नवीन लेखन...

गम्मत एका देवळातील

गेल्या ३४ वर्षामध्ये पोलीस खात्यात वेगवेगळ्या जिल्हयांत, विभागांत आणि पोलीस ठाण्यांत काम करीत असतांना अनेक प्रसंग पहायला मिळाले. त्या प्रसंगांतून खूप काही शिकायला मिळालं. ते प्रसंग प्रत्यक्षात समोर घडल्यामुळे अनुभवाच्या शिदोरीचे गाठोडे मोठेच्या मोठे कधी झाले, ते कळलचं नाही. पोलिस खात्यात काम करतांना काही वेळेस जे पोलिसांचे काम नाही किंवा ज्या कामाचा पोलिसांशी काही संबंध नाही, अशा प्रकारचे कामसुध्दा पोलिसांना करावे लागते. किंबहूना अशा अनेक असंबंध कामांसाठी पोलीस स्वत:च जबाबदारी उचलतांना दिसतात. अशी कामे करतांना कधी मनाला मनस्ताप होतो, तर कधी करमणूक होऊन वेळ कसा निघून जातो हे समजत देखिल नाही. अशा वेळी पोलीस अधिकारी आणि अंमलदार आपलं घरदार, कुटूंब तर विसरतोच पण स्वतःचं जेवण-खाणं सुध्दा घेण्याचं विसरतो.

पोलीस खात्यात काम करतांना एक अनुभव असा आला आणि तो म्हणजे पोलीस खात्यातील बहुतांश पोलिस अधिकारी/अंमलदार भाविक, आस्तिक असतात. आपलं कायदेशिर काम करीत असतांना पोलिसांनी कसंही काम केलं तरी एका पक्षाची बाजू नाराज होते. तक्रारदाराची तक्रार घेऊन विरोधी पक्षांवर कारवाई केली तर तो नाराज होतो. किंवा एका पक्षाची तक्रार घेऊन जर कारवाई केली नाही. तर फिर्यादी पक्षाची मर्जी खफा होते. अशा प्रकारे अडकित्यामध्ये अडकलेल्या सुपारीसारखी अवस्था पोलिसांची होते मग त्यातून आमची जनता जनार्दन वेगवेगळे तर्क, अंदाज व मतं व्यक्त करीत असतात. कोणी भ्रष्टाचारी म्हणून हिणवतात तर कोणी कामचुकार म्हणून आरोप करतात.

असं काम करीत असतांना दोन्ही पक्षकारांचं समाधान करणं पोलिसांना अशक्य असतं. कामाच्या ओघात व कायदेशीर काम करतांना एकावर अन्याय झाल्याची किंवा केल्याची भावना होते. त्यामुळे पोलिसांचे काम म्हणजे विना-आभार असते. कोणी आभार प्रदर्शन करावे अशी सुध्दा पोलिसांची इच्छा नसते. अशा अनेक प्रकारच्या कामातून खूप वेळा मानसिक त्रास होत असतो. असा मानसिक त्रास कमी व्हावा किंवा तो कमी करण्यासाठी पोलिस खात्यातील अधिकारी/ अंमलदार आपल्या दैवतासमोर देवासमोर किंवा ज्याचे श्रध्दास्थान असेल त्या ठिकाणी दोन्ही हात जोडून नतमस्तक होत असतो.

पोलिसांनी नि:पक्षापाती असावे, निधर्मी असावे, असा नियम आहे. पण काही ठिकाणी नियमाला सुध्दा अपवाद असतात. आणि असे अपवाद म्हणजे पोलीस ज्या ठिकाणी काम करतात, त्या ठिकाणी आपल्या देवदेवतांचे किंवा दैवताचे फोटो लावून पूजा करतांना दिसतात. ते अंधश्रध्दा म्हणून पूजा करीत नाहीत, तर पोलीस चोवीस तास अहोरात्र काम करीत असतांना मनावर आलेला ताण थोडासा कमी व्हावा, मानसिक शांती लाभावी, कामाच्या ओघात झालेल्या एखाद्या चुकी बद्दल कोठेतरी पश्चात्तापाची भावना व्यक्त करण्यासाठी पोलीस त्याच्या दैवतासमोर नतमस्तक होत असतो. तो देवपूजा, मुर्तीपूजा करतो, म्हणून नि:पक्षपातीपणे काम करीत नाही असं म्हणता येणार नाही.

