गजेंद्र उर्फ गजा .. सगळ्यांना सामान्यतः ज्या गोष्टी आवडतात, योग्य वाटतात त्या सोडून याचं नेहमी काहीतरी निराळंच असतं. मग ती कुठली किरकोळ गोष्ट असो किंवा महत्वाची. याची गाडी नेहमी भलत्याच स्टेशनात… म्हणजे सर्व सामान्यांना लता-आशा-किशोर कुमार आवडणार तर हा अल्ताफ राजाचा फॅन. सारं जग अनिल कपूर, माधुरी, हृतिकचे चाहते तेव्हा याच्या भिंतींवर राहुल रॉय, आयेशा जूल्काचे फोटो. एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना धोपट मार्ग सोडून हा कुठल्यातरी आडवाटेने जाणार. भाजी-किराणा वगैरे घेणे , पेढे मिठाई आणणे, केस कापणे, कपडे चपला अशी इतर कुठलीही खरेदी करायची असेल तर हा पठ्ठ्या गावातली उत्तम दर्जाची प्रसिद्ध दुकानं सोडून कोणी फिरकत नाही अशा तिसऱ्याच कुठल्यातरी दुकानातून घेणार आणि प्रत्येक वेळेस आपलंच कसं योग्य आहे याची वकिली सुद्धा करणार. कधी कधी तर त्याचे जगमान्य गोष्टींना छेद देणारे निर्णय आणि आवडीनिवडी बघून वाटायचं की याला खरंच हे सगळं योग्य वाटतंय ? रुचतंय ? की आपलं महत्व वाढावं म्हणून मुद्दाम इतरांपेक्षा वेगळेपण राखतोय ?. आणि तसं असेल तर वर्षानुवर्ष कसं काय करेल एखादा असं ?? हा ही प्रश्न पडायचा. काहीही असलं तरी हा ‘गजा’ ‘जगा’वेगळा होता हे खरं .. आणि म्हणूनच गावकऱ्यांनी सुद्धा या “जगावेगळ्या गजाला” त्याच्या सारखंच वेगळं नाव ठेवलं .. “गजावेगळा” ..
हा गजा आपल्या वयस्कर आईबरोबर राहायचा. तसा बऱ्यापैकी शिकला सवरला होता ; पण त्याच्या वयाची इतर मुलं करायची तशा चांगल्या स्थिरस्थावर नोकरीत जर रमला असता तर तो गजावेगळा कसला ?? त्या बाबतीतही काहीतरी वेगळं करण्याची खुमखुमी होतीच आणि बरंच काही धरसोड करत शेवटी एक काम मनापासून स्वीकारलं ते म्हणजे सर्कशीत किंवा जत्रेत “मृत्यूगोल/मौत का कुंआ” मध्ये प्राण पणाला लावत बाईक चालवणे. ते दौरे नसतील तेव्हा एका मित्राच्या ओळखीने सिनेमा-सिरियल मधल्या साहस दृश्यांत किंवा हीरोसाठी ‘डमी / बॉडी डबल’ ची कामं करायचा. त्यामुळे तिथेही जीव धोक्यात टाकणं होतंच. फार काही पैसे नसले तरी तो आणि आई या दोघांचा चरितार्थ चालेल इतकं मिळवायचा व्यवस्थित ; पण या असल्या विचित्र नोकरीमुळे आईच्या जीवाला मात्र कायम घोर लागलेला असायचा. “सून आल्यावर फरक पडेल जरा” या आशेवर आई होती सुरवातीला पण अशा गजावेगळ्याला कोणी मुलगी द्यायला तयारच नाही त्यामुळे लग्नाचं वय तर केव्हाच उलटून गेलं होतं. भरीस भर म्हणून ही काळजी सुद्धा होतीच त्या माऊलीला ..
हळूहळू आईचं म्हातारपण वाढत गेलं आणि त्यासोबत छोटे मोठे आजारही जडले. अशाच एका रात्री दमून भागून आलेल्या गजाने नेहमीप्रमाणे आईला जेवू घातलं , औषध वगैरे दिलं . त्यानंतर शांत झोपी गेलेली आई दुसऱ्या दिवशी सकाळी उठलीच नाही. ही दुःखद बातमी समजताच जवळच राहणारी मावशी आली आणि काही गावकरी जमले.
शेजारच्या गावातून मामा येणार होता म्हणून सगळे थांबले होते. गजा आईच्या पायावर डोकं ठेवून खूप ओक्साबोक्शी रडला. इतक्यात काहीतरी सुचलं आणि डोळे पुसत उठला . कपाटाखालची एक जुनी ट्रंक काढली . त्यातला चोरकप्पा उघडून एक पाकीट काढलं. तरातरा निघाला आणि चार घरं सोडून राहणाऱ्या वयोवृद्ध राधाक्काकडे गेला. गुडघ्याच्या आजाराने त्रस्त राधाक्का बाहेर पलंगावर बसली होती. त्याला बघून ती आश्चर्याने म्हणाली ..
