आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न दुर्बिणीने करणारा खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली यांचा जन्म १५ फेब्रुवारी १५६४ रोजी झाला.
गॅलिलिओ यांनी दुर्बिणीतून असंख्य गोष्टी अभ्यासल्या. शुक्राच्या कला पाहिल्या. गुरू आणि गुरूभोवती फिरणारे चार चंद्र पाहिले. खरे तर गॅलिलिओला नेपच्यूनच्या शोधाचा मानही मिळाला असता. गुरूजवळ तेव्हा नेपच्यून होता. पण सूर्यमालिकेत असे काही अज्ञात ग्रह असतील असा विचारही तेव्हा शिवला नव्हता. इतकेच कशाला, पृथ्वी सूर्याभोवती फिरते यावरच कोणाचा विश्वास नव्हता. त्यामुळे सूर्याभोवती फिरणारा ग्रह अस्तित्वात असण्याचा प्रश्नच नव्हता. आपल्या या निरीक्षणांवर आधारित ‘स्टारी मेसेंजर’ नावाचे पुस्तक १६१० मध्ये गॅलिलिओ यांनी प्रसिद्ध केले. शुक्राला कला कशा काय असतात? गुरूभोवती छोटे गोल फिरू शकतात? मग सूर्याभोवती पृथ्वी आणि इतर ग्रह का फिरू शकणार नाहीत? असे प्रश्न त्यामध्ये उपस्थित केले होते. कोपर्निकसने मांडलेल्या सूर्यकेंद्री सिद्धांतात तथ्य असले पाहिजे, असे गॅलिलिओ यांना वाटू लागले. १६१५ च्या दरम्यान त्यांनी या सिद्धांताला उघडपणे पाठिंबा द्यायला सुरुवात केली आणि इथेच समाज आणि व्यक्ती हा संघर्ष सुरू झाला.
समाजाची वैचारिक धारणा प्रस्थापितावर विश्वास ठेवणारी असते. नव्या कल्पना, नवे विचार जर प्रस्थापितांविरुद्ध असतील तर ते समाजाला मुळीच खपत नाही. शास्त्रीयच नव्हे तर शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातही हे घडते. नव्या विचारांना हाणून पाडण्यासाठी मग धर्म आणि धर्मग्रंथांचा आधार घेतला जातो. या गोष्टी धर्ममार्तंडांना सोयीच्या असतात. कारण याआधारे सामान्य जनतेला नवविचारांपासून दूर ठेवता येते. कॅथॉलिक चर्चने गॅलिलिओला पाखंडी ठरवले आणि त्याने सूर्यकेंद्री सिद्धांताचा प्रचार करू नये असे फर्मान काढले. 1624 नंतर आलेला पोप आपल्या विचारांना अनुकूल आहे असे वाटल्यावरून गॅलिलिओने पुन्हा एक पुस्तक लिहिले. पण पुस्तकाचा कल सूर्यकेंद्री रचनेकडे झुकतो आहे असे वाटल्यावरून पुन्हा एकदा त्याच्या पुस्तकावर बंदी आणली गेली. ६९ वर्षांच्या गॅलिलिओ यांना दम देण्यात आला. पाखंडी मताचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले. त्यांना तुरुंगात डांबण्यात आले आणि तेसुद्धा मरेपर्यंत. पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही हे त्याच्याकडून बळजबरीने वदवून घेण्यात आले. गॅलिलिओ यांच्या वरचे आरोप ३१ ऑक्टोबर १९९२ या दिवशी चर्चने अधिकृतपणे मागे घेतले. वास्तववादी विचार मान्य करण्याची घोषणा करण्यास ३५० वर्षांपेक्षा जास्त काळ लागला आणि तेही गॅलिलिओच्या त्यागानंतर. केवळ विचाराने आणि तर्काने या विश्वाचे नियम उलगडून दाखवता येतात या अॅओरिस्टॉटल यांच्या मतांना धक्का देणारा आणि या तत्त्वज्ञानाला विरोध करणारा माणूस म्हणून गॅलिलिओ यांनी केलेले कार्य फार महत्त्वाचे आहे. प्रयोग आणि निरीक्षण याचे महत्त्व गॅलिलिओ यांनी सिद्ध केले. केवळ विरोधासाठी विरोध केला नाही. जड वस्तू आणि हलकी वस्तू एकाच उंचीवरून खाली सोडल्या तर कोणती वस्तू अगोदर खाली पडेल? जड वस्तू खाली पडेल हे आपल्याला विचाराने सुचणारे परंतु धादांत चुकीचे उत्तर असते. पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने वस्तू खाली खेचल्या जातात. त्यांचा वेग वाढत जातो, पण वेगातील ही वाढ त्या वस्तूंच्या आकारावर किंवा वस्तुमानावर अवलंबून नसते हे सिद्ध करायला फार मोठा आटापिटा करावा लागत नाही. साध्या प्रयोगाने गॅलिलिओ यांनी हे सिद्ध केले. आपल्याला सत्य वाटणा-या गोष्टींची सत्यता प्रयोगाने पडताळून पाहण्याची मानसिकता निर्माण करणे हे गॅलिलिओचे मोठे योगदान आहे. वयाच्या १९ व्या वर्षी गॅलिलिओ यांनी लंबकासंबंधीचा गैरसमज दूर करून खरा नियम जगासमोर आणला.
त्याचा आंदोलनकाळ त्याने नाडीच्या ठोक्याच्या साहाय्याने मोजला आणि लंबकाचा आंदोलनकाळ त्याच्या आयामावर अवलंबून नसून लांबीवर अवलंबून आहे हे प्रयोगाने सिद्ध केले. गॅलिलिओ हे चांगले साहित्यिकही होते. गद्य साहित्याबरोबर त्यांच्या कविताही प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांनी कवितांसाठी दाँते अॅबलेहोरीची अकरा शब्दांची एक ओळ ही शैली वापरली होती. ‘डिव्हाइन कॉमेडी’ या सुप्रसिद्ध महाकाव्यात दाँतेनी ही शैली योजिली आहे. गॅलिलिओंनी अनेक सुनीतं रचली. गॅलिलिओ यांचं सर्व वैज्ञानिक लेखन अनुवादित स्वरूपात इंग्रजीत उपलब्ध आहे. मात्र त्यांचं साहित्यिक लेखन- विशेषत: काव्य विसावं शतक संपेपर्यंत तरी इंग्रजीत उपलब्ध नव्हतं. गमतीची गोष्ट म्हणजे गॅलिलिओंचं अगदी पोपनी बंदी घातलेलं सगळे वैज्ञानिक लेखन सतरावं शतक संपण्यापूर्वीच अनुवादरूपानं इंग्रजीत उपलब्ध झालं होतं. पण त्यांच्या कवितांचे अनुवाद इंग्रजीत प्रसिद्ध व्हायला एकविसावं शतक उजाडावं लागलं. जून २००० मध्ये गिओव्हानी पी. बिग्नामी यांनी गॅलिलिओंच्या काव्याचा केलेला इंग्रजी अनुवाद ‘अगेन्स्ट टू डॉनिंग ऑफ द गाऊन’ या शीर्षकानं इंग्रजीत प्रसिद्ध झाला. गॅलिलिओ यांचे ८ जानेवारी १६४२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply