मग येते गंगोत्री! येथील मुख्य आकर्षण म्हणजे ‘गंगेचे मंदिर.’ गंगेच्या मूळ मंदिराचा जिर्णोद्धार अमरसिंह थापा या नेपाळच्या गुरखा जनरलने केला. मात्र सध्याचे गंगेचे मंदिर जयपूर राजघराण्याने बांधले. त्यावर सोन्याचा कळस चढवला. गंगामातेला सुवर्णछत्र अर्पण केले. पांढऱ्या ग्रेनाईटने बांधलेले हे मंदिर पूर्वाभिमुख असून गाभारा व सभामंडप अशी त्याची रचना आहे. गाभाऱ्यात गंगा, यमुना व सरस्वतीच्या मूर्ती असून थोडे खाली भगीरथ, अन्नपूर्णा, गणपती व शंकराचार्यांच्या प्रतिमा आहेत.
गंगोत्रीला गंगेच्या दोन्ही तीरावर अनेक मठ, आश्रम, धर्मशाळा, छोटी लॉजेस, दुकाने आहेत. दुकानात गरजेच्या वस्तू, धार्मिक पुस्तके, फोटो, पूजा साहित्य उपलब्ध असते. हे दोन्ही तीर ठिकठिकाणी पूल बांधून जोडण्यात आले आहेत.
गंगेच्या मंदिराच्या जवळच गंगेच्या प्रवाहाचा उजव्या तीरावर एक मोठा प्रस्तरखंड आहे. त्याला ‘भगीरथ शीला’ असे म्हणतात. या ठिकाणी कोरीव काम केलेला एक लाकडी मंडप असून त्यात भगीरथ राजाचा पितळी मुखवटा व शिवलिंग स्थापित केले आहे. या ठिकाणी भगीरथ राजाने तपश्चर्या केली होती, अशी श्रद्धा आहे. परिसरात इतरही मंदिरे आहेत.
गंगोत्रीत गंगेचा एक सुरेख प्रपात आहे. हे स्थान गौरीकुंड म्हणून ओळखले जाते. सुंदर लाल रंगाच्या खडकातून मार्ग काढत गंगा निरनिराळ्या धारांतून ५०-६० फूट खाली झेपावते. अवखळ गंगेच्या या रौद्र रूपाला पार्श्वभूमी लाभते ती प्रपाताच्या घनगंभीर आवाजाची! हे गंगोत्रीतील अतिशय देखणे स्थळ आहे.
गंगोत्रीपासून ६-७ कि.मी. अंतरावर ‘केदारताल’ म्हणून एक सुरेख सरोवर आहे. पण केदारतालकडे जाणारा रस्ता अवघड आहे. त्यामुळे फारसे कुणी तिकडे जात नाही. केदारतालमधून केदार गंगा ही नदी उगम पावते व गंगोत्रीत गंगेला मिळते. तसेच भागीरथीची आणखी एक मैत्रीण रूद्रगंगा ही पण भागीरथीला गंगोत्रीपाशी भेटते. रूद्रगंगा व भागीरथीच्या संगमस्थानी पांडवांनी आपल्या भाऊबंदांच्या हत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी पापविमोचन यज्ञ केला होता, असे सांगितले जाते.
प्रसिद्ध चिनी प्रवासी ह्यु-एन-त्संग याने आपल्या भारत प्रवासात गंगोत्रीला भेट दिली होती. त्यावेळी चमत्कार करणारे काही साधू त्याला गंगोत्रीत भेटले होते. त्यापैकी काही साधूंचे वय ५०० वर्षांपेक्षा जास्त होते, असे उल्लेख त्यांनी केले आहेत.
दिवाळी नंतर गंगोत्रीचे मंदिर बंद होते. आता गंगेची पूजा गंगोत्रीपासून १८ कि.मी. दूर ‘मुखवा’ या ठिकाणी होते. साधारण अक्षयतृतीयेला म्हणजे एप्रिल महिन्याच्या शेवटी मंदिर परत उघडले जाते. हिमालयातील अती उंचीवरील सर्वच मंदिरे हिमवृष्टीमुळे हिवाळ्यात बंद असतात. त्यामुळे या परिसराला भेट ९६/ हिमशिखरांच्या सहवासात देण्याचा काळ म्हणजे मे ते ऑक्टोबर महिना! विशेषतः ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात हिमालयातील निसर्ग बहरून जातो.