“ अरे गजा !!.. हे काय ?.. तू इकडे असा आत्ता?.. काही हवंय का रे ??…. आईचं समजलं बघ … पण आम्ही काही येऊ शकत नाही … माझ्या पायांमुळे हे असे अडकलेलो !!” ..
“ होय गं म्हातारे ss ..माहिती आहे मला ते .. म्हणूनच आलोय … हे घे थोडे पैसे !!” .. सोबत आणलेलं पाकीट पुढे करत गजा म्हणाला.
“ पैसे ? कसले रे ? आणि कशासाठी ? ते सुद्धा आत्ता .. यावेळेस ??” तिला काहीच लक्षात येत नव्हतं
“ अगं .. माझं काम तर तुला महिती आहे. सकाळी गेलो की संध्याकाळी परत येईन की नाही याची खात्री नसते. म्हणून माझं जर का काही बरं-वाईट झालं तर माझ्या आईची वृद्धाश्रमात सोय करण्यासाठी पैसे जमवून ठेवले होते. एका आश्रमात तसं बोलूनसुद्धा ठेवलं होतं मी. पण आता काss य .. माझ्या आधी तीच गेली ss . म्हणून म्हंटलं तुझं पैशाअभावी रखडलेलं गुडघ्याचं ऑपरेशन तरी करून टाक आणि चाला-फिरायला लाग पहिल्यासारखी. उरलेच पैसे तर तुझ्या म्हाताऱ्याचं दातांचं काम सुद्धा करून घे ss !!… चल निघतो आता .. मामा आला असेल एव्हाना .. आईचं पुढचं सगळं कार्य करायचंय अजून !!”.
राधाक्काला फारच दाटून आलं . पण काय बोलावं कळेना ..
वास्तविक पाहता प्रसंग काय आणि हा वागतोय काय ? आईचं पार्थिव घरी आहे आणि हा पैसे द्यायला राधाक्काकडे. पण असं विक्षिप्त वागणं हाच त्याचा स्वभाव .. शेवटी तो “गजावेगळा”.
आईच्या निधनानंतर मात्र गजाकडे आता गमावण्यासारखं काहीच नव्हतं. जास्तीत जास्त वेळ बाहेरच राहायचा. घरभाडं वेळेत भरायचा पण घरी यायचा मात्र क्वचितच. सामान सुद्धा अगदी जेमतेम ठेवलं होतं घरात . हळूहळू गावकऱ्यांच्या बोलण्यातूनही गजावेगळा हे नाव कमी होऊ लागलं.
एके दिवशी गावात उडत उडत एक बातमी धडकली . गजाला नेहमी ज्याची धास्ती वाटायची तेच घडलं. मुंबईत एका साहस दृश्याच्या शूटिंग दरम्यान झालेल्या एका अपघातात गजाला जीव गमवावा लागला होता. फार नातेवाईक नसल्यामुळे गावात काही विधी करण्याचा प्रश्नच आला नाही. मुंबईत सगळं आटपल्यावर सामान वगैरे घ्यायला आणि आवराआवर करून मालकाला घर ताब्यात देण्यासाठी मामा आणि मावशी त्याच्या गावच्या घरी गेले. आपल्या पायावर उभी असलेली राधाक्का वगळता आताशा खरं तर इतरांना गजाच्या असण्या-नसण्याचं फार काही सोयर-सूतक नव्हतं पण तरीही हे दोघं आल्याचं समजताच काही गावकरी त्यांना भेटायला, विचारपूस करायला येऊ लागले. आवरताना मावशीला ती जुनी ट्रंक दिसली. जुने फोटो , काही कागदपत्रं आणि एक डायरी होती. मावशीने डायरी सहज उघडून बघितली. तारखेप्रमाणे लिहितात तशी रोजनिशी नव्हती. एखाद्या दिवशी कधी काही वाटलं तर मनात आलेलं लिहून ठेवलं होतं त्यात. अधून मधून एखादं पान उघडत मावशी मोठ्याने वाचायला लागली.
एका पानावर लिहिलं होतं ..
“ पक्या विचारत होता तू असं का वेगळंच वागतोस दरवेळेस ? तेव्हा त्याला सांगावसं वाटत होतं .. “ आई नेहमी म्हणायची की ‘हसरं बाळ सगळ्यांचं असतं रडकं बाळ फक्त आईचं!!’. तसंच जे खूप प्रसिद्ध किंवा प्रथितयश आहेत त्यांच्या मागे सगळेच धावतात , त्यांचा उदो उदो करतात पण त्या सगळ्यात जे इतर काही चांगले असतात ते उगाच झाकोळले जातात म्हणून मी अशा लोकांच्या बाजूने असतो. पण पक्याला हे सगळं सांगून काही उपयोग नाही. त्यापेक्षा मला वेगळा ठरवून त्याला आणि त्याच्यासारख्या सगळ्यांनाच आनंद मिळतो आणि माझा हेतूही साध्य होतो. माझं वेगळेपण बिंबवण्यासाठीच तर मी काही चांगल्या कलाकार, गायक, खेळाडू वगैरेंच्या ऐवजी भलतेच कोणीतरी मला आवडतात असं सांगतो. कारण ते मला ओळखत नाहीत की मी त्यांनाss .. त्यामुळे कोणालाच फरक पडत नाही. आणि दुसऱ्याना चांगलं म्हंटल्यामुळे त्या महान व्यक्तींचं श्रेष्ठत्व नक्कीच कमी होत नाही .. पण लोकांच्या मनात मात्र माझी “गजावेगळा” ही प्रतिमा तयार व्हायला मदत होते ज्याचा उपयोग मी इतर चांगल्या कामांसाठी करू शकतो “..
