(व्यास क्रिएशन्सच्या प्रतिभा दिपोत्सव २०१६ – जयंतराव साळगांवकर ह्यांनी लिहिलेला हा लेख)
गणेशोत्सव हा मराठी माणसाच्या चित्तसागराला आनंदाची भरती आणणारा महोत्सव आहे. गणेशोत्सवात मराठी माणूस शरीराने आणि मनानेही रंगून जातो. महाराष्ट्रातल्या कुठल्याही खेड्यात, कुठल्याही शहरात, कुठल्याही गल्लीबोळात गणेशोत्सवाच्या १० दिवसांत उत्साहाला नुसते उधाण आलेले असते. मराठी मातीत रुजलेला, मराठी मनाला मोहवून टाकणारा, मराठी मातीत रुजलेला, मराठी मनाला मोहवून टाकणारा, मराठी माणसाच्या जीवनाशी सर्वांगाने समरस झालेला, असा हा गणेशोत्सव! महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी याच गणपतीचा आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याचा शुभारंभ केला.
पेशव्यांचे आराध्यदैवतच मुळी गणपती हे होते. असा हा गणपती पिढ्यान् पिढ्या, शतकानुशतके मराठी माणसाच्या हृदयसिंहासनावर विराजमान झाला आहे तो कशामुळे? मराठी माणसाला गणपती एवढा जवळचा वाटण्याचे कारण काय?
दोन व्यक्तींचे परस्परांशी चांगले ऋणानुबंध जमतात, प्रस्थापित होते आणि दोघांचेही जीवनप्रवाह कोणत्या-ना-कोणत्या स्वरूपात एकमेकांशी समांतर होऊन जातात. त्यावेळी त्या दोघांमध्ये आवडी-निवडीचे समान दुवे हमखास असतात. विवाह जमविताना वधु-वरांची कुंडली एकमेकांशी जुळते किंवा नाही हे पाहाण्याचा पूर्वापार पायंडा आहे. वधु-वरांचे स्वभावविशेष एकमेकांशी कितपत जुळतात, दोघांच्याही आवडी-निवडी परस्परांपासून भिन्न दिशेने चालणाऱ्या आहेत किंवा काय, परस्परांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सारखा आहे की वेगवेगळा आहे, अशा स्वरूपाचे ज्ञान कुंडलीच्या आधारे करून घ्यावे आणि त्या ज्ञानाचा पडताळा वधु-वरांच्या पत्रिकामेलनात पाहावा अशीच मूळ विचारसरणी या कुंडली पाहाण्यामागे होती. आता त्याला काहीसे विकृत स्वरुप मिळाले असले तरी प्रत्यक्षात पत्रिकेवरुन स्वभाव जाणणे आणि स्वभावावरुन एकमेकांशी एकमेकांचे कितपत जुळेल ह्याचा आडाखा तयार करणे असाच हा मार्ग होता.
• समान आवड आवश्यक!
दोन व्यक्तींचे एकमेकांशी जुळण्यासाठी, दोघांमध्ये काही साम्य असणे, त्यांच्या आवडींमध्ये सारखेपणा असणे हे आवश्यक आहेच. समजा, तुम्हाला टी.व्ही.वरचे चित्रगीत किंवा एखादी चित्रमालिका पाहाण्याची आवड आहे आणि तुमच्या कोण्या मित्राला मात्र टी.व्ही. बद्दल वा टी.व्ही.च्या मालिकेबद्दल घृणा आहे, तिरस्कार आहे, तर नेमक्या अशा स्थितीत तुमचा मित्र तुमच्या ऐन आनंदाच्या क्षणीच दुसरे काहीतरी बोलून तुमच्या रंगाचा बेरंग करण्याची शक्यता असते आणि अशा मित्राबरोबर तुमचे फार काळ पटू शकत नाही. दारू पिणाऱ्या मित्रांमध्ये एकच मित्र दारू न पिणारा असला तर काही कालावधीनंतर त्याची आपोआपच त्या मित्रमंडळींतून हकालपट्टी होते किंवा तो त्या सगळ्यांच्या चेष्टेचा, टिंगलीचा विषय होतो. आवडी समान असल्याशिवाय मैत्री होऊ शकत नाही, एवढाच ह्या सगळ्या नमनासाठी खर्च केलेल्या घडाभर तेलाचा मथितार्थ!
