गजानन उर्फ गजा, हा आमच्या सर्व मित्रमंडळी पैकीच एक. पण या सर्व मित्र मंडळीत व गजात एकच साम्य होते व ते त्याच्या विलक्षण हास्याचे. गजानन आमच्या कॉलनीत राहायला आला तेव्हा अगदी दोन वर्षाचा होता. आपल्या आई बरोबर म्हणजे सुमाताई बरोबर लहानगा गजा आला.
आमच्या चर्चेला एक नवीन विषय मिळाला. त्याच दिसण, हसण, सांर काही अगदी जीव ओवाळून टाकावा असंच. कधी कधी वाटे संपुर्ण भारत वर्षात जरी शोधले तरी इतका विनम्र निरागस मुलगा मिळणार नाही.
बघता-बघता हा गजानन अठ्ठावीस वर्षाचा झाला.पण वय वाढल तरी वयासोबत येणारी प्रौढ पणाची लक्षणे काही गजाननाच्या एकुन वागणुकीवरून वाटत नव्हती. वय, शरीर अठ्ठावीस वर्षाच, पण मन- बुद्धी मात्र,एका कोवळ्या पाच वर्षाच्या मुलाची.ज्या पाच वर्षाच्या मुलात आढळणारा अवखळपणा-निरागस पणा-डोळे, आजही गजाच्या आठवणी “ओल्या करून जातात. सुमाताईच ऐन तारुण्यात वैधव्य व या वैधव्याला असणारी जगातील एकमेव आशा म्हणजेच त्यांना वर्षभरात झालेले एकमेव अपत्य गजानन. वयाची ऐन तारुण्याची उमेद सुमाताईनी गजाननच्या संगोपनासाठी खर्च केलेली. शिक्षण कमी असल्यामुळे चार घरची भांडी कुंडी घासली, धुणी, पापड लाटन इत्यादी कामे सुमाताई करत असत.आपल्याला लाभलेल एकमेव आयुष्यातील सुख म्हणजे आपला मुलगा गजानन हाच त्या मानत, गणपती मंगलमूर्ती गजानन, त्यावर या सुमाताईची नितांत श्रद्धा होती म्हणूनच मुलाचे नाव देखील गजानन ठेवले.
साधारणतः चार वर्षाचा असताना सुमाताईनी गजाननला एका बालवर्गात टाकले. वर्गातील बडबडगीते , येरे-येरे पावसा तुला देतो पैसा, नाच रे मोर नाच आंब्याच्या वनात , सांग सांग भोलानाथ ही गीते तोंडपाठ असलेला गजानन पहिल्याच वर्षी पहिलीला पहिला नंबर मिळवून मोकळा झाला. त्या पहिल्या नंबरच कौतुक होत ते फक्त त्या माऊलीला संपूर्ण कॉलनीभर हा निकाल सांगून साखर वाटत सुटलेल्या सुमाताई मला अजून आठवतात.त्यांच्या भावी जीवनातील सुखी जीवनाची लहर घेऊनच येईल असे आम्हाला वाटले. बघता बघता हा ‘गजा’ चक्क चवथीला गेला व शाळेतील परीक्षेत त्याच प्रमाणे शाळेतल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पहिला आला.गजाला शिष्यवृत्ती मिळाली आता त्याच्या या शिष्यवृत्तीने त्याच्या शिक्षणाचा प्रश्न , दहावी पर्यंत तरी सुटणार होता.पण दैवाला दुसरेच काहीतरी मंजूर होते त्या घटनेने गजाचे व सुमाताईचे आयुष्यच बदलून गेले .
चवथीला ‘गजा’ खूपच ,समंजस व सु& धन्य होता .शाळेतल्या एका मधल्या सुट्टीत आपल्या मित्रा बरोबर शाळेच्या मैदानात खेळत होता तेवढ्यात शाळेसमोरील रस्त्यावर कशाचा तरी जोरदार गलका ऐकु येऊ लागला, जोरात घोषणा, जोरात आवाज यामुळे ही काही लहान मुले, घाबरली व काही काय झाले,म्हणुन पहायला रस्त्यावर आली. तोवर रस्त्यावर दोन गटांमध्ये दगड फेक चालू झाली होती . ही मुले अजुनच पुढे आली. आणि नकळत एक- दोन दगड या मुलांच्या डोक्यावर आदळले .त्यात एक गजाही होता.दगडाच्या या आघातामुळे त्याच्या डोक्याला इतका जबरदस्त मार बसला कि,त्यातुन जो रक्ताचा पाट वाहिला त्यातुन तो जगतो की नाही, असेच आम्हाला वाटले.पण, दैव बलवत्तर होते , गजा वाचला . मेंदूवर झालेल्या जबरदस्त आघातामुळे हा मुलगा स्मरणशक्ती गमावून बसला सुरवातीस हा तर सुमाताईनां ओळखत नसे अन हळूहळू गजाच्या दुर्दैवी प्रवासास सुरवात झाली .गजाचे शाळेत जाणे सुटले.डॉक्टरांनी सुमाताईनां या मुलाला पूर्ण विश्रांती द्या, काही त्रास ,त्राण देऊ नका असे सांगितले.तळहातावरील फोडा प्रमाणे सुमाताई गजाची काळजी घेत होत्या.