उपस्थित प्रत्येकालाच आपले गजा बरोबरचे प्रसंग , गप्पा आठवू लागल्या आणि त्यातून एक जाणीव मात्र सगळ्यांनाच झाली की त्याचं हे वेगळं असणं , विक्षिप्त वागणं “निरुपद्रवी” प्रकारात मोडण्यासारखं होतं. म्हणजे त्याच्या अशा असण्यामुळे एक वेळ त्याला त्रास होईल पण इतरांचं मात्र कधीच नुकसान झालं नाही. हे ही लक्षात आलं की त्यानी विरोधाला विरोध कधीच नाही केला. विशेषतः गावच्या भल्यासाठी एखादा निर्णय असेल किंवा विकास कामांचा प्रकल्प राबवायचा असेल तर गजा नेहमीच पाठिंबा द्यायचा.
मधलंच एक पान उघडलं ….
“ प्रत्येक वेळेस स्टंट करताना सतत आईचा चेहरा दिसतो समोर. आता काळजी वाटायला लागलीये की माझ्या पश्चात आईचं कसं होणार ? .. ती एकटी पडायला नको .. मामा मावशी करतील नक्की ; पण त्यांना सुद्धा ओझं नको. काहीतरी करायला हवं.. कुठल्या संस्थेत, आश्रमात, धर्मशाळेत वगैरे कायमची सोय होऊ शकते का ते बघायला हवं. उद्यापासूनच पैसे साठवायला हवेत त्यासाठी !!” ..
मावशी पानांमगून पानं उलगडत होती आणि त्याबरोबरच गजाचे एक एक पैलुही उलगडले जात होते…. अशाच एका पानावर ..
“ आज बाबू पेढेवाला म्हणाला की तुझ्यामुळे काही लोक मिठाई घ्यायला आले माझ्याकडे. तेव्हा मला माझ्या ‘गजावेगळं’ असल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. बाजारतल्या मोठ्या मिठाईवल्याकडे सगळेच जातात . नक्कीच चांगला आहे तो पण बाबूची मिठाई सुद्धा दर्जेदार असते. तो मिठाईवाला इतका मोठा आहे की त्याच्याकडची २ गिऱ्हाईकं कमी झाली तर त्याला काहीच फरक नाही पडणार. पण तेच बाबूकडे गेले तर त्याला मात्र नक्की फरक पडेल. त्याचंही घर चालायला हवं की ss .. त्यासाठी बाबूचं कौतुक केलं ४ ठिकाणी तर कुठे बिघडलं त्यात. फार फार तर काय नेहमीप्रमाणे “गजावेगळा” म्हणतील . म्हणू देत !!” ..
हे सगळं ऐकून एव्हाना अशा अनेक जणांना गजावेगळा असल्यामुळे आपल्याला सुद्धा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कसा फायदा झाला याची जाणीव झाली. मामा-मावशी सकट सगळ्याच गावकऱ्यांना भरून आलं . तसं बघायला गेलं तर गजाने फार काही उल्लेखनीय कामगिरी केली होती किंवा आयुष्यात खूप काही कमावलंय वगैरे असं काही नव्हतं पण खरोखरंच हा गजाss वेगळा होता , त्याच्या वेगळेपणात सुद्धा एक ‘सकारात्मक दृष्टीकोन’ होता. सगळ्यांना वाटत होतं की तो गेल्याची बातमी खोटी ठरावी , तो आत्ता बाहेर येऊन त्याच्या खास शैलीत ओरडावा ….” अरे मित्रांनोss , मी खरंच मेलो बिलो असं वाटलं की काय ? .. हा गजावेगळा काही इतक्यात पाठ सोडत नाही तुमची . अजून बरंच छळायचंय तुम्हाला !!”
अर्थात हे शक्य नव्हतंच .. तसंही सगळ्यांना जे वाटतं त्याच्यापेक्षा नेहमी वेगळंच तर करायचा ना गजा . “गजावेगळा” जग सोडून गेला असला तरीही जाता जाता हा गजाsss वेगळा विचार मात्र देऊन गेला ..
— क्षितिज दाते.
ठाणे.
Leave a Reply