लेखक : खा. राजू शेट्टी – अद्वैत फिचर्स कडून मराठीसृष्टीसाठी आलेल्या लेखांमधून पुनर्प्रकाशित
खासदार म्हणून दिल्लीत आल्यानंतर लोकप्रतिनिधीपदाच्या वाढत्या जबाबदारीचे ओझे जाणवत होतेच, शिवाय या नवख्या वातावरणात तसेच अनेक अनुभवी आणि अभ्यासू लोकप्रतिनिधींचा सहवास लाभणार याची हरहूरही होती. तशी इथली जीवनशैली बरीच वेगळी आहे. त्याच्याशी जुळवून घ्यावे लागणार होते. पण त्यातही मूळ स्वभाव किंवा राहणीमान कायम ठेवण्याचा माझा प्रयत्न राहिला. येथे आल्यावर मुख्य बाब होती निवासाची. सरकारी निवासस्थान मिळेपर्यंत पंचतारांकित हॉटेल्समध्ये सोय केली जाईल असे सांगण्यात आले. पण मी या विनंतीला नकार देत महाराष्ट्र सदनातील छोट्याशा खोलीत: राहणे पसंत केले. माझ्याकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांना, शेतकरी बांधवांना संकोच किंवा अवघडलेपण वाटू नये हाच यामागे हेतू होता. येथील छोनछोकी किंवा आधुनिक राहणीमानातही साधेपणा जपण्याचा प्रयत्न करत आलो आहे. केवळ राहणीमानच नव्हे तर आहाराच्या आवडीनिवडीही पूर्वीच्याच कायम ठेवल्या आहेत.
सर्वसाधारणपणे दिल्लीत गेल्यानंतर मराठी खासदारांना एकटे वाटते. याचे कारण तेथे मराठी भाषिकांची संख्या तुलनेने कमी आहे. शिवाय दिल्लीची संस्कृती काहीशी वेगळी आहे. अशा परिस्थितीत तेथील वातावरण रुळायला तसा वेळ लागतो. शिवाय या कालावधीत विविध बाबींसाठी तडजोडीही करावी लागते. या पार्श्वभूमीवर मला दिल्लीत गेल्यावर दोन गोष्टींचा फायदा झाला. एक चळवळीतील कार्यकर्ता म्हणून माझ्याविषयी तेथील मराठी भाषिकांमध्ये कुतुहल होते. शिवाय सध्याच्या स्वार्थी आणि भ्रष्टाचारी राजकारणाच्या पार्श्वभूमीवर व्होट आणि नोट या संकल्पनेच्या माध्यमातून निवडून आल्यामुळे तेथील मराठी भाषिकांच्या बऱ्याच अपेक्षाही होत्या. त्यातून मग प्रशासनातील तसेच नोकरी आणि व्यवसायाच्यानिमित्ताने स्थायिक झालेल्या मराठी भाषिकांचा एक ग्रुप तयार झाला.
याचबरोबर खासदार म्हणून निवडून येण्यापूर्वी राष्ट्रीय पातळीवर विविध राज्यातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी आणि नेत्यांची नाफा’ ही संघटना मी स्थापन केली होती. त्यामुळे दिल्लीत आल्यावर या संघटनांचे पदाधिकारी तसेच दिल्ली शेजारी राज्यातील शेतकरी नेत्यांची माझ्याकडे उठबस होवू लागली. शिवाय हिंदी भाषिक राज्यातील नेत्यांचा राबताही वाढला. या साऱ्या परिस्थितीमुळे मला परकेपणा किंवा एकटेपणा कधीही जाणवला नाही. दिल्लीत शेतीतून बाहेर पडलेल्यांची संख्या मोठी असली तरी त्यांची या क्षेत्राविषयीची आस्था अजूनही कायम आहे. अशा व्यक्तींना एकत्रित आणण्याचाही प्रयत्न केला. याशिवाय विविध प्रश्नांवर चर्चा, बैठका तसेच दैनंदिन कामे सुरूच असतात. त्यामुळे बहुतांश खासदारांसारखा दिल्लीत वेळ कसा घालवावा, असा प्रश्न माझ्यासमोर कधीही उभा राहिला नाही.