दिवसांमागुन दिवस गेले. वर्षे गेली, गजाच्या वागणुकीत काहीच फरक नव्हता. दिवसभर हा शेजाऱ्यांच्या लहान मुलां बरोबर गोट्यांचा डाव मांडून खेळत असे. दुपारचा जेवून झोपत असे,पुन्हा दिवस सारखा.लहान मुलांना हा ऐवढा, आपल्या पप्पा एवढा माणूस आपल्याशी गोट्या खेळतो, याचे आकर्षण वाटे, व खुप चिडवत असत .पण हा कधी त्यांच्यावर रागावत नसे, मधुन मधुन येवून ,सुमाताईना मला ‘सुसू’ ला आली, मला ‘शी’ ला आली असे सांगे. व सुमाताई त्याच्या पायजम्याची नाडी सोडुन ती बांधे पर्यंत सर्वच करीत असत, गजा अठ्ठावीस वर्षाचा होई पर्यंत सुमाताई कधी त्याला सोडुन, कुठेच
गेल्या नाहीत अगर आपल्या लाडक्या पाडसाला सोडुन कुणाजवळ ठेवले ही नाही. कधी कधी गजा आमच्या कडे यायचा ,मला भोलानाथचे ,मोराचे गाणे म्हणुन दाखवायचा .दिवाळीचा नवा शर्ट,संपुर्ण कॉलनीत दाखवणारा गजा हा एकटाच मी सांगेन ते काम हसुन करणारा मी त्याला बहुतेक वेळा ,जा पेपर घेवून ये, जा दुकानातून दाढीचे ब्लेड घेऊन ये अशी किरकोळ कामे सांगताच ती पटकन करणारा. आमच्या घरी येवून, टाईम्स ऑफ इंडियातील चित्रे न चुकता पाहणारा ,मी कधी कधी गजाला लग्न करतोस का ? विचारे,लग्नाच्या नावानेच गजा कोठेतरी हरखून जायचा , व पुन्हा लाजून हसायचा .
एकदा सकाळीच सुमाताई आमच्या कडे आल्या, मला म्हणाल्या अरे तु दुनियेला कामाला लावतोस, माझ्या पण मुलासाठी बघनारे नोकरी. मी एका जवळच असणाऱ्या कार्यालयात शिपायाची नोकरी गजासाठी पहिली, व गजाचा गजाशेठ झाला. रोज सकाळी छान पैकी भांग पाडून शर्ट-प्यान्ट व्यवस्थित घालून गजा येत असे. येताना एका मोठ्या पिशवीत,ज्यात दहा किलो तांदूळ मावतील अशात डबा घेवून यायचा , पण हे काम फक्त वीस दिवसच केले. पुन्हा हा आपल्या मार्गाला …….
आम्ही त्याला बरेच वेळा सांगायचो,अरे गजा तु आता मोठा झालास, तेव्हा निट मोठ्या सारखा वाग. त्यावर तो म्हणायचा ‘दादा मोठ्या सारखं म्हणजे कसं वागायचे ? व मलाच निरुत्तर करायचा. त्याच्या त्या निरागस पणाचे मला व सुमाताईस खुपच कौतुक होते.एकदा शेजारच्या एका मुलीने,
सुमाताईकडे तक्रार केली.तुमच्या या गजाला काहीतरी सांगुन ठेवा, येता जाता माझ्याकडे पहात असतो, आईने गजाला खुप समजावले,असे करू नये बाळ, चांगली मुलं अस करत नाहीत ,त्यानंतर मात्र गजाने अशी खोडी परत नाही केली.एक दिवस सकाळीच ,सुमा ताईचा जोरात आक्रोश आम्हाला ऐकायला आला .म्हणुन आम्ही सुमा ताई कडे लगेच गेलो.तर, त्या रात्रीच डोक्यात मेंदूचा रक्तस्त्राव होवून ,गजा आम्हाला सोडुन गेला होता.
सुमाताई एकट्या झाल्या ज्या आशेवर त्या आपल्या आयुष्याचा एक एक दिवस ढकलत होत्या ती आशा आता संपली होती.आपला मुलगा हा खुप हुषार,समंजस आहे असे सुमाताईना वाटे. हा आज ना उद्या चांगला होईल, मग लग्न करील व आपल्याला खुप सुखाचे दिवस येतील. असे सुमाताईना वाटे.
गजासाठी त्यांनी खुप हालअपेष्ठा काढल्या ,नाना उपवास केले,?षी केले. पण सर्व व्यर्थ ……. ताई च्या या कष्ठाना कधीच यश नाही आले.समाजाने सदैव उपेक्षित केलेल्या आपल्या पोटच्या गोळ्यासाठी त्यांनी दिवस-रात्र एक केली होता त्यानंतर एका महिन्यातच सुमाताई गेल्या,गजाच्या मृत्यूमुळे अन्न पाणी वर्ज्य केलेले.डॉक्टरी उपचार थांबलेले फक्त एकच ध्यास,व आजारातच बडबडणे
“आता त्याच्या कडेच जायचे, आईला एकटा सोडुन जातोस काय? अरे लबाडा, बघा बघा कसा पळतोय, अरे थांब रे. हा एवढासा एकच घास तर खा, नाहीतर बघ तिकडून बुवा येईल, खा – हा चिऊचा घास……., नीट आंघोळ कर, साबण लावू का ? अरे किती घाम आलाय तुला, जा काहीतरी खा – जा,हे बघ चिवडा तुला आवडतोय ना ,खा -खा .” या वेडातच एका झटक्याने सुमाताई गेल्या. एका मुलीचा ‘अध्याय ‘ कायमचा बंद झाला.
— संतोष दत्तु पाटील.
Leave a Reply