‘विठू चा गजर’ जसा हवा हवासा वाटणारा, तसाच हा आपल्याला दररोज न चुकता ऐकवा लागणारा पण नकोसा वाटणारा तो घड्याळाचा गजर..
हे लिहिताना सुद्धा माझ्या कपाळावरती आठ्या उमटल्या..कारण गजर म्हणताच माझ्या डोळ्यासमोर येतं ते चावी द्यावं लागणारं ते जुनं गजराचं घड्याळ..या घड्याळाची गणना बहुतेक आता पुरातन वस्तुंमधेच होत असावी इतकं ते दुर्लभ झालेलं आहे..
पण मी लहान असताना हे घड्याळ आमच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक होतं..सकाळी याच्या कर्कश्श आवाजाने आमच्या सारख्या अनेकांचा दिवस सुरु व्हायचा..सहसा हा वाजलाच नाही असं व्हायचं नाही..पण कधी झालंच..तर उठायला उशीर, आईच्या डब्याला उशीर, बाबांची अमुक वाजून अमुक मिनिटांची गाडी चुकायची, शाळेसाठी मला आवरायला उशीर, अशा घडामोडी घडायच्या..
पण वैताग यायचा तो त्या गजराच्या कर्कश्श आवाजाचा..जणू काही आपल्या कानापाशी येऊन एखाद्द्या पिशाच्चाने बोंबलावं, ” ए ऊठ नालायक, लाज नाही वाटत झोपून रहायला?.. खूप झाली झोप!”… अशा थाटात तो गजर व्हायचा की आपण खडबडून जागे झालो नाही तरंच नवल..साधारण अर्धा मिनीट हा असा गजर रोज व्हायचा..आमच्या घरात हे घड्याळ स्वयंपाक घरात असायचं त्यामुळे गजर बंद करता यायचा नाही..तरी त्याचा आवाज घरभर घुमायचा..हा गजर वाजताच माझा चेहरा आंबट व्हायचा..या सिनेमातल्या आणि जाहिरातीतल्या नट्याच काय त्या फक्त चेहरा हसरा ठेवून सकाळी गजर बंद करत असाव्या..बाकी माझा चेहरा इतका आंबट दिसायचा, की आंबट शब्द सुद्धा त्यापुढे गोड वाटावा.. मला साखर झोपेतून जागं केल्या बद्दल या घडाळ्याला आणि गजराला मी आजन्म कारावासाची सजा देऊ शकले असते तर किती बरं झालं असतं..रविवारची एका दिवसाची सुटका या गजरापासून मिळायची तेवढंच काय ते सुख ओ आयुष्यात तेव्हा..
काळ पुढे गेला तसा या घड्याळातला गजर सौम्य होऊ लागला..स्टील प्लेटेड न राहता आता हे वेगवेगळ्या रंगात आणि designs मधे तयार व्हायला लागलं. गजराचं स्वरुप सौम्य व्हायला लागलं..” ए ऊठ नालायक” असं म्हणणारा गजर आता ” चल, उठायची वेळ झालीये” असं कडक पण decent बोलू लागला..
मग जमाना आला तो digital घड्याळांचा..या घड्याळांनी तर sophisticated पणाचा कहरंच केला. ‘झोपलेल्या माणसाला असं एकदम दचकवून जागं करू नये’, असे संस्कार या घड्याळांमधे ठासून भरलेले असल्यामुळे “बीप-बीप…बीप-बीप” इथपतंच हे गजर होणार..खूप हवा हवासा वाटणारा नसला तरी अगदी आधी जिथे 100 आठ्या याव्या तिथे आता 20च आठ्या येऊ लागल्या..
आणि मग लाट आली ती मोबाईल फोन ची..digital घड्याळांचे संस्कार आणि उच्च शिक्षण घेतलेले हे गडी आता आलार्म टोन्सची विविधता दाखवू लागले..माणुस हा विकसनशील प्राणी आहे जो रोज नाविन्याच्या शोधात असतो हे त्यांना माहिती होतं..असं असताना रोज नवीन गजर ऐकून जाग येऊ लागली..रोज एक नवी आलार्म टोन ऐकून अगदी प्रसन्न हास्याने नाही, पण किमान आंबट चेहरा घेऊन उठण्याची पद्धत -हास पावली.