पोलिसांना एकच धर्म आहे आणि तो म्हणजे मानव धर्म, स्वामी विवेकानंदानी सांगितल्याप्रमाणे मानव सेवा हीच ईश्वर सेवा असल्याने, पोलीस खात्यातील कनिष्ठापासून ते वरिष्ठा पर्यंत मानव धर्माचे आचरण करता करता कर्तव्यपरायणाचा आनंद घेत असतात. म्हणून मग पोलीस खात्यातील काही अधिकारी/अंमलदार मनोभावे पूजा करतांना दिसतात. बऱ्याच ठिकाणी पोलीस वसाहत किंवा पोलीस स्टेशनच्या आजुबाजुला एखादे छोटेसे मंदिर पाहायला मिळते. तर काही ठिकाणी देवदेवतांचे फोटो लावलेले आढळून येतात. असे मंदिर किंवा फोटो लावण्यामागचा उद्देश वेगळा नसतो. तसेच कोणा एका धर्माचा उदोउदो करण्याचा नसतो. तर, पोलीस ज्यावेळी काम करतात त्यावेळी मनावरील ताण कमी करण्यासाठी, मळभ दूर सारण्यासाठी पोलीस मुर्तीपूजा किंवा तस्विरी समोर उभा राहून केलेंले कर्म किंवा कर्तव्य करतांना अजाणतेपणी झालेल्या चुकी बद्दल देवापुढे नतमस्तक होवून, त्या प्रभूस शरण जात असतो.

समाजातील बहुतांश लोक वेगवेगळ्या मंदिरात जाऊन पूजा करतांना दिसतात. ते इतरांसारखे तासनतास मंदिरात ठाण मांडून न बसता, क्षणभर मंदिरात थांबून निघून जात असतात. कामाच्या व्यापातून त्याला तेवढाच विरंगुळा मिळत असतो. एखादी यात्रा, पंढरपूरची वारी, एखादा हरिनामाचा सप्ताह या सारख्या कार्यक्रमांसाठी पोलीस बंदोबस्तासाठी हजर असतो. त्यावेळी पोलीस त्या वारीमधील, यात्रेमधील वारकऱ्यांच्या चाललेल्या हरिनामाच्या गजरात क्षणभर तो मग्न होतो आणि त्यातूनच तो सांप्रदायिक जिवनाचा व देवभक्तीचा आनंद मिळवित असतो.

सर्व प्रकारचा बंदोबस्त, ड्युट्या करतांना व कायदा-सुव्यवस्था राखत असतांना पोलिसांमधील माणूस जास्तीत जास्त मानवसेवा करुनच त्यातून ईश्वरी सेवा केल्याचा आनंद मिळवित असतो.

सर्वात जास्त मानवसेवा पोलिस खात्यातील लोकांकडूनच होत असते.

मी पोलीस खात्यातील आहे म्हणून मी पोलिसांच्या बाजूने लिहीत आहे, असं वाचकास वाटणं साहजिकच आहे. पण तसं नाही, कारण समाजामध्ये अगदी किरकोळ घटनांपासून ते मोठमोठ्या घटना, अपघात, घातपात, नैसर्गिक आपत्ती, अशा अनेक प्रसंगी सर्वांत पुढे मदतीसाठी कोण असतो, तर तो पोलिसच असतो. एखाद्या अपघातात किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये जे लोक अडकलेले असतात, त्यांना पोलिसच सर्वांत प्रथम मदत करुन, त्यांची सुटका करुन, त्यांना सर्व सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न करीत असतात. कदाचित हे मी, जे काही लिहीत आहे, त्यास सर्वजण सहमत असतीलच असे नाही. प्रत्येकाचा, प्रत्येक घटनेबाबत अनुभव वेगळा असू शकतो.

तर, शेवटी पोलिस हा एक समाजाचा घटक आहे आणि त्या समाजातील जे नैसर्गिक नियम आम जनतेला लागू आहेत, तेच पोलिसांना लागू आहेत. मग अशा नियमांचे पालन पोलिसांना करावेच लागते. समाजात वावरतांना समाजातील नियम, रितीरिवाजाला धरुनच चालावे लागते आणि अशा वेळी पोलिसातील माणूस, मनाला समाधान मिळविण्यासाठी, शांती मिळविण्यासाठी तो सुध्दा वेळात वेळ काढून कोणत्या तरी मंदिरात, चर्चमध्ये, मस्जिदीत धाव घेत असतो. त्या ठिकाणी क्षणभर त्या विधात्याच्या चरणी माथा टेकतो आणि आत्मीक समाधान प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत असतो.

