दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी नारायण पेठेतील संस्कृती प्रकाशनच्या ऑफिसमध्ये काम करीत होतो. एके दिवशी दुपारी कुरळ्या केसांना भांग पाडलेला, सावळ्या रंगाचा, उंचापुरा माणूस समोर येऊन उभा राहिला. अंगात पांढरा झब्बा, त्यावर निळ्या रंगाचं जाकीट, खाली पांढरी सुरवार व पायात चपला. त्यांना मी ‘या, बसा’ म्हटलं. सुमारे सव्वीस वर्षांनंतर गफूरभाई पुणेकर मला भेटत होते.
आम्ही जेव्हा ‘गुणगौरव’ मध्ये जाहिरातींच्या कामाला सुरुवात केली तेव्हा एके दिवशी ‘मनोरंजन’च्या मोहन कुलकर्णीकडून आमचा पत्ता घेऊन गफूरभाई ऑफिसमध्ये आले. त्यावेळी डोक्यावर पांढरी टोपी व अंगात पांढरा झब्बा व पायजमा होता. त्यांना पेपरसाठी एक जाहिरात करुन हवी होती. गफूरभाईंनी स्वतःचा एक फोटो दिला व फोटोच्या दोन्ही बाजूला तुमच्याकडच्याच नर्तिकेचे फोटो टाका असे सांगितले. आम्ही दोन जुन्या चित्रपटातील नायिकेचे फोटो टाकून ‘गफूरभाई पुणेकर तमाशा मंडळ’ अशी जाहिरात त्यांना करुन दिली.
या कामाच्या निमित्ताने जेव्हा गफूरभाई ऑफिसवर आले, तेव्हा त्यांच्याशी गप्पा झाल्या. ते स्वभावाने अतिशय मनमोकळे होते. लोकनाट्यातील कलाकार असल्यामुळे धारदार आवाज व हजरजबाबीपणा त्यांच्या बोलण्यातून जाणवत होता. त्यांनी तमाशातील कलाकारांचे अनेक किस्से सांगितले. स्टेजवर शिवाजी महाराजांची भूमिका जो बाणेदारपणे करतो, तोच कलाकार शो संपल्यावर जमिनीवर बसून चटणी भाकरी खाऊन पोटाची खळगी भरतो. त्यांना तमाशाच्या दौऱ्यात आलेले कडू-गोड अनुभवही आम्हाला सांगितले.
गफूरभाईंचं दांडेकर पुलावर ‘सौभाग्य’ नावाचं बांगड्यांचं दुकान होतं. तिथं ते नेहमी दिसायचे. त्यांना ‘विशेष कार्यकारी दंडाधिकारी’ चा अथिकार देखील मिळालेला होता. काही वर्षांनंतर आमचा त्यांच्याशी असलेला संपर्क कमी झाला.
तमाशा हा प्रकार आम्ही गावी यात्रेत लहानपणी पाहिला होता. जानूबाई सोनूबाईच्या यात्रेत खेळण्याच्या दिवशी सकाळी आमच्या वाड्यासमोरच तमाशा असायचा. दुपारी तो महालक्ष्मी मंदिरापुढील झाडाखाली रंगत असे.
शहरात गणेशोत्सवाच्या दिवसांत, चिमण्या गणपती चौकात ‘रक्तात न्हाली कुऱ्हाड’ हा तमाशा पाहिल्याचं मला आठवतंय. आमच्या शेजारी भरत नाट्य मंदिर असल्याने एखाद्या महिन्यात काळू बाळू, रघुवीर खेडकर यांचे तमाशाचे प्रयोग सलग लागायचे. ते चालू असताना थिएटर बाहेर त्यातील लावण्यांच्या वेळी स्टेजवरच्या ढोलकीचा खणखणाट ऐकू येत असे.