• महाराष्ट्राचे आवडते दैवत…
गणपती हे महाराष्ट्राचे आवडते दैवत आहे. गेली कित्येक शतके आपण मराठी लोक गणपतीला अनन्यभावे भजत आहोत. गणेशोत्सव हा मराठी माणसाच्या चित्तसागराला आनंदाची भरती आणणारा महोत्सव आहे. गणेशोत्सवात मराठी माणूस शरीराने आणि मनानेही रंगून निघतो. गुलाल उधळीत, लेझिमच्या किंवा वाद्यांच्या तालावर गणेशविसर्जनात आनंदाने सहभागी होणे ही प्रत्येक मराठी माणसाची जन्मजात आवड आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही खेड्यांत, कुठल्याही शहरात, कुठल्याही गल्लीबोळात गणेशोत्सवाच्या १० दिवसांत उत्साहाला नुसते उधाण आलेले असते. कोकणात घरोघरी गणपती आणले जातात. घरोघरी आणण्याच्या गणपतीचे प्रस्थ देशावर थोडे कमी असले तरी सार्वजनिक गणेशोत्सवातील गणपती महाराष्ट्राच्या इतर सर्व भागांत मात्र मोठ्या आनंदात, उत्साहात बसविले जातात, त्यांच्या आरत्या केल्या जातात, नैवेद्य दाखविले जातात आणि त्यांच्यासमोर विविध मनोरंजनाचे, करमणुकीचे कार्यक्रम सादर केले जातात.
असा हा गणेशोत्सव! मराठी मातीत रुजलेला, मराठी मनाला मोहवून टाकणारा, मराठी माणसाच्या जीवनाशी सर्वांगाने समरस झालेला! महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेड रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे आपले स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्यक्ष कार्याचा शुभारंभ केला तो पुण्यातील कसबा गणपतीचे आशीर्वाद घेऊनच! पुढे पेशव्यांनी अटकेपार झेंडे रोवले, प्रत्यक्ष दिल्लीचे तख्त फोडले तेसुद्धा गणरायापासून कृपाशीर्वादाचे बळ घेऊनच! पेशव्यांचे आराध्यदैवतच मुळी गणपती हे होते.
भारताच्या इतर भागांतही गणपती ही देवता पूजिली जाते हे खरे! पण बहुतेक ठिकाणी गणपती हा द्वाररक्षक आहे. उत्तरेकडे देवाच्या मंदिरासमोर किंवा गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूला गणेशमूर्ती स्थापिलेली दिसते. दक्षिणेतसुध्दा गणपती हे परिवारदैवत म्हणून मानले जाते. आपण जसे गणपतीला प्रमुख देवता मानून काही पूजा-अर्चा, प्रार्थना करतो तसा परिपाठ महाराष्ट्राबाहेर एवढ्या मोठ्या प्रमाणात दिसत नाही. संकष्ट चतुर्थीचे व्रत तर महाराष्ट्राइतके दुसरीकडे कुठेही इतपत भक्तिभावाने, इतपत श्रध्देने आणि इतपत महत्त्वपूर्ण रीतीने आचरले जात नाही. संकष्ट चतुर्थी हे केवळ महाराष्ट्रातच घरोघरी आचरले जाणारे व्रत आहे. सकष्टी चतुर्थीला महाराष्ट्रात जसे अनन्यसाधारण महत्त्व आहे, तसे महत्त्व भारताच्या इतर प्रांतांत आढळत नाही. असा हा गणपती पिढ्यान् पिढ्या, शतकानुशतके मराठी माणसाच्या हृदयसिंहासनावर विराजमान झाला आहे तो कशामुळे? मराठी माणसाला गणपती एवढा जवळचा वाटण्याचे कारण काय?
