टिळक तुम्ही फिरुन एकवार
या हो जन्म घेऊन
हव तर ब्रम्हदेवाकडे शिफारस तुमची
मी देतो पाठवून
किती उदात्त हेतूने गणेशोत्सव
तुम्ही केला होतात सुरु
पण हल्ली त्याच स्वरुप पाहून
मीच लागलोय गुदमरु
मोठया आतुरतेने मी वाट पाहायचो
भाद्रपदातल्या चतुर्थीची
वाट आता पाहावी लागते
अनंत चतुर्दशीची
काय सांगू टिळक तुम्हांला?
संयोजकांनी मलाही केलय कार्पोरेट
उत्सवांत माझ्या दर्शनाचे
चढते झालेत रेट
गल्लोगल्ली स्थापना माझी
मंडपी बेगडी आरास,
सोन-चांदी अंगावरती
पुढयांत धनाची रास
बुध्दीदायक मी खर तर
बुध्दी देणेच माझ्या हाती,
इथल्या मागण्या नवस ऐकून
माझी कुंठीत झालेय हो मती
टिळक ह्यावर कळस म्हणजे
उत्सवांत खंडणीची वर्गणीरुपी दहशत
वर चोवीस तास माझ्या भोवती
पोलिसांची वसाहत
असली जीवघेणी भक्ती
नाही हो आता सोसवत,
विसर्जनाच्या मिरवणुकीतला
उन्माद नाही बघवत
म्हणून तर म्हणतोय टिळक तुम्हीं
घ्यावा अवतार फिरुन
अन् समाजकारण हाती घेऊन
हे बाजारीकरण टाका संपवून
उत्सवातल राजकारण टाका चिरडून
टिळक तुम्ही या हो
जन्म घेऊन, या हो जन्म घेऊन
— सौ. अलका वढावकर
Leave a Reply