गणितयोगी डॉ. श्रीराम अभ्यंकर यांचा जन्म २२ जुलै १९३० रोजी उज्जैन येथे झाला.
डॉ. श्रीराम अभ्यंकर यांना गणिताचे बाळकडू त्यांचे वडील शंकर अभ्यंकर यांच्याकडून मिळालेले होते. त्यांचे वडील हे मध्य प्रदेशातील उज्जन व ग्वाल्हेर येथे गणिताचे प्राध्यापक होते. डॉ. श्रीराम अभ्यंकर यांचा पुण्याशी अतूट संबंध होता. अनेकदा ते येथे त्यांच्या बंगल्यात वास्तव्यास असत व येथे आले की, मुलांना गोळा करून गणित शिकवण्याचा मोह त्यांना कधीच आवरत नसे. इतके त्यांचे गणितावर व अध्यापनावर प्रेम होते. पुण्यातील भास्कराचार्य प्रतिष्ठान या गणित अभ्यासाच्या संस्थेची स्थापना डॉ. श्रीराम अभ्यंकर यांनी केली होती. पुणे हे भारतातील गणित शिक्षणाचे केंद्र व्हावे अशी त्यांची मनोमन इच्छा होती. मुलांना गणित हे मराठी भाषेतून शिकता आले पाहिजे असे त्यांना वाटत होते. गणिताच्या अभ्यासक्रमासाठी प्रत्येक वर्गाकरिता वेगवेगळी पुस्तके असतात त्याऐवजी एकच पुस्तक असावे म्हणजे ज्याला जसे शक्य होईल तसे तो कुठल्याही इयत्तेच्या पातळीवरील गणिताचा अभ्यास हवा तेव्हा करू शकेल असे त्यांना वाटत असे. गुरुकुल पद्धतीची शिक्षण पद्धती त्यांना आवडत असे. डॉ. श्रीराम यांनी लीलावती या गणितावरील ग्रंथाची अनेक पारायणे केली होती. टाटा मूलभूत संशोधन संस्था व इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस या संस्थांत गणिताविषयी चांगले संशोधन सुरू असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. त्यांचे वडील डॉ. शंकर अभ्यंकर हे त्यांचे गणित विषयात पहिले आदर्श होते. नंतर न्यूटन, गॅल्वा व जॅकोबी यांच्या गणिती संशोधनाचा प्रभाव त्यांच्यावर होता. हार्वर्ड विद्यापीठात ऑस्कर झारिन्स्की यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गणितात विद्यावाचस्पती ही पदवी मिळवली. ‘लोकल युनिफॉर्मायझेशन ऑन अल्जिब्रिक सरफेसेस ओव्हर मॉडय़ुलर ग्राउंड फील्ड्स’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. बुलियन अल्जिब्रा विषयात त्यांनी केलेल्या गणिती संशोधनाचा वापर अमेरिकी नौदलात करण्यात आला होता. श्रीराम अभ्यंकर यांनी कॉन्जेंक्चर ऑफ फायनाइट ग्रुप थिअरी हा महत्त्वाचा गणिती सिद्धांत मांडला होता. बीजगणितीय भूमिती हा त्यांचा संशोधनाचा मुख्य विषय होता. १९६७ मध्ये ते पडर्य़ू विद्यापीठात गणिताचे मार्शल प्रोफेसर झाले. अखेर पर्यत ते अमेरिकेतील पडर्य़ू विद्यापीठात गणिताचे मार्शल प्रोफेसर म्हणून कार्यरत होते. तेथील संगणक विज्ञान व औद्योगिक अभियांत्रिकी शाखेतही ते प्राध्यापक होते. अखेरच्या काळात ते कॉम्प्युटेशनल अँड अलगॉरिथमिक अल्जिब्रिक जॉमेट्री व जॅकोबियन कूटप्रश्न या विषयांवर गणिती संशोधन करीत होते. गणितयोगी श्रीराम अभ्यंकर हे त्यांचे चरित्र आहे. लेखीका कविता भालेराव. डॉ. श्रीराम अभ्यंकर यांचे निधन २ नोव्हेंबर २०१२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
A short introduction of agreat Indian mathematician. Good initiative.
Dr. Arun Muktibodh, Nagpur.