आणि मग काय..मोबाईल फोन माणसांपेक्षाही स्मार्ट होऊ लागले..ringtones म्हणू नका..caller tunes म्हणू नका..alarm tones म्हणू नका..
Alarm tones तर इतके बदलले की ‘अब बस कर पगले, रुलायेगा क्या’ असं विचारावंसं वाटू लागलं..गजर वाजायची पद्धतच बदलली..चढत्या क्रमात हळू हळू आवाज वाढू लागला..झोपेतून अलगद जागं कसं करावं? तर हे असं..एकदम तबीअत से…काही गजर धारदार..तर काही अगदी सौम्य..” ऊठ बाळा, उठायचं ना आपल्याला आता” इतकं मायेने उठवू लागले..त्यात भर पडली snooze च्या बटणांची..” ठीके बाळा, थोडा वेळ झोपायचं का तुला?..झोप हां..मी परत उठवतो”..असं जणू हे गजर म्हणत असावे..
आता तर काय आपली आवडती गाणी alarm tone म्हणून set करता येऊ लागल्या पासून अगदी अंगडाई वगैरे देत चेह-यावर हसू घेऊन उठायची सवय लागली..
एका यंत्रात आता आपल्याला सगळं उपलब्ध करुन दिलं आहे..ना वेगळं उठा..ना घड्याळ हातात घ्या..ना त्याची किल्ली फिरवा..हळू हळू या एकाच यंत्रात फ्रिज, टीव्ही,एसी, वॉशिंग मशीन सगळंच उपलब्ध होईल असं आता वाटू लागलं आहे..
पण सोय झाली असली तरी त्या बद्दल एक जी उत्सुकता वाटायची ती कमी झाली एवढं नक्की..त्या घड्याळाची टिक टिक ऐकण्यापासून ते किल्ली फिरवून गजर लावण्या पर्यंत एक गंमत असायची ते करण्यात..किल्ली दिली नाही की घड्याळ बंद व्हायचं..पुन्हा किल्ली दिली पुन्हा टिक टिक सुरु..किती मस्तं वाटायचं..त्या घड्याळाकडून प्रेरणा मिळायची..रोज स्वत:ला किल्ली देण्याची..बंद न पडण्याकरता..आणि तो खणखणणारा गजर म्हणजे जगायला एक नवीन दिवस मिळाल्याची गर्जना..
इथे पुलं चं वाक्य आठवतं ,” शेवटी घड्याळाचं काय आणि माणसाचं काय..आतला तोल सांभाळणारं चक्र व्यवस्थित राहिलं..की फार पुढेही जायची भिती
नाही आणि फार मागेही पडायची भिती नाही…
आपण स्वत:चा तोल सांभाळला आणि अशी किल्ली स्वतःला देत राहिलो तर, आपणही सतत सुरु राहू नव्हे, वेळ प्रसंगी गर्जना करून आपलं अस्तित्व सिद्ध करू शकू हा धडा मिळाला.
आता गजराचं ते पारंपारिक घड्याळ जरी आपण वापरत नसलो तरी त्याचे वंशज असलेले alarm tones मात्र रोज गजर करतातंच..हा प्रेरणादायी सवंगडी असलेला ‘गजर’, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपल्या आयुष्यात कायम राहो व असा ‘गजर’ करत राहण्याची प्रेरणा आपल्याला सर्वांना पुनः पुनः मिळत राहो..
(इमेज सौजन्य : गूगल)
— गौरी
खूपच छान लिहिलय
अप्रतिम लेख…विनोदी अंगानी वस्तुस्थिती चं मार्मिक वर्णन केले आहे…
अतीउत्तम लेख.बहुतेक प्रत्येकाच्या मनातली भावना