महात्मा गांधींना गोरगरिबांविषयी अतिशय आपुलकी व जिव्हाळा होता, आपल्या प्रत्येक कृतीमधून गरिबाविषयीचा कळवळा ते व्यक्त करीत असता. गांधीजींच्या आश्रमात एक तरुण डॉक्टर सेवक होता. तो परदेशातही जाऊन आला होता. मात्र महात्मा गांधींच्या कार्याने प्रभावित होऊन तो त्यांच्या आश्रमात आला होता. आश्रमात येणाऱ्या रुग्णांवर तो गांधीजींच्या सल्ल्याने निसर्ग उपचार करीत असे.
एकदा सकाळीच आश्रमात एक आजारी महिला उपचार घेण्यासाठी आली. आजारपणामुळे तिला खूपच अशक्तपणा आला होता. महात्मा गांधी त्या डॉक्टरला म्हणाले की, या महिलेला कडूनिंबांची पाने खाऊ घाला! तसेच तिला ताक घ्यायला द्या. काही दिवसांनी ती बरी होईल. गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे महिलेला कडुनिंबाची पाने व ताक द्यायला सांगितले. दुपारी गांधीजी व डॉक्टरांची पुन्हा भेट झाली. त्या वेळी गांधीजींनी त्या डॉक्टरला त्या महिलेला कडूनिंबाची पाने व ताक दिले का हे विचारले. त्यावर डॉक्टरने हो, तिला घ्यायला सांगितले होते. त्याप्रमाणे तिने घेतली असेल असे सांगितले. त्यावर गांधीजी त्याला म्हणाले, घेतले असेल म्हणजे? तुम्ही तिला ते स्वतः दिले नाहीत काय? त्यावर डॉक्टरने नकारार्थी मान हलविली.
गांधीजी त्याला म्हणाले की, केवळ औषध घ्या एवढेच सांगणे हे डॉक्टराचे काम नसते तर ते घेतले की नाही हे पाहणेही डॉक्टरांची जबाबदारी असते. त्यानंतर गांधीजी स्वत: आश्रमात फिरले व त्या महिलेला त्यांनी शोधून काढले व तिची विचारपूस केली. त्या वेळी ती महिला म्हणाली की, ग्लासभर ताक घ्यायला देखील माझ्याजवळ पैसे नाहीत. त्या महिलेचे दारिद्रय पाहून गांधीजींना खूप वाईट वाटले. त्यांनी त्या महिलेला आश्रमात ठेवून घेण्याबाबत संबंधितांना सांगितले व त्या डॉक्टरलाही तिच्यावर जातीने देखरेख करून रोज सांगितलेले औषध देण्यास सांगितले. काही दिवसांनी ती महिला खडखडीत बरी होऊन आश्रमातून आपल्या घरी गेली.
Leave a Reply