आपल्या कामाच्या कर्तव्याच्या व्यापातून तो पोलिस मानसिक समाधान मिळविण्यासाठी वेळात वेळ काढून कधी ड्युटीवर जातांना किंवा घरी परत जातांना मंदिरात जात असतो. घरी जातांना थोडा उशिर झाला, तरी पोलीस मंदिरात थांबून मगच घरी जातो. सगळे पोलीस मंदिरात किंवा इतर धार्मिक ठिकाणी जात असतीलच असेही नाही.

पोलीस खात्यात काम करतांना अनेक वेळा गंमती-जंमती घडत असतात. अशा घटना घडल्या तरी बऱ्याच वेळा त्यामधून काही निष्पन्न होत नाही. परंतु या सर्व धामधूमीमध्ये पोलीस मात्र नाहक कामाला लागतो. शेवटी मग तो स्वत:च्या मनाशीच बोलून मनातच हसत राहतो आणि हया गडबडीमध्ये तो आपलं घर हरवून बसतो.

अशीच एक गंमत मी सांगणार आहे. आता तुम्ही म्हणाल, “जर एक गंमतच सांगायची होती, तर हे एवढं पाल्हाळ का लावलं आहे? तुमच्या मनात आलेला प्रश्नही बरोबर आहे. कारण अशा अनेक घटनांमुळे पोलीस खात्यातील लोकांची खूप ओढाताण होते. पोलीस प्रसंगाला कसे सामोरे जातात? त्याचा कसा मुकाबला करतात? असा मुकाबला करीत असतांना त्यांचे मानसिक संतुलन किती बिघडत असेल? त्याला मानसिक व शारिरिक त्रास किती करावा लागत असेल? हे मला तुमच्या नजरेस आणून देण्याचा हा एक प्रयत्न आहे, असं समजा!

आता आपण मुख्य विषयाकडे वळूया. तर प्रसंग असा होता, मी सर्वसामान्य माणूस आहे. त्या विधात्यासमोर दिवसातून काही वेळ नतमस्तक होउन प्रार्थना करीत असतो. हे करीत असतांना वेळ मिळेल त्यावेळी ड्युटीवर जातांना किंवा ड्युटीवरुन परत येतांना एखाद्या मंदिरात जावून त्या मूर्तीसमोर माथा टेकतो. हा माझा नित्यक्रम आहे. कधी कधी नाही जाता येत मंदिरात, मग बाहेरुनच दोन्ही हात जोडून त्या विधात्याला मनोभावे नमन करुन कर्तव्य सुरु करतो. त्यामुळे मनाला एक वेगळंच समाधान व काम करण्याचं सामर्थ्य लाभत असतं.

अशाच एका शनिवारी हनुमान मंदिरात जायचे होते. परंतु सकाळी लवकर ड्युटीवर हजर होण्याचा संदेश प्राप्त झाल्याने, मंदिरात न जाता सरळ ड्युटीवर पोहोचलो.

दिवसभर ड्युटी करून रात्री दहा-साडेदहा वाजता घरी जाण्यास निघालो. दिवसभराच्या कामाच्या व्यापातून घरी फोन करायला वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे थोडा गडबडीत घरी जात होतो. रस्त्याने जातांना एक हनुमान मंदिर लागते. मंदिराजवळ गाडी थांबवून दोन मिनिटे दर्शन घेवून जावे असा विचार करीत मंदिरात गेलो. सर्व साधारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मंदिरात जातांना हार-नारळ घेऊन जातात, सोमवारी भक्त शिवमंदिरात देवाला दूध अर्पण करतात. तर शनिवारी हनुमान व शनीमंदिरात तेल-नारळ देतात. त्याच बरोबर रुईच्या पानांचा हार अर्पण करतात. बऱ्याच ठिकाणी शनी मंदिराच्या बाहेर लिंबू-मिरची काळ्या धाग्यात बांधून ती विकायला ठेवतात. बहुतेक लोक काळ्या धाग्यातील लिंबू-मिरची विकत घेवून ती शनी देवाच्या व हनुमान मुर्तीला स्पर्श करुन घरी घेवून जातात. तर काही मोटारकारला किंवा मोटार सायकलला बांधतात.