बालगंधर्ववरील नाट्य व्यवस्थापकांच्या सांगण्यावरुन तमाशाच्या काही पार्ट्या आमच्याकडून रंगीत पोस्टर डिझाईन करुन घेण्यासाठी ऑफिसवर येत असत. रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर पार्टीचे पोस्टर डिझाईन आम्ही करुन दिले. ते पोस्टर काही वर्षांनंतर गावी नागठाणेच्या यात्रेच्या दिवसांत ठिकठिकाणी भिंतीवर लावल्याचे पहायला मिळाले.
१९८७ साली आम्ही जेव्हा सातारा रोडवरील बालाजीनगरला रहायला आलो, तेव्हा आताच्या केके मार्केटच्या मैदानावर रात्री तमाशाचे तंबू लागायचे. ते हाऊसफुल्ल व्हायचे. रात्रभर त्यांचा खणखणाट ऐकायला मिळायचा. सकाळी पहावं तर त्या जागेवर रात्रीच्या तंबूचा मागमूसही नसायचा.
कालांतराने तमाशाचं शहरातील व खेड्यातीलही महत्त्व कमी झालं. तमाशा, लोकनाट्य लोप पावून फक्त लावणी नृत्यांचे कार्यक्रम सुरु झाले.
नाटक व चित्रपटांच्या जाहिरातींच्या गर्दीत गफूरभाई पुणेकर यांना आम्ही विसरलो होतो. इतक्या वर्षांनंतर आता गफूरभाईंमध्ये वयोमानानुसार फरक पडलेला होता. त्यांनी काही मान्यवरांसोबतचे फोटो व मजकूर दिला. त्यांना ब्रोशर करुन हवे होते. आता ते हडपसरला रहायला गेले होते. त्यांचा मुलगा अमर पुणेकर वडिलांप्रमाणे मनोरंजनाच्या क्षेत्रात काम करीत आहे.
गफूरभाईंनी रंगभूमीवर ५० वर्षे लोकनाट्य, तमाशा, नाटक, एकपात्री, नकला, बहुरुपी भारुड, शाहिरी पोवाडे, शिवचरित्र, कीर्तन, प्रवचन अशा विविध माध्यमांतून लोकरंजन केले. त्यांनी निळू फुले, राम नगरकर, दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे, यशवंत दत्त, रमेश देव, गणपत पाटील, चंद्रकांत, सूर्यकांत मांढरे आदी चित्रपट कलाकारांच्या सोबत काम केले. विठाबाई नारायणगांवकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, कांताबाई सातारकर, रघुवीर खेडकर अशा दिग्गज लावणी कलावंतांबरोबरही त्यांनी लोकनाट्य सादर केली. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना ‘कलाभूषण’ पुरस्कार देऊन गौरविले होते. असा हा नामवंत कलाकार ब्रोशर करुन घेण्यासाठी जुने ऋणानुबंध लक्षात ठेवून पुन्हा माझ्याकडे आलेला होता.
आठ दिवसांत त्यांचे ब्रोशर तयार झाले. त्यांना ते फार आवडले. पुन्हा भेटू म्हणून त्यांनी माझा निरोप घेतला. मधे सात वर्षे निघून गेल्यानंतर अचानक वर्तमानपत्रात गफूरभाई गेल्याची बातमी वाचली. फार वाईट वाटलं. त्यांच्या मुलांनी वडिलांच्या स्मृती जागविण्यासाठी त्यांच्या नावानं पुरस्कार सुरु केला आहे.
मी जर काॅमर्सच्या शिक्षणानंतर एखाद्या सरकारी नोकरीत लागलो असतो तर गफूरभाई सारखे दिग्गज कलाकार माझ्या संपर्कात कदापिही आले नसते. आज अशा अनेक क्षेत्रातल्या कलाकारांच्या सान्निध्यात राहून माझं जीवन समृद्ध झालेलं आहे.
© सुरेश नावडकर
मोबाईल ९७३००३४२८४
२६-५-२१.
Leave a Reply