गंगोत्री हे अतिशय रमणीय स्थळ आहे. निसर्गाचा एक अप्रतिम आविष्कार या ठिकाणी अनुभवायला मिळतो. हरिद्वार, ऋषीकेश, उत्तरकाशी इ. ठिकाणाहून गंगोत्रीसाठी नियमित बससेवा उपलब्ध आहे. सर्व प्रवासी सोयी-सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यमुळे खूप भाविक/प्रवासी या ठिकाणी येतात. खरंतर या ठिकाणी दोन-तीन दिवस मुक्काम करून हा सर्व परिसर, निसर्ग डोळस वृत्तीने पहायला हवा. भटकायला हवा. निरखायला हवा. भाविक म्हणून येथे येऊन दर्शन करण्यात पुण्यलाभ होतही असेल पण डोळस वृत्तीने केलेली केवळ गंगोत्रीतीलच नव्हे तर हिमालयात कुठेही केलेली भटकंती ही खूप ज्ञान देते हे निश्चित! ते किती, काय व कसे घ्यायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे!
गोमुखला जाण्यापूर्वी गंगोत्रीतील केलेला एक-दोन दिवसांचा मुक्काम आपल्यासाठी फार हिताचा ठरतो. त्यामुळे उंचीवरील वातावरणाची आपल्या शरीराला सवय होते व पुढचा प्रवास खूप सुकर होतो.
आज खूप लोक गोमुखला जातात पण जाताना ते पर्यावरणाविषयी काहीच विचार करीत नाहीत. त्यामुळे या परिसरावर प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे. या गोष्टी विचारात घेऊन शासनाने गोमुखला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येवर प्रतिबंध घातले आहेत. मर्यादित प्रवाशांना आता गोमुखला जाण्याची परवानगी दिली जाते.
गंगोत्री ते गोमुख हा १८ कि.मी.चा पायी प्रवास आहे. या पायी प्रवासात अपरिहार्यपणे लाभणारे निसर्गाचे सान्निध्य रोजच्या निरसलेल्या आयुष्याला वेगळ्या शक्तिस्त्रोताने भारून टाकते. खऱ्या अर्थाने हिमालयाची आपल्याशी ओळख करून देणारा हा प्रवास आहे. गंगोत्रीपासून साधारण २ कि.मी. वाटचालीनंतर गंगोत्री राष्ट्रीय उद्यानाची हद्द सुरू होते. गोमुखचा समावेश या राष्ट्रीय उद्यानातच होतो. थोडे पुढे गेल्यावर फलहारी बाबांचा आश्रम येतो. जवळच प्रभू रामचंद्रांचे एक सुरेख मंदिर आहे. साधारण ८ कि.मी. चालीनंतर चीड वृक्षांच्या सावलीत वसलेली चीडवासा ही वस्ती येते. हा सर्व परिसर वनौषधींनी समृद्ध आहे. येथे आढळणाऱ्या अरच्या नावाच्या झाडपाल्याच्या रसाने जखमा बऱ्या होतात, वेदना, कळा थांबतात. तर रेकच्या, चुडू इ. वनस्पती खाण्यासाठी वापरतात.
देवदार वृक्षापाशी टरपेंन्टाईनसारखा वास दरवळत असतो. या वृक्षात राळेचे प्रमाण खूप असते. (चिडवासाची उंची आहे ३६०० मीटर्स.) चिडवासा या ठिकाणी निवासाची सोय होते.
चिडवासा सोडता सोडता वनराई निरोप घेते. आता छोटी झुडपे दिसू लागतात. साधारण अडीच कि.मी. चालल्यावर पुढची १ कि.मी. चाल धोकादायक आहे कारण या पट्ट्यात भुस्खलनाचा धोका आहे. अचानक माती, दगडधोंडे गडगडत खाली येतात. त्यामुळे चालताना अतिशय सावधगिरी बाळगावी लागते. तशा धोक्याच्या सूचना देणारे फलक जागोजागी लावले आहेत, पण चालताना सावध असणे अतिशय गरजेचे आहे. हा पट्टा पार पडल्यावर साधारण १ कि.मी. अंतरावर ‘भोजवासा’ येते. पूर्वी या ठिकाणी भूर्ज वृक्षाचे अरण्य होते. भूर्ज वृक्षांच्या सालीचा लेखनासाठी कागदासारखा वापर केला जात असे पुराणकाळात ग्रंथ-पुराणे भूर्जवृक्षाच्या सालीवर लिहिली जात. विशेष म्हणजे या सालीला वाळवी/कसर लागत नाही. आज मात्र भोजवासात हे वृक्ष तुरळकच नजरेस पडतात. भोजवासाला शासनाने हवामानाचा अंदाज घेणारे केंद्र स्थापले आहे. होणारी हिमवृष्टी व तापमानातील बदल यांचा अभ्यास करून नद्यांच्या पात्रात किती पाणी उपलब्ध होईल याचे निदान येथे केले जाते. (भोजवासाची उंची आहे ३७९२ मीटर्स.)