ते का बांधतात? हे मलाही माहिती नाही. तो प्रत्येकाच्या श्रध्देचा भाग आहे. आपल्याला त्या विषयाबद्दल बोलायचे नाही.

त्या दिवशी मी रात्री घरी जातांना मंदिरात गेलो. बाहेरुन तेल, नारळ व रुईच्या पानांचा हार घेऊन मी शनीमंदिरात प्रवेश केला. माझ्या सारखे अनेक भाविक त्या मंदिरात एका मागे एक असे रांगेत उभे राहून दर्शन घेत होते. मी नियमित त्या मंदिरात जात असल्यामुळे म्हणा किंवा पोलीस अधिकारी असल्यामुळे त्या मंदिरात पूजा करणारे तिथले सेवेकरी आणि काही भाविक मंडळी मला ओळखत होती. मंदिरात जास्त गर्दी नव्हती परंतु पंधरा-वीस भाविक रांगेत उभे होते. एक-एक जण मूर्तीजवळ जाऊन हार घालून ते वाहत होते. व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात ना तसे काही भाविक पटकन दर्शन घेउन पुढे जात होते. तर काही भाविक खूप वेळ मूर्तीसमोर हात जोडून मनातल्या मनात काहीतरी पुटपुटत होते. प्रत्येक भाविक आपापल्या मनाप्रमाणे मनोभावे पूजन करतांना दिसत होते.

मी देखिल रांगेत उभा राहून पुढचे भाविक कधी पुढे सरकतात याची वाट पहात असतांना, माझं लक्ष मूर्तीजवळील भाविकाकडे गेलं. तो खूप वेळ पूजा करीत होता. प्रथम त्याने त्याच्याजवळील हार मूर्तीला घातला, मूर्तीवर तेल वाहिलं, नंतर त्याने त्याच्या हातातील लिंबू-मिरची उजव्या हातात घेउन तो एक वेळ त्या मूर्तीला लावत होता व पुन्हा ती लिंबू-मिरची स्वत:च्या कपाळाला लावत होता. तसा तो भाविक वेगळं असं काही करीत नव्हता.

सर्वच भाविक त्या पध्दतीने पूजा करीत होते. परंतु तो भाविक खूप वेळ मूर्तीसमोर उभा राहून हातातील लिंबू-मिरची एक सारखा स्वत:च्या कपाळाला लावून पुन्हा मूर्तीला लावत होता. जवळ जवळ दहा ते पंधरा वेळा तीच क्रिया करीत होता. आता मात्र मला सुध्दा कंटाळा आला आणि मनातून त्या व्यक्तीचा रागही येत होता. परंतु मंदिरात उभा असल्यामुळे काही बोलता येत नव्हतं. माझ्या मागील भाविक सुध्दा रांगेत उभं राहून कंटाळलेले दिसत होते. एकमेकांकडे पाहून हाताने इशारा करुन ” हा कसली पूजा करतोय? ” असे एकमेकांना खुणावत होते. परंतु कोणीही उघडपणे बोलत नव्हता.

तेवढ्यात माझ्या पाठीमागील एका भाविकाची सहनशीलता संपली व प्रत्यक्षपणे त्या भाविकाला काहीही न बोलता, इतरांकडे पहात कुत्सीतपणे तो म्हणाला,

“एवढी लफडी करताच कशाला? ” त्याच्या त्या वाक्यावर रांगेत ताटकळणाऱ्या सगळ्यांनीच मोठ्याने हसून दाद दिली.

सर्वजण हसत असतांना तो भाविक मागे रागाने पहात म्हणाला, “काय हो, मी कसली लफडी केलीत? काहीही आरोप करता. ”

त्यांच्या या बोलण्यावर माझ्या मागील भाविकाने “लफडी करीत नाही ना? मग देवाला एवढं संकटात का टाकताय? ” म्हणून पुन्हा त्याला डिवचलं.

“मी देवाला संकटात टाकलंय? हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही काय अंतर्ज्ञानी आहात काय? की कोण साधु संत लागून गेलात.” त्या भाविकाने रागात एका दमात चार प्रश्न विचारले.

