कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ बी यांची इयत्ता सातवीच्या कुमारभारती पुस्तकात असलेल्या या कवितेचा आणि गाईंचा तसा काही संबंध नाही. आठ-नऊ वर्षांच्या आपल्या रूसलेल्या-रडवेल्या चिमुरडीची समजूत घालत असलेल्या बापाचे मनोगत कथन करणारी ही कविता…
गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या..
का गं गंगा यमुनाही ह्या मिळाल्या
उभय पितरांच्या चित्तचोरटीला..
कोण माझ्या बोलले गोरटीला
तुला लंकेच्या पार्वतीसमान..
पाहुनीया होवोनी साभिमान
काय त्यातील बोलली एक कोण..
“अहा, आली ही पहां भिकारीण”
पंकसंपर्के का कमळ भिकारी..?
धुलीसंसर्गे रत्न का भिकारी..?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी..?
कशी तुही मग मज मुळी भिकारी..?
नारीमायेचे रुप हे प्रसिद्ध
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू..
विलासाची होशील मोगरी तू
तुला घेईन पोलके मखमलीचे
कूडी मोत्याची फूल सुवर्णाचे
हौस बाई पुरवीन तुझी सारी
परी यांवरी हा प्रलय महाभारी
प्राण ज्यांचे वर गुंतले सदाचे
कोड किंचीत पुरवीता नये त्यांचे
तदा बापाचे ह्र्दय कसे होते..?
न ये वदता अनुभवी जाणती ते
देव देतो सद्गुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हांस करंट्यांना..?
लांब त्याच्या गावास जाऊनीया
गूढ घेतो हे त्यांस पुसूनीया
“गावी जातो” ऐकता त्याच गाली
पार बदलूनी ती बालसृष्टी गेली
गळा घालूनी करपाश रेशमाचा
वदे, “येते मी, पोर अज्ञ वाचा..!”
-कवी बी ( नारायण मुरलीधर गुप्ते )
कवी बी यांच्या बद्दल काही माहिती सादर करतोय.!
कवी बी यांचे संपूर्ण नाव नारायण मुरलीधर गुप्ते
जन्म- १ जून १८७२ . मलकापूर जि. बुलढाणा.
मुळगाव- वाशी , जि. रायगड.
मृत्यू- ३० सप्टेंबर १९४७ चिंचवड, पुणे.
वयाच्या १८/१९व्या वर्षी कविता लिहीण्यास सुरुवात केली.त्यांची पहीली कविता “प्रणयपत्रिका” “करमणूक” या मासिकात १८८१ रोजी प्रसिध्द झाली. त्यांची “वेडगाणे” ही कविता त्यांनी “कवी बी” या टोपण नावाने प्रथम लिहिली. नंतर ते याच नावाने लेखन करु लागले.
१९३४ साली “फुलांची ओंजळ” हा कवितासंग्रह प्रथम प्रकाशित झाला. त्यांच्या घरचे वातावरण अतीशय धार्मिक होते.. प.पू.श्री गजानन महाराज गुप्ते त्यांचे धाकटे बंधू होत.
अतिशय हळव्या स्वभावाच्या या कवीची अनेक कवितांपैकी गाजलेली आणि आपल्या मनाच्या जवळची कविता म्हणजे “चाफा बोलेना”. अशा या महान कवीला कोटी कोटी प्रणाम.
– गणेश उर्फ अभिजित
ज्याप्रमाणे गाय हा प्राणी आपल्या स्वतःच्या निरागतसेसाठी आणि निस्वार्थतेसाठी ओळखला जातो तशीच गुण वैशिष्ठ्ये असलेली लेक जेव्हा अश्रूपूरित नेत्रांनी येते कदाचित तोच भाव व संदर्भ घेतला असावा.
गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या…या ओळीचा नक्की अर्थ कोणी सांगू शकेल का ?
मला या पूर्ण कवितेचा अर्थ कोणी सांगू शकेल का? Please
Hi
गायी पान्यावर काय……आल्या.
अर्थ..
इथे गायी म्हणजे मुलीचे डोळे आणि गंगा जमना म्हणजे अश्रु….
रडवलेल्या मुलीची बाप समजुत घालत आहे
ज्याप्रमाणे गाय हा प्राणी आपल्या स्वतःच्या निरागतसेसाठी आणि निस्वार्थतेसाठी ओळखला जातो तशीच गुण वैशिष्ठ्ये असलेली लेक जेव्हा अश्रूपूरित नेत्रांनी येते कदाचित तोच भाव व संदर्भ घेतला असावा.
हे शेगांवचे गजानन महाराज नसून प.पू.गजानन महाराज गुप्ते आहेत ज्यांचे स्थान पंचवटी नाशिक येथे गुगलवर दाखवलंय
गणेशजी@कवी बी हे श्री संत गजानन महाराज यांचे धाकटे बंधू होते,या विधानाला विश्वसनीय आधार काय? कारण,गजानन महाराज यांच्याविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नसताना हा दावा विपर्यास करणारा वाटत नाही का?