गणपतीच्या उपासनेला महाराष्ट्रात जे विशेष आणि ठळक महत्त्व मिळाले आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे गणपती हा महाराष्ट्राच्या आवडीचा, लोकप्रियतेचा आणि ममत्त्वाचा विषय आहे. तो तसा का झाला, ह्याचा थोडा विचार केला तर गणपतीच्या आणि महाराष्ट्रीयांच्या आवडी संपूर्णपणे एकमेकांच्या आवडीशी मिळत्याजुळत्या आहेत, असे प्रथमदर्शनीच आढळून येईल. महाराष्ट्रीयांच्या आवडीचे जे दोन प्रमुख विषय, राजकारण आणि नाट्य, तेच दोन विषय गणपतीच्याही आवडीचे आहेत. गणपती हा देवांचा सेनापती, तो राजकारणपटू म्हणूनच इतिहासात सर्वमान्यता पावला आहे. वेगवेगळ्या वेळी झालेले गणपतीचे २४ अवतार पुराणांतरी ग्रंथित केलेले आहेत. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण चतुर्थीला प्रत्येकी एक अवतार ह्याप्रमाणे २४ अवतारांची कथा रूढ आहे. ह्यापैकी सर्वांना माहीत असलेले प्रमुख अवतार दोन आहेत. शंकर-पार्वतीचा पुत्र गणपती, म्हणजे पार्वतीने स्वतःच्या अंगावरील मळापासून तयार केलेली मूर्ती हा गणपतीचा पहिला अवतार आणि कश्यप मुनीचा पुत्र ज्याने बालवयातच राक्षसांशी लढून राक्षस कुळाचा विध्वंस केला तो गणपतीचा दुसरा अवतार. महोत्कट नावाने त्याची कथा प्रसिध्द आहे. हे दोन अवतार आपल्याला जास्त माहीत आहेत. पार्वतीचा पुत्र म्हणून ज्या गणपतीला आपण ओळखतो त्या गणपतीने लहानपणी अतिशय बुध्दिचातुर्य दाखविल्याचे अनेक कथांवरुन दिसते. पृथ्वी प्रदक्षिणा करून लवकरात लवकर यावे अशी चुरस गजानन आणि षडानन, म्हणजे कार्तिकस्वामी, यांमध्ये लागली. ही चुरस लागल्यानंतर कार्तिकस्वामी खरोखरच पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास निघाले आणि गणपतीने मात्र केवळ आपल्या आईसच एक प्रदक्षिणा केली आणि पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य मिळविले, अशी एक कथा आहे आणि दुसरी कथा विणाऱ्या गाईस गणपतीने प्रदक्षिणा केली आणि पृथ्वी-प्रदक्षिणेचे पुण्य मिळविले अशीही आहे. काहीही असले तरी नियमातून पळवाटा काढून प्रतिपक्षाला चीत करण्यासाठी लागणारी अक्कलहुशारी गणपतीच्या अंगी लहानपणापासूनच होती हे ह्या कथांवरुन दिसते. कश्यप मुनीचा पुत्र या अवतारात गणपतीने देवांतक नावाच्या राक्षसासी युध्द आरंभिले. त्या युद्धात देवांतक गणपतीच्या दाताला धरूनच लोंबकळू लागला आणि त्यामुळे गणपतीचा डाव्या बाजूचा दात मोडला! प्रसंगावधानी आणि युद्धतत्पर गणपतीने तोच दात हातात धरुन देवांतकाच्या मस्तकावर हाणला आणि त्याचा वध केला अशी कथा आहे.
गंडकी नगरीवर हल्ला करण्याचा प्रसंगही असाच नाट्यपूर्ण आहे. ह्या नगरीला सात तट होते. प्रत्येक तटावर जबरदस्त पहारा होता. गणपतीने स्वतःच्या लग्नाची बोलणी सुरु केली आणि विवाहाची वरात घेऊन वरपक्ष गणपतीसहित सातही तट पार करुन आतपर्यंत पोहोचला आणि गणपतीने सिंधुरासुराशी युध्द केले अशी कथा आहे. ह्यामध्येही गणपतीच्या अंगचा राजकारणातील गनिमी काव्याचा गुण जसा दिसतो तशीच त्याच्या हालचालीतील नाट्यमयताही दिसते.
