परदेशात जाणं ही बाब आता काही खूप मोठी राहिलेली नाही. रोज हजारो-लाखो लोक भारतातून अन्य देशांत जातात आणि येतात; पण कधीकाळी त्याची अपूर्वाई होती. परदेश प्रवासाहून जाऊन आलेला माणूस त्या वेळी जी भाषा बोलायचा, तीही सर्वसाधारण सारखीच होती. प्रगत देशातले रस्ते, वाहने, तेथील शिस्त, स्वच्छता या गोष्टी गप्पांचं सूत्र असायच्या. आता काळ बदललाय. आता भारतात पुण्या-मुंबईतही आलिशान परदेशीच काय; पण देशी गाड्याही पहायला मिळतात. रस्त्याचं वेगळेपण आता इथंही दिसू लागलंय. आता मी जी आठवण सांगणार आहे ती अर्थात, जुनी पंचवीस वर्षांपूर्वीची आहे. माझ्या जपान भेटीतला तो एक अजूनही विसरता न आलेला अनुभव आहे. भारत सरकारच्या वतीनं आम्हा चौघा पत्रकारांची या दौर्यासाठी निवड झालेली होती. एक चित्रकार, एक महिला पत्रकार, एक वयस्कर पत्रकार आणि मी असे आम्ही एकत्र होतो. जपानमधला आमचा पहिला मुक्काम होता ओसाका इथं. विमानतळावरून निघाल्यावर एका ठिकाणी पारंपरिक चहापानासाठी थांबलो अन् त्यानंतर थेट हॉटेलमध्ये. तीन दिवसांच्या इथल्या मुक्कामात काही संग्रहालयाच्या भेटी होत्या; पण कार्यक्रम तसा भरगच्च नव्हता. प्रत्येक जण त्याच्या आवडीनिवडीनुसार भटकंती करू शकेल, अशी स्थिती होती. हॉटेलचा पत्ता, फोन नंबर हाती असला तर तुम्ही इथं चुकण्याचा प्रश्नच येणार नाही, असंही आम्हाला सांगण्यात आलेलं होतं. माझा हा पहिलाच परदेश प्रवास असल्यानं स्वतंत्रपणे कुठं भटकण्याचा प्रश्न नव्हता; पण माझ्याबरोबर आलेले ज्येष्ठ पत्रकार मात्र यासंदर्भात खूपच अनुभवी होते. त्यांनी त्यांचा पासपोर्ट दाखवीतच मला, मी किती देशांचं पाणी प्यायलोय, हे सांगितलेलं होतं. तर हे गृहस्थ त्या दिवशी बाहेर पडले. त्यांनी टॅक्सी केली आणि त्यांना हव्या त्या विभागामध्ये गेले. त्या वेळी एका रुपयाचे दहा येन, असा चलनाचा दर होता आणि टॅक्सीसाठी किमान भाडे ४७० येन होतं. टॅक्सीच्या तुलनेत ट्यूबनं प्रवास करणं खूप स्वस्त आणि सोपही होतं; पण तेही अंगवळणी पडावं लागतं. तर हे महाशय त्यांना हव्या त्या ठिकाणी उतरले. टॅक्सीचालकाला त्यांनी एक हजार येनची नोट दिली. त्यानं उरलेली रक्कम परत केली. सायंकाळच्या सुमाराला ते परतले. फ्रेश झाले. म्हणाले, जरा हॉटेलच्या मॅनेजरला भेटून येतो. काय झालं? मी विचारलं. ते म्हणाले, पहिल्याच दिवशी टॅक्सीवाल्यानं फसवलं. मला मुंबईतली टॅक्सी, साब, कहासे लेना है? हा प्रश्न आठवला. पुण्यातले रिक्षावालेही मनात येऊन गेले. ते व्यवस्थापकाला भेटायला गेले. आपण कोणत्या विभागातून, किती वाजता टॅक्सी घेतली, कोठे उतरलो, याचा तपशील हॉटेलच्या काऊंटरवर दिला आणि वर आले. गप्पांच्या ओघात नंतर काय झालं, याची विचारपूस करणं राहून गेलं. दुसर्या दिवशीचा कार्यक्रम आणि त्यातून मिळणार्या मोकळ्या वेळात कुठं जायचं, कसं जायचं याचीच चर्चा