एक राजा होता. त्याला मूलबाळ नव्हते. त्याला आपला उत्तराधिकारी शोधण्याची एक नामी युक्ती सुचली. त्याने एक सुंदर महाल बनविला. त्याचे प्रवेशद्वार अगदी भव्य बनविले. राजाने अशी दवंडी पिटली की त्या प्रवेशद्वारावर त्याने गणिताचे एक सूत्र लिहून ठेवले आहे. जो कोणी त्या सूत्राची उकल करेल त्याला फक्त हे प्रवेशद्वार उघडता येईल. तसेच प्रवेशद्वार उघडणाऱ्या व्यक्तीला राजाचा उत्तराधिकारी होता येईल.
अनेक लोक, गणितकार, ज्योतिषी राजाकडे आले. काहीजण पुरातन गणिताचे ग्रंथ घेऊन आले. प्रत्येकाने आपापल्या परीने राजाने लिहीलेले गणिताचे सूत्र सोडविण्याचा प्रयत्न केला. कोणालाच ते सूत्र सोडवायला जमले नाही.
राजाने एक ठराविक मुदत दिली होती ज्यात हे सूत्र सोडवायचे होते. त्याने दिलेल्या मुदतीचा काळ संपत आला तरी ते सूत्र सोडवायला कोणाला जमले नाही. आता शेवटचे तीन दिवस उरले होते.
त्या दिवशी तीन व्यक्ती राजाकडे आल्या. त्यातले दोन महान गणितकार होते. तिसरी व्यक्ती संन्यासी होती. तिघेही म्हणाले आम्ही गणित सूत्राची उकल करायचा प्रयत्न करतो. राजाने त्यांना संमती दिली.
संन्यास्याने उरलेल्या दोघांना सांगितले की तुम्ही मोठे गणितकार आहात. तुम्ही अगोदर त्या सूत्राची उकल करा. तुमचे प्रयत्न झाल्यावर जर तुम्हाला त्यात यश आले नाही तर मी प्रयत्न करेन.
ते दोघे प्रवेशद्वारापाशी जाऊन राजाने लिहीलेले गणित सूत्र वाचू लागले. आपल्या बरोबर असलेल्या गणिताच्या ग्रंथातून त्याची काही उकल होते का याचा अभ्यास करु लागले. तोवर संन्यासी डोळे मिटून ध्यानस्त बसला होता.
बराच वेळ खटपट केल्यावर दोघेही गणितकार राजापाशी आले आणि म्हणाले “महाराज, आम्ही खूप प्रयत्न केला. आम्हाला तुमचे सूत्र उकलता आले नाही. तरी क्षमस्व.”
राजाने मग त्या संन्यास्याला पाचारण केले. “आता तुम्ही प्रयत्न करा. बघा तुम्हाला जमते का हे सूत्र उकलायला.” संन्यास्याने पुन्हा क्षणभर डोळे मिटले आणि मग तो प्रवेशद्वाराजवळ गेला. त्याने राजाने लिहीलेले सूत्र काळजीपूर्वक वाचले. नंतर त्याने प्रवेशद्वाराला एक हलका धक्का दिला आणि काय आश्चर्य! प्रवेशद्वार सहज उघडले गेले. बघणारे सर्वजण चकीत झाले. राजाने संन्यास्याला विचारले “मोठ्या मोठ्या गणितकारांना जे जमले नाही ते तुम्ही कसे सोडवून दाखविलेत? केवळ एका हलक्या धक्क्याने हे प्रवेशद्वार कसे उघडले? ”
संन्यासी हसला आणि म्हणाला “माझ्या अगोदर जे दोन अतिरथी हे गणित सूत्र उकलायचा प्रयत्न करत होते त्यावेळी मी ध्यानस्थ बसलो होतो. ध्यानधारणा करीत असताना मला असे ऐकू आले की अगोदर याचा शोध घे की खरोखरच प्रवेशद्वारावर कुठले गणित सूत्र आहे अथवा नाही. ते आहे हे कळल्यानंतरच ते सोडवायचा प्रयत्न कर. त्यानुसार मी ते सूत्र वाचून प्रथम त्यात काही विशेष आहे का याचा शोध घेतला. प्रवेशद्वाराला हलकेच लोटल्यावर ते सहज उघडले. याचा अर्थ प्रवेशद्वारावर कुठलेच गणित सूत्र नव्हते.”
आपणही अनेक बाबतीत एखादा प्रश्न किंवा अडचण आहे असे गृहित धरुन त्याचा त्रास करुन घेतो. ते सोडविण्यासाठी जंग जंग पछाडतो. प्रत्यक्षात बऱ्याचश्या प्रश्नांची सोपी उत्तरे आपल्याला शोधली तर सापडतात. मात्र आपण प्रश्न सोडविण्याच्या चिंतेने एवढे ग्रस्त असतो की आपण त्याची सोपी उत्तरे शोधतच नाही. संन्यास्याने दिलेला कानमंत्र आपणही लक्षात ठेवायला हवा.
— नीला सत्यनारायण
अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.
Leave a Reply