजरेने पहात माझ्या शेजारी येऊन बसले.
मी त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करीत म्हणालो, ‘आज लवकरच बागेत आलात?’ त्यावर ते कोरडेपणाने म्हणाले, ‘हो, आज घरातले सर्वजण बाहेर गेले आहेत, म्हणून मी इकडे आलो..’ त्यांच्याशी बोलून मला एवढंच कळलं की, ते गृहस्थ शासकीय सेवेत उच्च पदावर काम करत होते. निवृत्त झाल्यानंतर त्यांना त्यांचे सरकारी निवासस्थान सोडावे लागले होते. म्हणून त्यांना मनाविरुद्ध, या सोसायटीमधील टू बीएचके फ्लॅटमध्ये यावे लागले होते..
आता रोजच्या सायंकाळच्या भेटीमध्ये, ते आमच्यासोबत बसू लागले. तरीदेखील त्यांचं बोलणं हे मनमोकळं नसायचं.. प्रत्येकाशी ते अरे तुरे करायचे.. बोलताना मी किती मोठ्या पोस्टवर काम केलंय, हे पुन्हा पुन्हा सांगायचे.. माझ्या हाताखाली मोठा स्टाफ होता, मला सगळे वचकून असायचे याची, ते पुष्टी जोडायचे. थोडक्यात, त्या पदावरुन निवृत्त होऊन देखील त्यांचे विचार तसेच राहिले होते..
एका संध्याकाळी आम्ही दोघेच बागेत बसलेलो होतो.. बाकीचे मित्र यायला अजून अवकाश होता. मी त्यांच्याशी बोलू लागलो, ‘साहेब, आपण फार मोठ्या पदावर काम केले आहे, हे मला मान्य आहे.. मात्र एकदा का आपण निवृत्त झालो की ते पद, ती खुर्ची, तो मानमतराब, तो अधिकार हे सर्व काही विसरुन जायचं. निवृत्तीनंतर आपणा सर्वांची अवस्था ही फ्युज उडालेल्या बल्ब सारखी झालेली असते.. या बल्बने एकेकाळी किती प्रखर उजेड दिला होता हे कुणाला सांगूनही खरं वाटत नाही.. मग तो बल्ब साधा ४० किंवा ८०, १०० वॅटचाही असू शकतो. काही एलईडी, सीएफएल, टोरनॅडो, हॅलोजन, फ्लोरोसेंटही असू शकतात. मात्र फ्युज उडाल्यावर सगळे एकसारखेच दिसतात.. बिनकामाचे..
तुम्हाला कल्पना नाहीये, आम्ही सगळेजण आपापल्या सेवेतून निवृत्त होऊन आज मजेत जगतोय.. याला कारण, आम्ही आमच्या नोकरीचं, व्यवसायाचं पद, निवृत्त होताक्षणीच विसरलो.. नोकरीतल्या बढायांविषयी कधीही चर्चा करीत बसलो नाही.. माझ्यासोबत जे नेहमी असतात ते जोशी, संसद सदस्य होते. ते नेहमी जाकीट घालणारे देशपांडे एका पक्षाचे अध्यक्ष होते. झब्ब्यात असणारे त्रिवेदी एका मोठ्या कंपनीत सीईओ होते. माने साहेब भारतीय सैन्यात मेजर जनरल होते. या सर्व मंडळीतील प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात एकेकाळचा ‘किंग’ होता.. आता निवृत्तीनंतर सगळे एकसारखे.. फ्युज उडालेले..’
माझ्या बोलण्याचा साहेबांवर खूप परिणाम झाल्याचं मला दिसत होतं.. तेवढ्यात एकेक जण येऊन मैफिलीत सामील झाला. गप्पा झाल्या.
मी त्या दिवसानंतर दोन आठवडे बाहेरगावी गेलो होतो. आल्यानंतर नेहमीप्रमाणे बागेत गेलो तर, साहेब दिलखुलासपणे बोलत होते व बाकीचे श्रोते मन लावून ऐकत होते.. मला पाहताच साहेबांनी मला बोलावले व जाहीर केले, ‘येत्या रविवारी आपण सर्वजण माझ्या फार्महाऊसवर जाऊया. सकाळी जायचं, तेथे गेल्यावर नाष्टा, चहा, जेवण सर्व काही माझ्यातर्फे.. गप्पा मारायच्या, धमाल करायची. मात्र एक लक्षात ठेवायचं, कुणीही आपल्या नोकरीतल्या पदाविषयी बोलायचं नाही.. कारण आपण सर्वजण फ्युज गेलेले, एकसारखेच बल्ब आहोत!!’
मी मनातल्या मनात खुष होतो.. कारण, माझी मात्रा साहेबांवर लागू पडलेली होती.
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
७-४-२२.
Leave a Reply