भोजवासा या ठिकाणी गढवाल मंडलचे टूरिस्ट रेस्ट हाऊस आहे. तसेच लालबाबांचा आश्रम आहे. या दोन्ही ठिकाणी राहण्याची व जेवणाची चांगली व्यवस्था आहे. भोजवासाहून हिमाच्छादित भगीरथ शिखरे, शिवलिंग व इतर पर्वतराजीचे फार सुंदर दर्शन होते.
भोजवासा ते गोमुख अंतर ५ कि.मी. आहे. त्यातील शेवटचे १ कि.मी. अंतर अजस्त्र दगडांच्या राशीतून पार करावे लागते आणि मग समोर उभी राहते बर्फाची भिंत! निळसर रंगाच्या या भिंतीच्या तळाशी असलेल्या बर्फाच्या गुहेतून पवित्र गंगेचा प्रवाह प्रकट होतो हेच ‘गोमुख’
गोमुखाचे दर्शन म्हणजे एक विलक्षण अनुभव आहे. पवित्र गंगेच्या उगमापाशी मी पोहचलो ही कल्पनाच मनामध्ये एक आत्मिक आनंद निर्माण करते. साऱ्या श्रमाचे चीज झाल्यासारखे वाटते. साधारण २५०-३०० फूट लांबीच्या ५०-६० फूट उंचीच्या या बर्फाच्या भिंतीतून मधूनच हिमखंड कोसळतात. दुपारी बर्फ वितळण्याचा वेग वाढतो. अनेक वेळा या बर्फात अडकलेल्या दगडांना मुक्ती मिळते व गडगडत ते खाली पडतात. तेव्हा मोठा आवाज येतो व पोटात धस्स होते. उगाचच काळजी वाटू लागते.
अशा ठिकाणीसुद्धा काही भाविक गंगेच्या या बर्फाळ पाण्यात स्नान करताना दिसतात. खरोखरच त्यांचे कौतुक वाटते. या बर्फाळ पाण्याचा स्पर्शसुद्धा दंश केल्यासारखा भासतो. अशा या अतिथंड हिमजलात स्नान करणे म्हणजे एक धारिष्ट्यच आहे. यामागे कारण एकच – ‘अविरल श्रद्धा!’
गोमुखाहून २१,००० फूट उंचीपेक्षा जास्त उंचीच्या भगीरथ १/२/३ शिखरांचे फार सुंदर दर्शन होते. विशेषत: संध्याकाळी मावळत्या सूर्याची किरणे या व सभोवतालच्या हिमशिखरांवर पडतात तेव्हा तर या परिसराचे सौंदर्य वर्णन करणे हे खूप अवघड आहे.
गोमुख ओलांडून डाव्या बाजूने १५,००० फूट उंचीवरील तपोवनकडे जाता येते. हे अंतर साधारण ६ कि.मी. आहे पण रस्ता नसल्याने तसेच वाटेतील अवघडपणा व ओलांडावे लागणारे ग्लेशिअर्स लक्षात घेऊन माहितगार वाटाड्या सोबत घेणे अत्यंत आवश्यक आहे. हा सर्व भाग पूर्ण वैराण आहे. बऱ्याच वेळा हा परिसर हिमाच्छादित असतो. या ठिकाणाहून भगीरथ, शिवलिंग, वासुकी, सुदर्शन, सुमेरू इ. पर्वतराजीचे फार सुंदर लावण्य पाहावयास मिळते. तपोवनातून आकाशात घुसलेली उंच शिखरे व आकाश अगदी जवळ आल्यासारखे वाटते. तपोवनच्या पूर्वेकडील एका टोकावरून गंगोत्री ग्लेशिअर नजरेस पडतो. सर्वत्र पांढऱ्या शुभ्र बर्फाचा गालिचा व त्यावर उन्हाचे सोनशिंपण, मध्येच हिरव्या-निळ्या पाण्याने चमकणारी छोटी तळी! अचानक बर्फात फट पडते व त्यातून पाणी पाझरू लागते. बघता बघता त्या ठिकाणी छोटेसे तळे तयार होते. निसर्गाचे हे भव्य-दिव्य रूप मनाला थक्क करून टाकते.