दिल्लीत खासदारांचा एक क्लब आहे. त्यात बसून नेहमी वेगवेगळ्या नेत्यांशी विविध विषयांवर चर्चा, बैठका सुरू असतात. त्यातून एखाद्या विषयाचे काही नवे पैलूही समोर येतात. त्याचा प्रश्न समजून घेताना किंवा तो सोडवताना चांगला उपयोग होतो. शिवाय या निमित्ताने नवीन ओळखी होतात. इतर नेत्यांशी मैत्रीचे, जिव्हाळ्याचे संबंध प्रस्तापित होतात. दिल्लीत खास अशी अनेक हॉटेल्स आहेत. त्यांची प्रत्येकाची वेगळी वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे या हॉटेल्सूना भेटी देणे आवडते. कधी हिमाचल भवन तर कधी उत्तर प्रदेश भवनात विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी जाणे होते. पंजाब आणि हरियाणा भवनमधील पराठे फार आवडतात. शुध्द तुपातील हे पराठे दह्याबरोबर खाण्याची मजा काही और असते. मुख्य पश्चिम उत्तर प्रदेश आणि हरियाणाची संस्कृती काहीशी पश्चिम महाराष्ट्रासारखी आहे. म्हणजे त्या राज्यात दुधदुभते मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते. त्यामुळे त्यांचा आहारात आवर्जुन वापर केला जातो. म्हणून या राज्यातील खास पदार्थ मनापासून आवडतात. दिल्लीतील राजधानी हॉटेलमध्ये राजस्थानी पध्दतीचे जेवण मिळते. शिवाय तेथील आपुलकी गोडवाही लक्षात राहण्यासारखा असतो. या हॉटेलमध्ये वेटर्स अस्सल राजस्थानी वेषात दिसून येतात. जेवण झाल्यावर बाहेर जाताना एका डफावर थाप मारली की वेर्टर्स आणि मालक ‘आवजो’ असे ओरडतात. ‘परत या’ असा या शब्दाचा अर्थ आहे.
या शिवाय कस्तुरबा गांधी मार्गावर परिक्रमा हे फिरते हॉटेल आहे. तिथे बसल्यावर तुम्हाला संपूर्ण दिल्लीचे दर्शन घडते. त्यामुळे खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्याबरोबर घडलेली ही दिल्लीची सैर अविस्मरणीय ठरते. या शिवाय पंडारा रोडवर गुलाटी नावाचे हॉटेल आहे. ते रात्रभर सुरू असते.
मुंबईहून किंवा पुण्याहून दिल्लीला येण्यासाठी रात्रीच्या विमानाने निघाल्यावर तेथे पोहचण्यास १-२ वाजतात. अशावेळी जेवण कुठे करायचे हा प्रश्न असतो. कारण दिल्लीतील जवळपास सर्व हॉटेल्स बंद झालेली असतात. अशावेळी गुलाटी हॉटेलचा आधार मोठा असतो. सगळी दिल्ली झोपेत गाढ असताना हे हॉटेल मात्र सुरू असते. दिल्लीत आल्यावर लक्षात राहिलेले आणि आवर्जुन नोंद घ्यावे, असे ठिकाण म्हणजे ‘पार्लमेंट लायब्ररी’. अतिशय सुसज्ज अशा या ग्रंथालयात विविध पुस्तकांचा मोठा खजिना आहे. त्यांच्या वाचनातील आनंद काही वेगळाच असतो. या ग्रंथालयात कलिंग भोसले नावाचे एक मराठी गृहस्थ आहेत. लायब्ररीत गेल्यावर त्यांच्याशी आवर्जुन गप्पा होतात. शिवाय लायब्ररीच्या झेरॉक्स विभागातील अशोक पाटील हे क्लार्क म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याशी गप्पा मागण्याचा योग येतो.
इमानदारीने काम करणारा माणूस अशी दिल्लीत मराठी माणसाची ख्याती आहे. त्यामुळे तेथे मराठी माणसाविषयी प्रेम आणि आपुलकी दिसून येते. जेवढ्यास तेवढे बोलणारा आणि कामाला प्राधान्य देणारा मराठी माणूस अशीसुध्दा मानसिकता मोठ्या प्रमाणावर आढळून आली. दिल्लीत मराठी माणूस कोणत्याही क्षेत्रात असला तरी तो आपला प्रभाव पाडल्यावर राहत नाही. येथील राजकारणात मराठी माणसाला पुरेसे स्थान नसेल पण सामाजिक क्षेत्रात मात्र त्याचे स्थान निश्चित वरचे आहे यात शंका नाही आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे दिल्लीतील माणसे कशीही असली तरी बिगर हिंदी भाषिकांबद्दल त्यांच्या मनात परकेपणाची भावना किंवा आकस दिसून येत आहे. हा त्यांच्याकडून घेण्यासारखा सर्वात मोठा गुण म्हणायला हवा.
