नवीन लेखन...

गणपती

आम्ही दरवर्षी गणपतीचा उत्सव कोकणातल्या आमच्या न्हैचिआड गावी साजरा करतो. गणपतीच्या साधारणतः दोनतीन महिने आधी आमच्या घरी गणपतीची गडबड सुरु होते. ह्यावर्षी गणपती अमुक अमुक तारखेला आहेत, तेव्हा गावी जाण्यासाठी कोण कधी निघणार, कुठल्या गाडीने निघणार वगैरे चर्चा आमच्या घरी सुरु होते. घरी म्हणजे आमच्या चुलत नातेवाईकांमध्ये- रेग्यांमध्ये आम्ही सर्व चुलत बंधू एकत्ररित्या घरचा गणपती गावी साजरा करतो. यानिमित्ताने सर्व रेगे कुटुंबिय एकत्र जमतो, देवाची यथासांग पूजा पार पडते, हास्यविनोद घडतो, चार दिवस मजेत घालवून आम्ही मुंबईला परततो. देवाची पूजा झाल्याने मन शांत होतं, प्रसन्न होतं. मुंबईचे ताणतणावाचे दिवस सहन करण्यासाठी आम्ही पुन्हा सिद्ध होतो.

गावी पोहोचल्यानंतर प्रथम गणपतीची तयारी सुरु होते. पहिलं काम देवखोली साफ करण्याचं. विहिरीवरुन पाणी काढून संपूर्ण देवखोली धुतली जाते, स्वच्छ केली जाते. त्यानंतर बाजारहाट. गणपतीसाठी घरात असंख्य गोष्टी लागतात. त्याची यादी करुन त्या बाजारातून आणव्या लागतात. आमचं गाव तसं छोटसं खेडच आहे. मुख्य बाजार भरतो तो शिरोडयाला अथवा वेंगुर्ल्याला. गणपतीच्या दोनतीन दिवस आधी या दोन्ही बाजारांमध्ये आजूबाजूच्या गावांतले हजारो लोक जमतात. गणपतीच्या सजावटीसाठी लागणारं माटवीचं सामान, स्वयंपाकाच्या भाज्या, फळं, बुंदीचे लाडू, खाजं, फुलं, फुलांचे हार, वेण्या, उमा महेशाच्या पूजेसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पती, नाडापूडी अशा असंख्य गोष्टींची यादी सोबत असते. त्या वस्तू खरेदी करत बाजार पालथा घातला जातो. त्यानंतर थकवा घालविण्यासाठी भजी आणि चहाचा खुराक घेऊन आम्ही घरी परततो.

घरी परतल्यावर प्रथम देवखोली सजविण्याचं काम सुरु होतं. गणपतीच्या मूर्तीच्या वर काठयांची चौकट लटकत असते. तिला माटवी म्हणतात. आंब्याचे टाळ आणि विविध रंगांची फळं व भाज्या अडकवून ही माटवी सजवली जाते. त्यानंतर चमचमत्या छोटया दिव्यांची आरास. देवखोलीच्या दारावर कागदांच्या फुलांची आणि रंगीत दिव्यांची तोरणं चढतात. सजावटीची तयारी पूर्ण होते. आत स्वयंपाकघरात बायकांची धांदल उडालेली असते. हरतालीकेपासून तीन दिवस सोवळ्याचा स्वयंपाक असतो. हरतालीकेला गुळाच्या पातोळ्यांचा नैवेद्य असतो. चतुर्थीला २१ मोदकांचा नैवेद्य, पंचमीला साखर भात असा ठरलेला नैवेद्य दाखवायचा असतो. त्यादिवशी पंचखाद्यपण करायचं असतं. आरतीनंतर प्रसाद काय वाटायचा याबाबत सगळ्यांची मतं घेतली जातात. हरतालीकेच्या आदल्या दिवशी कडधान्य भिजत घालणं, नंतर भाज्या चिरण्याचं काम अशी कामं सुरुच असतात.

सर्व तयारी सिद्ध झाल्यावर गणपतीच्या आदल्या दिवशी गणपतीच्या मूर्तीचं घरात आगमन होतं. देवखोलीत चौरंगावर गणपती विराजमान होतो. चतुर्थीचा उत्सव सुरु होतो!

चतुर्थीच्या दिवशी सकाळी भटजी बुवा घरी येतात. घरातल्या पुरुषांपैकी कुणीतरी एक सोवळं नेसून तयार बसलेला असतो. शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रांच्या घणघणीत उच्चारांत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. त्यानंतर एकादष्ण्या. अथर्वशिर्ष अकरा वेळा म्हंटल्याने एक एकादष्णी पूर्ण होते. घरातल्या मंडळींनी अशा एकादण्या आंगवलेल्या असतात. याशिवाय ठरलेल्या वार्षिक एकादष्ण्या. आम्ही लहान असताना जवळजवळ तासभर हा एकादष्ण्यांचा कार्यक्रम रंगत असे. आता भटजींची पूजा सांगतानाच घाई उडालेली असते. एका घरची पूजा आटोपून त्यांना दुसऱ्या दहा घरी धावायचं असतं. सहाजिकच एकादण्या हा प्रकार मागे पडला. रीत म्हणून आमच्या आम्हीच एखाददुसरी एकादष्णी म्हणतो आणि गणपतीची पूजा सिद्ध होते. त्यानंतर एका ताम्हणामध्ये पाण्यावर लालकुंकू टाकून त्यात सजलेल्या गणपतीचं दर्शन घेण्याचा प्रघात आहे. फुलांनी सजलेलं, दिव्यांच्या आरासांनी उजळलेलं श्रीगणपतीचं हे प्रसन्न दर्शन मनाला अतीव समाधान देऊन जातं.