हिमालयात लहान-मोठे असे जवळजवळ १५,००० ग्लेशिअर्स असून हिमालयाच्या एकूण व्याप्तीच्या १७ टक्के भाग या ग्लेशिअर्सनी व्यापला आहे. या ग्लेशिअर्समध्ये अंदाजे १२,००० घन कि.मी. पाण्याचा साठा उपलब्ध आहे. ध्रुवीय प्रदेश वगळता जगातील हा सर्वात मोठा जलसाठा आहे. गंगोत्री ग्लेशिअर मध्य हिमालयातील सर्वात मोठा ग्लेशिअर असून त्याची लांबी जवळजवळ ३० कि.मी. तर रुंदी २ ते ४ कि.मी. आहे. त्यात अंदाजे २० घन कि.मी. व बर्फाचा साठा उपलब्ध आहे. रक्तवर्ण, चतुरंगी, कालिंदीभमक, कीर्ती व इतर १८ लहान-मोठ्या ग्लेशिअर्सचा गंगोत्री ग्लेशिअरमध्ये समावेश होतो. या सर्व ग्लेशिअर्सनी चौखंबा शिखरापासून गोमुखपर्यंत साधारण २६० कि.मी. क्षेत्र व्यापले आहे. या परिसरात शिवलिंग, मेरू, भगीरथ, गंगोत्री समूह इ. नामांकित पर्वतशिखरे असून गिर्यारोहकांना ती आव्हाने आहेत. या पर्वतशिखरांचा परिसर गंगोत्री ग्लेशिअरचा हिमस्रोत आहे.
पण आज ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येमुळे हिमालयातील सर्वच ग्लेशिअर्स धोक्यात आहेत. NASA, United States Geological Survy (USGS), National Snow & Ice Data Center (NSIDC) मधील तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार हिमालयातील सर्वच ग्लेशिअर्स वेगाने वितळत आहेत. हिमालयातील बर्फाळ प्रदेशाने आज व्यापलेले ५,००,००० चौ.कि.मी.चे क्षेत्रफळ २०३० साली १,००,००० चौ.कि.मी. होईल तर २०३५ साली सर्व ग्लेशिअर्स वितळून जातील, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्याचा फार मोठा परिणाम जागतिक हवामानावर, पर्यावरणावर तसेच मानवी जीवनावर होईल. उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांवरून व इतर अनुमानावरून गेल्या २०० वर्षांत गंगोत्री ग्लेशिअर २ कि.मी. मागे सरकला आहे, असे अनुमान आहे.
गंगोत्री-गोमुखाचा सर्व परिसर जैविक विविधतेने नटला आहे. दुर्मिळ वनस्पती व प्राण्यांच्या संरक्षणासाठी या परिसराला १९८९ साली राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला. गंगोत्री राष्ट्रीय उद्यानाने १५५३ चौ.कि.मी. क्षेत्र व्यापले आहे. १८०० मीटर्स उंचीपासून ७,००० मीटर्स उंचीपर्यंत पसरलेला हा भूप्रदेश घनदाट जंगले, खोल दऱ्या, वेगवान प्रवाह, हिमाच्छादित पर्वतशिखरे इ. सौंदर्य लेणी लेवून नटला आहे. चीड, पाईन, देवदार, होडोडेड्रान व इतर असंख्य दुर्मिळ वनस्पती या परिसरात आढळतात. वाघ, अस्वले, हिमचित्ता, कस्तुरीमृग, भरल, थर इ. ३० प्राण्यांची व १५० पक्षी जातींची या परिसरात नोंद झाली आहे.
शांतता जिथे थकून निवारा शोधत आलेली असते ती या प्रवासात सापडते. हे शांततेचे राज्य किती लोभस, गोजिरवाणे आणि सुखावणारे असते याची अनुभूती येते. स्वत:चा पायरव व श्वासाचा आवाजही नकोसा वाटायला लागतो. मन मुक्तीसाठी थोर महात्मे हिमालयाचा का ध्यास घेतात या प्रश्नाचे अचूक उत्तर आता मिळते आणि मग आपले आपल्यालाच कधीsच पाठीमागे फिरू नये, असे वाटू लागते.
– प्रकाश लेले
Leave a Reply