झाली. टोकियोला गेल्यावर स्वतंत्र मार्गदर्शक मिळणार होता. इथं तो नव्हता. शहरही तुलनात्मक छोटं होतं. आम्ही सकाळी नऊच्या दरम्यान हॉटेलच्या लाऊंचमध्ये आलो. अन्य सहकारी येण्याची वाट पाहत होतो. स्वागत कक्षातला अधिकारी आमचीच वाट पाहत असावा. कारण, आम्ही दोघे खाली येताच त्यानं स्मित केलं. कमरेत वाकून अभिवादन केलं अन् दोन पाकिटं माझ्या सहकार्यांच्या हातात ठेवली. त्यातल्या एका पाकिटात हॉटेलच्या व्यवस्थापनानं पाहुण्यांना झालेल्या त्रासाबद्दल क्षमायाचना केली हाती. त्यासोबत एका टॅक्सीमालकाचं पत्र होतं. शहरात त्याच्या अनेक टॅक्सीज होत्या. त्यानंही आपल्या टॅक्सीची सेवा घेतल्याबद्दल धन्यवाद दिले होते. टॅक्सीचालकाकडून झालेल्या चुकीबद्दल क्षमायाचना केली होती. दुसर्या पाकिटात पाचशे येनची एक नोट, तीस येन सुटे आणि एक छोटीशी गिफ्ट होती. कालच्या प्रकाराच दखल ही अशी घेण्यात आलेली होती. आदल्या रात्रीच हॉटेलच्या व्यवस्थापकानं टॅक्सी कोणती, ड्रायव्हर कोण, मालक कोण, यांचा शोध घेतला होता. आपल्या ग्राहकाची तक्रार त्यांच्या कानावर घातली होती. दुसर्या दिवशी सकाळी सातलाच टॅक्सीमालकानं क्षमायाचनेचं पत्र आणि पैसे परत केलेले होते. जपानमध्ये येणयार्या माणसाचा जपानबद्दल, जपानी माणसाबद्दल गैरसमज होऊ नये, अशी कळकळीची विनंती त्यात होती. या तत्परतेबद्दल, कार्यक्षमतेबद्दल, पत्रातल्या भाषेनं सुखावून गेलेलो होतो. परदेश प्रवासातल्या पहिल्याच दिवशी असा अनुभव आला होता की, तो वृत्तपत्रात नोंदविता येणं शक्य होतं. पुण्याला गेल्यावर लिहायचं, असं ठरवून वहीत नोंद केली… टॅक्सीवाला.
त्यानंतर आम्ही टोकियोला गेलो. आमच्या चौघांचा सहवास वाढला. गप्पा होत. अनुभव सांगितले, ऐकले जात. एक वेगळ्याच प्रकारचा मोकळेपणा आला होता. त्या दिवशी रात्री तिथल्या एका भारतीय अधिकार्यानं ‘तुमची रात्र सुखाची होवो’ असं म्हणत एक पेयाची बाटली दिली होती. जपानमधील थंडी आणि हाती हे उंची मद्य. खाणं, पिणं आणि गप्पा अशी मैफील जमली होती. तेवढ्यात, आमचे हे ज्येष्ठ पत्रकार म्हणाले, ‘‘परवा मी गंमत केली. जपानी माणसाची प्रामाणिकता तरी पाहू, असं ठरविलं आणि टॅक्सीवाल्यानं मला उर्वरित रक्कम दिलीच नाही, असं ठोकून दिलं; पण पहा, माणसं कशी होती. त्यांनी मला देऊ नसलेली रक्कमही दिली आणि भेटही!’’ मग त्या दिवशी नेमकं झालं तरी काय होतं? मी प्रश्न केला. तेव्हा ते म्हणाले, टॅक्सी ड्रायव्हरनं मला तीस येनची नाणी आणि पाचशेची एक नोट आणि एक कागदी हातरुमालही दिला होता; पण गंमत तर झाली.- मी गप्प होतो. आमच्यापैकी चित्रकारानं विचारलं, मग तुम्ही ते पैसे परत केले का? या प्रश्नावर काहीच उत्तर आलं नाही. ते येण्यासारखं नव्हतं. आजही मला प्रश्न पडतो की, खरोखर ती गंमत होती का?
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply