आजच्या धकाधकीच्या शहरी जीवनात कधीतरी गावाकडचे दिवस आठवतात.मन गावाकडच्या पांदणीच्या रस्त्याने सुसाट धावते.झाडा-झुडूपातून,नदीनाल्यातून,वना-डोंगरातून हिंडत राहते. आपल्या मनाला रोखणे कठीण असते.ओढ्याकाठी खूपवेळ पाणकोंबडीसारखे रेंगाळत राहते.वाळूत केलेले हिरे आठवतात.हिरा म्हणजे ओढयाच्या वाळूत केलेला छोटा खड्डा.खेळून-खेळून तहान लागल्यावर झिरपलेले स्वच्छ पाणी प्यायचे.तेच आमचे ॲक्वा फिल्टर्ड वॉटर.पाणी पिण्यासाठी दोन्ही हातावर भार देऊन मुंडी खाली करून तोंड लावून गुरा-वासरासारखे पाणी प्यावे लागायचे, कारण तेंव्हा पाणी पिण्यासाठी आत्ता सारख्या प्लॅस्टीक बॉटल्सचा सुळसुळाट झालेला नव्हता.वाहते पाणी स्व्च्छ असते साठलेले पाणी पिऊ नये हा संस्कार तेवढया लहानवयातही आमच्यावर झालेला होता.
गावाकडच्या खेळाची रंगत भारीच असायची.दुपारच्या वेळी सर्वत्र सूर्य आग ओकत असतांना आम्ही पोरंसोरं मात्र खेळात दंग असायचो.बारवंवरच्या मळयात मोठया केळया आंब्यावर आमचेच राज्य चालायचे..राम्या.मारत्या, देईद्या,सरावण्या, सख्या,डिग्या,दास्या किती नावं घ्यावीत.डाफ नावाचा खेळ एवढा रंगायचा की तहान भूक विसरून जायची.आज हे खेळ नामशेष होत आहेत.सर्वत्र क्रिकेट,बॅडमिंटन,फुटबॉल लोकप्रिय असले तरी आम्हाला मात्र या खेळांचा तेंव्हा गंध नव्हता.ऑलंम्पीक किंवा अन्य खेळाचंही काही घेणं देणं नव्हतं.आम्ही आपले डाफ मध्येच गर्क.डाफ म्हणजे काय तर झाडाची दोन फुट लांब फांदी जिला दोन-तीन ठिकाणी दुस-या फांदीत आडकण्यासाठी आकडे असायचे. ज्याच्यावर राज आहे त्याने झाडाखाली उभे राहून डाफ झाडावर उंच फेकायचा. त्याला आडकण्यासाठी फांदीचेच आकडे असल्यामुळे ते कुठल्या तरी फांदीत आडकून रहायचा.सर्व गडी झाडावर आगोदरंच चढलेले असायचे.ते आडकलेला डाफ खाली पाडण्यासाठी प्रयत्न् करायचे.कधी फांदी हालवून डाफ खाली पाडायचा किंवा कधी खाली असलेल्या मुलांने पटकन झाडावर चढण्यासाठी आला तर त्याला चढू द्यायचे नाही.राज्य असलेला गडी डाफ खाली पडायच्या आत कोणाला तरी झाडावर जाऊन शिवायचा.थोडक्यात काय तर झाडावर चाललेले शिवणापाणी.खूप गंमती-जंमती घडायच्या.कधी झाडाची फांदी तूटून एखादा गडी खाली पडायचा.अंगाला खरचटत रहायचं.कपडे फाटायचे.अशावेळी हसून हसून पुरेवाट लागायची.असा हा गंमतीशीर खेळ चालायचा.कोणी तरी झाडावरून बघायचे म्हणायचे धोतरवालं कुणीतरी यायलंय तिकडून..शिव्या खाव्या लागतील या भितीनं थोडावेळ खेळ थांबायचा तसंच झाडावर बसून रहायचं शांत.अशावेळी झाडाच्या ढोलीतून पिंगळ्यांचा आवाज यायचा. एखादा मुलगा हिम्मंत करून ढोलीतून पिंगळयांची पिल्ले बाहेर काढणार हातात घेऊन सर्वांना दाखवणार.गुबगुबीत छोटी छोटी पिलं भेदरल्या नजरेनं पहात रहायची.पंख फडफड करायची उडायचा प्रयत्न करायची परंतु तेवढं पंखात बळ नसायचं. आमच्यामध्येही अजून समजदारीचं बळ आलेलं नव्हतंच.गंमत वाटायची पिल्लं भेदरलेली पाहून.असे मजेदार खेळ खेळत आमचे दिवस जायचे.त्यावेळी ना अभ्यासाचं टेन्शन ना भविष्याची काळजी होती.सर्व जण खेळण्यात दंग व्हायचे.
उन्हाळ्यात विहिरीत पोहण्याची मजा तर भारीच होती.उंच भ-यावरून पाण्यात उड्या मारतांना पोरांची एवढी गर्दी व्हायची की एकावर एक उड्या पडायच्या.विहिरीत पाण्यातले खेळ चालायचे.बुडून एका टोकाचे दुस-या टोकाला निघणारे पट्टीचे पोहणारे सर्वजण असायचे.एखादा पोहण्यासाठी नकार देऊन निघून जात असेल तर त्याच्या अंगाला धूळमाती लावायची.त्याला पोहणे भाग पडायचे.आज गावधुळीत माखलेले रम्य दिवस आठवतात अन् मनोमन उगीच हसू येते.
— संतोष सेलूकर,परभणी
7709515110
Leave a Reply