गणपती म्हणजे नृत्य, नाट्य अशा कलांचा अधिष्ठाता! गणराज आनंदाने नाचत असल्याचे वर्णन समर्थापासून ते अलीकडच्या कवींपर्यंत सर्वांनी केले आहे. गणपती हाच मुळी नृत्य-नाट्य अशा कलांचा निर्माता होय, म्हणूनच तर रंगमंचावरील नाटकातच नव्हे तर बोर्डावरील तमाशात सुद्धा प्रारंभी गणपतीचे स्तवन केले जाते. त्याला तमाशाच्या भाषेत गण असे म्हणतात.
ही झाली गणपतीची नाट्यकलेची आणि राजकारणाची बाजू, आता महाराष्ट्रापुरते म्हणायचे तर मराठी माणसाला राजकारणाचे बाळकडूच मिळाल्यासारखे दिसते. चार मराठी माणसे एकत्र जमली की, रेगनसाहेबांचे कसे चुकले आणि राजीव गांधी कसा भाबडेपणाने वागतो, ह्याची वर्णने मोठ्या चवीने करत असतात. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले । मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले ।। खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा ।। हा कवी सेनापती बापट ह्यांचा श्लोक काय किंवा दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा । ही कवी राजा बढे यांची काव्यपंक्ती काय, ही महाराष्ट्राच्या राजकारण-प्रियतेचे निदर्शक नव्हेत काय? महाराष्ट्राला राजकारणाची एवढी आवड आहे की, लोकमान्य टिळकांना इंग्रज सरकारने भारतीय असंतोषाचा जनक असे म्हटले! भारताच्या अलीकडील राजकारणात लोकमान्य टिळकांनी बजावलेली प्रमुख भूमिका नजरेआड करता येण्यासारखी नाही. स्वातंत्र्याचा महामंत्र अलीकडील कालात प्रथमतः टिळकांनी दिला. ब्रिटिशांच्या विरुद्ध पहिली प्रभावी रणभेरी फुंकली ती लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच! असे ठणकावून सांगणारे टिळक हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताच्या राजकारणातील एक अजोड चमत्कार होते. महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणारे महापुरुष हे टिळकांसारखे थोर राजपुरुष असावेत हा योगायोग लक्षात घेण्यासारखा आहे.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे राजकारणपटू होते यात मुळीच शंका नाही, पण ते नाट्यकलेशीही संबंधित होते, त्यांना नाट्यकलेचीही आवड होती. महाराष्ट्राच्या रंगभूमीवरील एक महदाश्चर्य म्हणजे बालगंधर्व! नारायण श्रीपाद राजहंस हे नाव घेतले की नजरेसमोर येणारे लोभसवाणे मोहक व्यक्तिमत्व होय. त्यांना बालगंधर्व ही पदवी बहाल केली ती लोकमान्यांनीच ना? राजकारण आणि नाट्य महाराष्ट्राच्या नसानसातून, हातात हात घालून वावरतात. जेव्हा राजकारणातल्या सर्वश्रेष्ठ राजकारणी पुरुषाने रंगभूमीवरील सर्वश्रेष्ट नाट्यपुरुषाला बालगंधर्व असे म्हणून गंधर्वाच्या देवकोटीत बसविले त्यावेळीच नाट्य आणि राजकारण किती एकरूप झाले आहे त्याचे दर्शन उभ्या जगाला घडले. राजकारण आणि नाट्य हा जसा महाराष्ट्राचा रुचिविशेष आहे, तसाच तो गणपतीचाही आहे, म्हणूनच आवडी समान असल्यामुळे गणपती हा महाराष्ट्राला जितका आवडतो, तितकाच जवळचा वाटतो.
-जयंतराव साळगांवकर
(व्यास क्रिएशन्सच्या प्रतिभा दिपोत्सव २०१६ ह्या श्री गणपती विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply