मुंबईने सप्तरंगी इंद्रधनुष्याने आणि माझ्या आयुष्याचे इंद्रधनुष्य फुलवणारे माझे जिवलग – शैलेश, नरेन, दीदी, बाबा, साक्षी, शशीमामा (तो तर खास पुण्याहून आला होता लंडनच्या राणीचे स्वागत करायला) ह्यांनी माझे एअर पोर्टवर जोरदार स्वागत केले. शैलेशने सकाळी सकाळी जाऊन वेलकम बुके आणला होता, मला आवडणार्या निशिगंध आणि गुलाबाचा. एखाद्या व्ही.आय.पी.पेक्षा भारी वाटल मला तेंव्हा. डोळ्यात एकाच वेळी आसू आणि हसू येणे ह्याचा प्रत्यय आला. तरीही डोळे आईला शोधत होते. ती घरी तुझी वाट बघतीय अस शैलेशने सांगितले. घरी मम्मी – डॅडी (सासू-सासरे) सुध्दा येऊन थांबले होते.
गाडी एअर पोर्टच्या बाहेर आली. सकाळची ट्रॅफिकची वेळ होती पण आम्ही उलट्या दिशेने जात असल्यामुळे त्यातल्या त्यात दगडपेक्षा वीट मऊ सारखे थोड कमी ट्रॅफिक. आता हे अंतर ट्रॅफिक नसताना साधारण 40 मिनिटात संपते. ट्रॅफिक धरून ते 1-1.25 तास धरायला हरकत नाही. पण हत्ती गेला अन् शेपूट राहिलं. तो 1-1.5 तास मला युगे अठ्ठावीस सारखा वाटला. संपतच नव्हता रस्ता.
अखेर शेवटी सुचेता बिल्डिंग दिसली. आणि जीव घायकुतीला आला. गाडी थांबताच दार उघडून धावत आत शिरले. आईसुद्धा बाल्कनी मध्ये वाट बघत उभीच होती. मला गेटमध्ये बघून आत वळली. आता ती तांदूळ ओवाळून टाकणार मग पायावर ते दूध-पाणी घालणार हे माहितीच होतं. त्या हिशोबाने मी शूज काढून तयारीतच होते. दृष्ट काढणे प्रोग्राम झाला आणि ती चांदीचे तबक घेवून औक्षणाला आली.
दोघींच्या मनात आनंदाच्या लक्ष-लक्ष ज्योती ऊजळल्या होत्या.आणि तबकातील ज्योतीच्या प्रकशात तिचे अश्रूपूर्ण डोळे आणि खुललेला चेहरा चमकत होता. ही चमक कोहीनूरपेक्षाही चमकदार होती. कदाचित तेच भाव माझ्याही चेहऱ्यावर होते.
आत येऊन पाया पडले आणि घट्ट मिठी मारली. दोघींच्या डोळ्यातून गंगा यमुना सुरू झाल्या. आतून यश आणि ऍशने धावत येऊन मला मिठी मारली. 3 पिढ्यांचा माय-लेकीच्या भेटीचा सोहळा खूपच रंगतदार झाला. सोहळा बघून बघणार्यांचेही डोळे आणि मन भरुन आले.
जेवायला चांदीचे ताट, रांगोळी, ऊदबत्तीचा सुगंध मन प्रसन्न करत होता. खास माझ्या आवडीची खाता येईल अशी बासुंदी आणि आईच्या हातची तव्यावरची गरम गरम पोळी आणि मऊ गरम वाफाळलेला साजूक तूप आणि साधवरण घालून भात! लंडनमधे पोट भरत होते पण मन भरुन जेवण आज कित्येक दिवसांनी झाले.
दिवसभर खरेदी दाखवणे, चॉकलेट्स वाटप आणि अखंड बडबड ह्यातच गेला. माझ्या सर्व जवळच्या नातेवाईकांनी आणि मित्र मंडळींनी फोन वरून किंवा प्रत्यक्ष भेट देऊन त्या उत्साहात भर घातली.
हया सर्वांच्या प्रेमात आणि आईच्या मायेच्या छत्राखाली मला गगन ठेंगणे नाही झाले तरच नवल!
— यशश्री पाटील.
Leave a Reply