“अहो…. पुढे व्हा, पाया पडा आणि लवकर आवरा. आम्ही मागे रांगेत उभे आहोत, याचं भान ठेवा. आम्ही कोण साधूसंत नाही आणि अंतर्ज्ञानी तर मुळीच नाही. हे बघा तुम्ही जी पूजा करताय ना, त्याच्यासाठी अंतर्ज्ञानी किंवा साधुसंत असण्याची गरज नाही, कळलं का? ” माझ्या मागील भाविक म्हणाला.

तोपर्यंत अनेक जण त्यांना सांगत होते, “अहो, भांडताय कशाला, दर्शन घ्या आणि व्हा पुढे. ”

पण ते दोन भाविक आपआपसांत हमरीतुमरीवर आले. हया गडबडीत मी देवाचं दर्शन न घेताच मंदिराबाहेर आलो होतो. एकमेकाचे आवाज वाढल्यामुळे बघ्यांची गर्दी वाढली. मग मात्र माझ्यातल्या पोलिसाला बाहेर पडल्याशिवाय गत्यंतर नव्हते.

“ओ मिस्टर, दोघेही, तुम्ही आता गप्प बसता की, हया मंदिरात देवासमोर पोलिसी खाक्या दाखवू? ” मी विचारलं.

मग मात्र दोघेही गप्प बसले. त्या दोघांनाही मी समजावून सांगितलं. जमलेल्या लोकांना तेथून जायला सांगितलं. आता त्या दोन्ही भाविकांना आपली चूक समजली होती. दोघेही एक दुसऱ्याची माफी मागून निघून गेले. हया सर्व प्रकारात माझा अर्धापाऊण तास कसा गेला, हे कळलचं नाही. त्यानंतर मी दर्शन घेऊन बाहेर आलो.

एक दोन लोक ओळखीचे होते. त्यापैकी कोणी माझे आभार मानले, तर कोणी “चला साहेब, तुम्हाला उशिर होईल” असं म्हणून सहानभूती दाखविली.

या सर्व प्रकारात घरी लवकर जायचं होतं ते मी विसरुनच गेलो होतो. त्या ठिकाणी मीच काय अजून इतर कोणीही पोलिस असता तरी त्याने तेच केलं असतं, जे मी केलं होतं. वास्तविक तो काही माझ्या डयुटीचा भाग नव्हता, पण शेवटी पोलीस चोवीस तास डयुटीवर असतो, असा नियम आहे. म्हणून पोलिसांना काळ-वेळ बघावी लागत नाही. त्याने सदैव कर्तव्यावर हजर रहायचं असतं. आणि तेही समाजासाठी, समाजाच्या स्वास्थ्यासाठी !

मला घरी जायला उशीर झालाच होता. त्यात या हे मंदिरातील प्रकारामुळे जास्तच उशिर झालेला होता. काही वेळ तरी मी माझं घर हरवून काम करीत होतो. ज्यावेळी लक्षात आलं, “अरे मला आज लवकर घरी जायचं होतं, ‘ त्यावेळी उशिर झालेला होता. नेहमीप्रमाणे घरी उशिरा पोहोचल्यावर पत्नीची प्रश्नावली सुरु झाली.

“का… हो ! आज लवकर येणार होता ना? मग कुठे माशी शिंकली? ” मी तिला उशिरा येण्याचं कारण सांगून, देऊळामध्ये घडलेली गंमत सांगितली, त्यावर ती देखील मनसोक्त हसली, मी देखिल तिच्या हास्यात सामिल झालो. माझा दिवसभराचा शिण एका क्षणात कुठे नाहीसा झाला, समजलं देखिल नाही.

तर अशी होती ही “देवळातील एक गंमत’ पण मित्रांनो, तुम्ही असं काही करु नका. ‘देवावर श्रध्दा ठेवा, परंतु अंधश्रध्दा मुळीच ठेऊ नका,’ हेच पोलीस म्हणून माझं एक सांगणं आहे.

व्यंकट पाटील

व्यंकट पाटील यांच्या ‘घर हरवलेला पोलीस’ या लेखसंग्रहातील हा लेख.

Avatar
About व्यंकट भानुदास पाटील 20 Articles
सहायक पडोलिस आयुक्त या पदावरुन निवृत्त झालेले श्री व्यंकटराव पाटील ह पोलीस कथा लेखक आहेत तसेच त्यांच्या कादंबऱ्याही प्रकाशित झाल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..