तशी माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात जिल्हा परिषद निवडणुकीपासून झाली. २००१ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून उभा राहिलो. राजकारणात मी अगदीच नवखा होतो. शिवाय निवडणूक लढवण्याचा पहिलाच प्रसंग होता. मुख्य म्हणजे पैसा, गाड्या, डामडौल यापैकी माझ्याकडे काही नव्हते. ही निवडणूक मी कार्यकर्त्यांनी जमा केलेल्या पैशावर लढवली. विरोधात सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन असलेली तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे स्वप्न पाहणारी व्यक्ती उभी होती. त्यामुळे तिच जिंकणार असा कयास बांधला जात होता. पण जनतेने चमत्कार घडवला आणि मी निवडून आलो. राजकीय क्षेत्रातील हे पहिळे यश होते. जिल्हा परिषद सदस्य म्हणून केवळ अडीच वर्षांचा कार्यकाल वाट्याला आला पण तेवढ्या कालावधीतही स्थानिकांचे अनेक प्रश्न सभागृहात मांडले. नंतर राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. कार्यकर्ते, हितचिंतक यांच्याकडून ही निवडणूक लढवण्याबाबत आग्रह होऊ लागला. त्यांच्या आग्रहाखातर २००४ मध्ये शिरोळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. वास्तविक ही निवडणूक लढवणे सोपी गोष्ट नाही, हे लक्षात येत होते. मुख्य म्हणजे आर्थिक ‘पाठबळ नव्हते. शिवाय विरोधातील उमेदवार दिग्गज, राजकारणातील तरबेज असा होता. तरिही सर्वसामान्य जनतेवर तसेच शेतकरी बांधवांवर नितांत विश्वास होता. त्यांनीही तो सार्थ ठरवला आणि या निवडणुकीत १९,५०० मतांनी निवडून आलो.
विधानसभेत प्रथम प्रवेश केला त्यावेळी वामनराव चटप यांच्याशी खास मैत्री झाली. दरम्यानच्या काळात शरद जोशींची संघटना सोडली होती. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर संबंध ताणले असले तरी वैयक्तीक पातळीवर संबंध चांगले होते. म्हणून वामराव चटप यांच्याशी मैत्री निर्माण होऊ शकली. संसदीय कामकाज एखाद्या गायकासारखे असते. त्यामुळे तिथे कोणत्या ना कोणत्या गुरूची आवश्यकता असते. म्हणून चटप यांना गुरू करून घ्यायचे ठरवले. त्यांना विधानसभेच्या कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव होता. तसेच त्यांना उत्कृष्ट संदस्य म्हणून पुरस्कारही मिळाला होता. त्यांनीही ‘मी तुला घडवतो’ असे प्रांजळपणे सांगितले. सरकारला कोंडीत पकडत अनेक कामे मार्गी लावली. या कालावधीतील दूध बंद आंदोलन बरेच गाजले. त्यावेळी मुंबईला होणारा दूध पुरवठा तोडण्यात आला. चारही बाजूने नाकाबंदी करण्यात आली या आंदोलना संदर्भात नियम १०१ खाली विधासभेत चर्चा घडवून आणण्यास भाग पाडले अशा प्रयत्नांनंतर दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अशा पध्दतीने आठ-दहा वर्षांपर्यंत. दिलेल्या लढ्यांमुळे ऊस तसेच दूध पट्ट्यातील असंख्य शेतकऱ्यांबरोबरच छोटा, मध्यम शेतकरीही संघटनेच्या जवळ आला होता. हा सारा समाज ६० ते ६२ टक्क्यांच्या जवळपास आहे. शिवाय शेतीची बहुसंख्य धोरणे केंद्र सरकार ठरवत असते हे लक्षात आले. म्हणून शेतकऱ्यांची गाऱ्हाणी मांडणारा दिल्ली दरबारी कोणीतरी हवा असा विचार पुढे आला. त्यातून मग लोकसभा निवडणुकीला कोणी तरी उभे रहावे असे सुचवले जाऊ लागले. त्या ताकदीचा कार्यकर्ता नसल्याचे लक्षात आल्यावर ही निवडणूकसुध्दा मीच ठढवावी असा आग्रह झाला. तो मान्य केल्यावर या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. दिग्गजांच्या विरोधात लढायचे असल्याने कुशल रणनिती आखणे गरजेचे होते. मुख्य म्हणजे याही निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी निधी गोळा केला. ‘नोट और व्होट’ ही रणनिती चांगलीच कामी आली. मतदारसंघात इतिहास घडला दिग्गजांचा पराभव करुन मी निवडून आलो. तो ऐतिहासिक क्षण डोळ्यांचे पारणे फेडणारा होता.
खा. राजू शेट्टी
अद्वैत फिचर्स (SV10)
Leave a Reply