गंगाधर महांबरे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मालवण येथील टोपीवाला हायस्कूलमध्ये झाले. पुढे ते पुण्यास राहू लागले. त्यांचा जन्म ३१ जानेवारी १९३१ रोजी झाला. ‘पश्चिमा’ पुणे नियतकालिकाचे कार्यकारी संपादक झाले. मालवणच्या ‘बालसन्मित्र’ या पारुजी नारायण मिसाळ यांच्या पाक्षिकात त्यांच्या बालकथा, कविता आणि अन्य लेख प्रसिद्ध व्हायचे. पुढे ही लेखनाची आवड वाढत गेली. त्यांनी पुण्याला गेल्यावर वृत्तपत्रव्यवसायास सुरुवात केली. पुढे भावगीतकार व चित्रपटगीतकार म्हणून त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली.
उत्कट भावकाव्यात गणना होणारी त्यांची अनेक गीते आहेत. महांबरे यांनी ‘कंठातच रुतल्या ताना’ निळा सावळा नाथ, बोलून प्रेमबोल, ‘संधीकाली या अशा’ ‘नयनात तुझ्या सखि सावन का?’ अशा कित्येक सुंदर उत्कट भावकविता लिहिल्या. उत्तम भावगीतरचनांप्रमाणेच त्यानी सुरेख चित्रदर्शी भावरम्य चित्रपट गीते लिहिली. त्यामुळे त्यांची चित्रपटगीतकार म्हणून सर्वदूर ख्याती पसरली. त्यांची चित्रपट गीते असलेले मराठी चित्रपट म्हणजे ‘युगे युगे मी वाट पाहिली’, ‘सौभाग्यकांक्षिणी’ ‘एकटी’, ‘प्रीत तुझी माझी’ इत्यादी आहेत. गंगाधर महांबरे यांच्या गाजलेल्या चित्रपट गीतात ‘तूच खरा आधार’, ‘जादुगारा तुला मी’, ‘देवाघरच्या फुला’, ‘पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे’, ‘हळदीकुंकवाला हळदीकुंकवाला बाई सुवासिनी झाल्या दंग’ इत्यादी गीते गाजत आहेत.
त्यांची कित्येक गीते आशा भोसले, लता मंगेशकर, सुधीर फडके इत्यादी नामवंत गायक- गायिकांनी गाऊन महांबरे यांच्या गीतरचनांना योग्य तो न्याय दिलेला आहे. सुप्रसिद्ध नाटककार व बंगाली वाङ्मयाचे अभ्यासक मालवणचे नामवंत साहित्यिक भार्गवराम विठ्ठल तथा मामा वरेरकर यांचा जीवनपट चितारणारे ‘एक अविस्मरणीय मामा’ हा छोटासा चरित्रग्रंथ महांबरे यांनी लिहिला आहे. याशिवाय ‘चार्ली चॅप्लीन’,‘रसिका तुझ्याचसाठी’, ‘मॉरिशस’, ‘मराठी गझल’ इत्यादी अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. भारतीय आकाशवाणीचे एक मान्यवर गीतकार म्हणून त्यांचे आकाशवाणीसाठी योगदान आहे.
चित्रपट रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, ध्वनीमुद्रिका, संगीत मैफल, कॅस्टेस् आणि आता सी. डी. इत्यादी माध्यमांनी कवी मा.गंगाधर महांबरे यांच्या गीतांचा अनुरुप उपयोग करून घेतला आहे. ‘रसिका तुझ्याच साठी’ या त्यांच्या गीताची ध्वनिमुद्रिका एका अमेरिकन कंपनीनेही प्रसिद्ध केली होती. नवी दिल्ली येथील नॅशनल प्रोडक्टिव्हिटी कौन्सिलने त्यांना १९८३ साली पोएट ऑफ दि इयर हा सन्मान दिलेला असून गोव्याच्या गोमंतक मराठी अकादमीने सन्माननीय फेलोशिप दिली होती. केंद्र सरकारचे आणि महाराष्ट्र सरकारचे अन्य पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले होते. मा.गंगाधर महांबरे यांचे २३ डिसेंबर २००८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply