माणसाला देवानं दिलेल्या इंद्रियांपैकी चार इंद्रियांच्या साहाय्याने तो आस्वाद घेऊ शकतो. डोळ्यांनी पाहून, कानांनी ऐकून, तोंडाने चव घेऊन व नाकाने गंध (वास) घेऊन.
जर एखाद्या अस्सल पुणेकराचे डोळे व कान बंद करुन पुण्याची सफर घडवली तर तो त्याला नाकाने जाणवणाऱ्या त्या त्या परिचित गंधावरुन ते ते ठिकाण हमखास सांगू शकतो.
मी हा प्रयोग एकदा केला. एका अस्सल पुणेकर मित्राचे डोळे व कानावरुन काळी पट्टी लावून त्याला पुण्यातून अनेक ठिकाणी उलटे सुलटे गाडीवरुन फिरविले. मी जिथे जिथे त्याला घेऊन गेलो, त्यानं मला पोपटासारखी ‘अचूक उत्तरं’ दिली.
पहिल्यांदा त्याला फर्ग्युसन रोडवरील एका सुप्रसिद्ध हाॅटेलसमोर नेल्यावर येणाऱ्या सांबाराचा गंध घेऊन तो छातीठोकपणे बोलला, ‘वैशाली’! तिथून त्याला खाली गुडलककडे आणताना काॅफीचा टिपिकल वास घेऊन तो म्हणाला, ‘रूपाली’!
त्याला आपटे रोडला घेऊन गेल्यावर गरमागरम पॅटीसच्या वासावरुन त्यानं ओळखलं, ‘संतोष बेकरी’! डेक्कनच्या छोट्या पुलावरुन जाताना तो नदीचा वास आल्यावर त्यानं माझ्या कानाशी हळू आवाजात सांगितलं. ‘भिडे पूल’!.
तिथून नवारात गेल्यावर मिरची, हळद, शिकेकाई, वेखंड, इ. दळणांचा संमिश्र वासावरुन तो ओरडला.’अरे मित्रा, हेच ते ठिकाण जिथं या मसाल्याच्या वासानं पुणेरी स्त्रियांच्या नाकाचे शेंडे लाल होतात. ‘राजमाचिकर गिरणी’!’
जुन्या प्रभात टाॅकीजच्या चौकात त्याला एका दुकानापुढे उभे केले, नव्या कोऱ्या पुस्तकांचा गंध त्याच्या नाकात शिरल्यावर तो म्हणाला, ‘अप्पा बळवंत चौक’! त्याला कुंटे चौकात घेऊन गेल्यावर नव्या कोऱ्या साड्यांच्या वासावरुन त्यानं ओळखलं, ‘हा तर लक्ष्मी रोड!’
सिटीपोस्टकडून पुढच्या चौकात गेल्यावर अत्तरांच्या वासावरुन तो पुटपुटला ‘सोन्या मारुती चौक’! तिथून रविवार पेठ रेल्वे बुकींग ऑफिसकडे गेल्यावर तो उदबत्त्यांच्या येणाऱ्या वासावरुन म्हणाला, ‘विठ्ठलदास सुगंथी’!
गणेशोत्सवात दगडूशेठ हलवाई गणपती जिथं दहा दिवस असतो तिथे गेल्यावर चक्का, खव्याच्या वासावरून त्यानं ओळखलं की, आपण बुधवार पेठेतील दत्त मंदिराजवळ आहोत.
निंबाळकर चौकात आल्यावर तो वासावरुनच मिटक्या मारत म्हणाला..’सुजाता मस्तानी’! नेहरु चौकातील कोपऱ्यावरील दुकानापुढे उभं राहिल्यावर भट्टीतल्या ताज्या फुटाण्यांच्या येणाऱ्या वासावरून त्यानं सांगितलं ‘मलजी भट्टी’!
कांदा, बटाट्याच्या वासावरून तो म्हणाला, ‘आपण जुन्या व नव्या मंडईच्या मधे आहोत.’
टिळक रोडवरील टिळक स्मारक चौकात गेल्यावर त्याला अस्सल ‘पुणेरी’ जेवणाचा गंध जाणवला व तो म्हणाला, ‘बादशाही बोर्डींग’.
एव्हाना पेट्रोल भरण्यासाठी मी नेहमीच्या ठिकाणी गेलो, तेव्हा या पुणेकरांच्या तोंडून शब्द बाहेर पडले.’कुलकर्णी पेट्रोल पंपाशिवाय पुणेकरांना पर्याय नाही’.
पेट्रोल भरल्यानंतर मी कुमठेकर रस्त्याला वळलो. तिथून जाताना येणाऱ्या तांबड्या रश्याच्या वासावरून हा शुद्ध शाकाहारी मला सांगू लागला, ‘आवारे मटनाची खानावळ’!
मला चहाची तल्लफ आली, मी चिमणबागेत चहासाठी गाडी लावली. तिथं येणाऱ्या चहाच्या वासावरून यानं ओळखलं.. ‘तिलक’ चा चहा!
गणपती चौकात गेल्यावर जोगेश्वरी देवीकडे जाताना याच्या नाकाला टिपिकल दक्षिण दावणगिरीच्या डोशाचा वास येतो व हा सांगतो, ‘शितळा देवी’च्या इथला लोणी स्पंज डोसा मला फार आवडतो!’
त्याला मी केसरी वाड्यासमोर घेऊन गेल्यावर येणाऱ्या बटाटे वड्याच्या वासावरून त्यानं ओळखलं, ‘मित्रा, आलोच आहोत तर ‘प्रभा विश्रांती गृह’मधून पार्सल घेऊयात ना!’
मी पार्सल घेतलं आणि मुंजाबाच्या बोळात वळलो, तर तिथं येणाऱ्या वासावरून या पठ्यानं ओळखलं, ‘बेडेकर मिसळमध्ये गर्दी आहे का रे?’
मी त्याला किती तरी ठिकाणी घेऊन गेलो, त्यानं सर्व ठिकाणं बरोब्बर सांगितली. मला त्याचं कौतुक वाटलं. आपल्यालाही पुणं माहिती आहे, मात्र न खाता, न पिता फक्त वासावरुनच आख्खं पुणं ओळखणाऱ्याच्या रक्तातच पुणं आहे, तोच ‘खरा पुणेकर’!
© सुरेश नावडकर
मोबाईल ९७३००३४२८४
२५-४-२१
सर ,
लेख फारच छान आहे. इतके अचूक ओळख व तीही फक्त वासावरून हि दैवी देणगीच आहे.
अस्सल पुणेकरही बरेच वेळेला चुकण्याची शक्यता असते. तुमचा मित्र ग्रेटच आहे.
असेच नवनवीन विषयावर लिहीत जावे. आमच्या ज्ञानात भर पडते.
दिलीप कुलकर्णी मोबा. ९८८१२०४९०४