गावातल्या अन्य रेगे कुटुंबियांच्या पूजा उरकल्या की एकत्रित आरत्यांचा जल्लोष सुरु होतो. कोकणातल्या आरत्यांच्या चाली मुंबईतील प्रचलित चालींहून वेगळ्या आहेत. एकाने एक आरती म्हटली की दुसऱ्याने दुसरी आरती म्हणायची अशी ही स्पर्धा मग रंगात येते. एकजात सर्वांच्या सर्व आरत्या पाठ. एकूण पाच घरात अशा आरत्या रंगतात. आरत्यानंतर मंत्रपुष्पांजली. ‘तन्नोदंती प्रचोदयाऽऽत’ च्या गजराने या आरत्यांची सांगता होते. त्यानंतर नैवेद्यांची पाने मांडली जातात. पंचपक्वानांचा नैवेद्य देवांना अर्पण केला जातो. नैवेद्य प्राशन केल्यावर थोडा विसावा मिळतो. तृप्तीचे ढेकर देत सर्वांची वामकुक्षी सुरु होते.

सायंकाळी पाचच्या दरम्यान गावकऱ्यांच्या भजनाची गडबड सुरु होते. संपूर्ण गावातले गावकरी एकत्ररित्या सर्वांच्या घरी जाऊन भजनं म्हणतात भजनाला तबलापेटीची साथ असते. टाळ आणि झांजाच्या गजरात भजन सुरु होतं. गावकऱ्यांचा एकत्रित आवाज भजनात तल्लीन होऊन जातो. उत्तरोत्तर लय वाढत जाते. भजनी ठेक्यावर सर्वांचे पायही ताल धरतात. एका सूरात नाचत, गात भजनं सादर केली जातात. भान हरपून मी या भजनांचा आस्वाद घेत कडेला उभा असतो. भजनं सादर करताना गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस भाव मी टिपतो. छोटी छोटी मुलं आणि थकलेले वृद्ध यांच्या अंगात संचारलेला जोष मला वेगळीच अनुभूती देऊन जातो. मी उत्स्फूर्तपणे गांवकऱ्यांच्या भजनात सामील होतो.

पंचमीच्या दिवशी सकाळी पूजेची, आरत्यांची आणि नैवेद्याची पुनरावृत्ती होते. संध्याकाळच्या आरतीनंतर देवाला गाऱ्हाणं घातलं जातं. सर्वांच्या ख्याली खुशालीची आणि क्षेमकल्याणाची याचना झाल्यावर चौरंग हलवला जातो. गणपती आपल्या गावाला जायला निघतो व सर्वांचे डोळे पाणावतात. जगातलं विज्ञान काहीही सांगो, पण यावेळी मूर्तीच्या चेहऱ्यावरही खरोखरच नाराजी उमटते. ‘पुनरागमनायचं’ च्या अक्षता टाकून देवाच्या हातावर दही ठेवलं जातं. देवखोलीतला चौरंग खळ्यात येतो. बाहेर गावातले सर्वांच्याच घरातले गणपती विसर्जनाला निघतात. ‘मोरयाऽऽऽ मोरयाऽऽऽ’च्या ललकाऱ्या गावभर उमटत असतात. रांगेने गावातले सर्व गणपती तळ्याच्या वाटेने निघतात. शेतातल्या बांधातून मार्ग काढत गणपतींची रांग पुढे पुढे सरकते. सूर्य मावळतीला निघालेला असतो. आकाशात सांजरंग उमटत असतात. दूरवर हिरव्याकंच डोंगरांच्या रांगा तटस्थ उभ्या असतात. शेतातल्या पिकांतून वाट काढत गावातले शंभरएक गणपती तळ्यावर पोहोचतात. तिथे संपूर्ण गावाची एकत्रित आरती होते. संपूर्ण गावाच्या वतीने गाऱ्हाणं घातलं जातं. खाली उतरलेल्या अंधारात गणपतींच्या मूर्तीसमोरील कापराच्या वाती सौम्य प्रकाश देत उजळत असतात.

‘नवल होत आहेऽऽ आरतीऽऽ देवाधिदेवा ऽऽ ऽऽ’ भजनाने विसर्जनाचा सोहळा संपन्न होतो. गावातले तरणेताठे गडी भराभर मूर्ती पाण्यात शेळवतात. गणपतीचा उत्सव संपतो. अंधारात वाट चाचपडत आम्ही घरी परततो.

– सुनील रेगे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..